फेसबुकला सोळाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Photo Courtesy: TechRepublic

जगभरातल्या तरुणाईला वेड लावणाऱ्या फेसबुकचा आज 16 वा वाढदिवस! एक कॉलेज तरुण केवळ गंमत म्हणून आपल्या कॉलेजमधल्या सुंदर तरुण-तरुणींची माहिती टाकून, त्यातली सगळ्यात आकर्षक जोडी निवडण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करतो काय; त्याचं एका बलाढ्य कंपनीत रूपांतर होतं काय आणि देशभरातल्याच नव्हे, तर जगभरातल्या तरुण-तरुणींपासून लहानथोरांपर्यंत सर्वांनाच त्याचं वेड लागतं काय, सगळंच नवल! 

मार्क झुकरबर्ग या 19 वर्षीय कॉलेजकुमारानं निव्वळ एक गंमत म्हणून एक छोटेखानी सॉफ्टवेअर तयार केलं होतं. आपल्या कॉलेजमधली ‘सगