सुरेश भटांनंतर मराठी गझल मोठी करणारा इलाही...!

ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांना मित्राने वाहिलेली श्रद्धांजली...

माझा ज्येष्ठ गझलकारमित्र इलाही जमादार अखेर गेलाच! खरंतर तो गेल्या काही दिवसांपासून आजाराशी, अपघाताशी आणि अलीकडे तर मृत्यूशीच झुंज देत होता. अखेर त्याच्या मूळ गावी म्हणजे दूधगाव (ता. मिरज, जि. सांगली) इथं 31 जानेवारी 2021 ला रविवारी सकाळी 11 वाजता वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानं आम्हा गझलकारमित्रांना धक्का जरी बसला नसला तरी दुःख मात्र झालंच... कारण तो आमचा गेल्या चाळीस वर्षांपासूनचा अरे-तुरेतला मित्र होता.

1980 ते 1990 हे दशक मराठी गझलेच्या इतिहासातलं महत्त्वाचं दशक आहे. मराठी गझलसम्राट सुरेश भट यांची सासुरवाडी पुणं असल्यानं त्या दशकात भट पुण्यात वारंवार येत राहिले. आले की ते महिना-महिना पुण्यात त्यांची सासुरवाडी पंतांचा गोट इथं मेहंदळ्यांच्या बंगल्यात तळ ठोकून असत. ते तेव्हा महाराष्ट्रातले लोकप्रिय गझलकार-गीतकार म्हणून नावारूपाला आलेले होते... त्यामुळं आम्ही गझल लिहू इच्छिणाऱ्या तरुण कवींनी पुण्यातल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून गझल शिकण्यास प्रारंभ केला होता. त्यात इलाही जमादारही होता. वयानं तो आम्हा सर्वांमध्ये मोठा होता... तर प्रदीप निफाडकर हा वयानं आम्हा सर्वांमध्ये लहान होता.

माझ्यापुरतं बोलायचं तर इलाही माझ्यापेक्षा वयानं दहाबारा वर्षांनी तरी नक्कीच मोठा होता. तेव्हा मी तेव्हाच्या पुणे विद्यापीठात 'मराठी' विषय घेऊन एमएच्या दुसऱ्या (आणि अखेरच्या) वर्षात शिकत होतो. भटांचे गझलपठणाचे, तसंच त्यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं गझल लिहू लागलेल्या तरुण गझलकारांच्याही गझलपठणाचे जाहीर कार्यक्रम पुण्यात होत असत. त्यांचं अत्यंत रसभरित सूत्रसंचालन उर्दू आणि मराठी गझलेचे जाणकार प्रा.डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे करत. त्या काळी वर्तमानपत्रं या कार्यक्रमांना चांगली प्रसिद्धी देत असत. या सर्व कार्यक्रमांमध्ये इलाही जमादार हमखास असे. त्याचं, त्याच्या गझलांचं सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी हे दोन्ही ‘सुरेश’ तोंडभरून कौतुक करत, त्याच्या गझलांमधल्या द्विपदी ही (शेर) ते उद्धृत करत.

एमए झाल्यावर मी एमफिलला प्रवेश घेतला. ‘मराठी गझल - उगम आणि विकास' (प्रारंभ ते 1920) हा विषय घेऊन मी एमफिलसाठीची प्रबंधिका सिद्ध करू लागलो. त्याचा एक भाग म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात काही वाचक / श्रोते, समीक्षक आणि कवी यांच्या मुलाखती घेतल्या. कवींमध्ये इलाही जमादार अंतर्भूत होता.1964 पासून तो कविता लिहीत होता. ‘कोठीवाली’ आणि ‘संगीत मालविकाग्निमित्र’ या नाटकांसाठी त्यानं गीतं लिहिलेली होती. उत्तम गझलाही तो नुकताच लिहू लागलेला होता. गझल नेमकं कशास म्हणावं यासंबंधी मराठीत जी उलटसुलट चर्चा चाललेली होती... त्या संदर्भात त्यानं मुलाखतीत नेमकं मार्मिक उत्तर दिलेलं होतं. तो म्हणाला होता, ‘हत्ती आणि आंधळे यांची जी गोष्ट आहे ती या चर्चेला लागू होईल. आज मराठीत गझलचे निकष प्रत्येक जण वेगवेगळे सांगतो आहे... त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.’  पुण्याहून निघणाऱ्या ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीत 27 जून 1982 रोजी या मुलाखतींवर आधारित ‘मराठी गझल - एक चर्चा कवी, समीक्षक, रसिकांशी’ या शीर्षकाचा लेख गझलकारांच्या छायाचित्रांसह छापून आला होता.

पुढं 1994 मध्ये इलाहीचा ‘जखमा अशा सुगंधी’ हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित झाला. त्याऩंतर त्यानं मागं वळून पाहिलंच नाही. त्याचे एकामागोमाग एक गझलसंग्रह प्रकाशित होत गेले.  ‘भावनांची वादळे’, ‘अर्घ्य’, ‘सखये’, ‘मोगरा’, ‘ओॲसिस’, ‘निरागस’, ‘आभास’ हे त्याचे अन्य गझलसंग्रह होत... शिवाय ‘तुझे मौन’ ही त्याची एक दीर्घ गझल पुस्तकरूपात प्रकाशित झालेली आहे. त्याच्या उर्दू गझलांचा ‘गुफ्तगू’ हा संग्रहही प्रकाशित झालेला आहे.

मराठीत त्यानं गझल या प्रकाराबरोबरच गीत, दोहा, मुक्तच्छंद, मुक्तक, रुबाई, लावणी असे कितीतरी प्रकार हाताळलेले. ते सर्व लेखन पुस्तकरूपात वाचकांसमोर आलेलं आहे. चित्रपट, नाटकं, दूरदर्शन मालिका यांच्यासाठीही त्यानं गीतलेखन केलेलं आहे. त्याच्या गझलांच्या ध्वनिफितीही निघून त्या सर्वदूर लोकप्रिय झालेल्या आहेत. त्याचा आणि त्याच्या गझलांचा चाहतावर्ग महाराष्ट्रभर निर्माण झाला. पुढं त्याच्या अध्यक्षतेखाली 12 आणि 13 फेब्रुवारी 2005 रोजी औरंगाबाद इथं गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गजल सागर प्रतिष्ठानचं चौथं अखिल भारतीय मराठी गझल संमेलन पार पडलं.

मी विद्यापीठाच्या मराठी विभागात शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर प्रदीप निफाडकरांच्या सहकार्यानं मराठी विभागानं गझलविषयक अनेक छोटेमोठे उपक्रम सातत्यानं आयोजित केले. त्यात इलाहीही जमेल त्या-त्या वेळी आवर्जून सहभागी होत असे. आंतरराष्ट्रीय चर्चासत्र हा त्यातला सर्वाधिक मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम होय. हे 12, 13 आणि 14 जानेवारी 2017 या दिवशी आम्ही ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र घेतलं. त्यात इलाहीच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी गझलेला जगभर पोहोचवण्यासाठी गझलकारांनी काय केले पाहिजे?’ हे सत्र पार पडलं. अन्य वेळी आम्ही विद्यार्थ्यांसाठी इलाहीचं गझलविषयक स्वतंत्र व्याख्यानही ठेवलेलं होतं.

इलाही पुण्यात येरवड्याला डेक्कन कॉलेज रोडला कदम निवासमध्ये छोट्याशा दोन खोल्यांमध्ये राहत असे. 

कारण त्यानंच एका गझलेत म्हटलं आहे-

‘आत्म्याचा सौदा करुनी जर स्वतःस विकले असते 

एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते...’

अशा त्याच्या घरी मी अधूनमधून जात असे आणि त्याच्याशी तासन्तास गप्पा मारत बसत असे. इलाही हा मोठा गझलकार असूनही तो सर्वांशीच फार नम्रतेनं वागत असे. प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात कधीच गेली नाही. तो तसा मितभाषी होता. काहीसा मिष्कीलही होता. त्याच्या मानसन्मानाबद्दल विचारल्याखेरीज तो कधी फारसं बोलत नसे. त्याचं कौटुंबिक जीवन तसं खडतरच गेलं... परंतु तो कधी त्याबद्दल आम्हा मित्रांकडे चकार शब्द काढत नसे.

इलाहीची गझल, मराठी गझलेच्या क्षेत्रातलं त्याचं योगदान हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे... परंतु इतकं जरूर म्हणता येईल की, इलाहीची गझल ही सर्व अंगाऩं अस्सल मराठमोळी आहे. तो जन्मानं मुस्लीम असला  तरी त्यानं, त्याच्या गझलेनं आपण मुस्लीम असल्याबाबतची प्रौढी कधी मिरवली नाही किंवा न्यूनगंडही बाळगला नाही. इलाहीनं मराठी गझलेत अनेक प्रयोग केले. द्विपदीतली पहिली ओळ मराठी तर दुसरी ओळ हिंदी हा त्यातला एक प्रयोग होय. 

‘ऐ सनम! आँखो को मेरी, खूबसूरत साज दे 

येउनी स्वप्नात माझ्या, एकदा आवाज दे’ 

इलाहीच्या अनेक गझला भीमराव पांचाळे यांनी गायल्या असून त्या सर्वदूर लोकप्रियही झालेल्या आहेत.

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा 

बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा’  हा मतला असलेली गझल, तसंच 

‘वाचलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे? 

पुस्तकातुन भेटलेली, माणसे गेली कुठे?’ 

हा मतला असलेली गझल... या दोन गझला इथं उदाहरणादाखल सांगता येतील.

सुरेश भटांच्या नंतर मराठी गझलेला मोठं करण्यात, तिला पुढं नेण्यात इलाहीचा मोठा वाटा आहे. इलाहीचा जीवनप्रवास लौकिकार्थानं जरी संपला असला तरी त्याची गझल मात्र कधीच न संपणारी आहे.

‘ये, बैस बोल थोडे घेऊन हात हाती 

उरला किती ‘इलाही’ माझा प्रवास आता?’ 

असं म्हणाणारा इलाही आजही माझ्या अश्रूभरल्या नजरेपुढून जराही हलत नाही. त्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली...!

- डॉ. अविनाश सांगोलेकर, पुणे. 
sangolekar57@gmail.com

(लेखक आद्य मराठी गझल संशोधक व ज्येष्ठ गझलकार आहेत.)

Tags: इलाही जामदार गझल सुरेश भट अविनाश सांगोलकर उर्दू Marathi Urdu Gazal Ilahi Jamadar suresh bhat Avinash Sangolkar Load More Tags

Comments: Show All Comments

Dhani

Thank you for nice information. Please visit our web: www.uhamka.ac.id Dhani Kampus Unggul Kampus Unggul

भागवत बनसोडे

मराठी गझलेवर भाष्य करणा-या *गझल-गुंफा* ह्या अपूर्व ग्रंथासाठी *गझलाई * ह्या विषयावर लेख घेण्यासाठी ,मी इलाहीला फोन केला , तेव्हा इलाही दवाखान्यात उपचार करुन घेत होता. भागवत, मी बरा होऊन घरी आल्यावर लेख लिहून पाठवतो. इलाहीशी झालेला हा शेवटचा संवाद ! डॉ. प्राचार्य अविनाश सांगोलेकरांनी इलाहीच्या स्वभाव गुणांचे वर्णन तंतोतंत खरे आहे. इलाही. माणसे जोडणारा अनोखा यार होता गझल प्रांतातला इलाही सरदार होता भागवत बनसोडे

प्रसन्न देशपांडे

छान.

मयूर पटारे

इलाही समजून घेणं खरं तर सोपंही तेवढंच आणि अवघडंही तेवढंच... त्यांच्या प्रत्येक गझलेतून, प्रत्येक शेरातून, प्रत्येक मतल्यातून ते नव्याने उलगडत जातात...

सुरेखा सबनीस

इलाही जमादार यांचा गझलकार म्हणून घेतलेला आढावा अतिशय समर्पक.

Rahul Ramesh Gudadhe

इलाहि जामदार खरचं एका ताऱ्या सारखे होते आणि कायम राहतील..

विष्णू दाते

..असा हा इलाही...आठवणीत राहील गझलांमुळे सदाही...!!

भागवत घेवारे

सुंदर ...

Add Comment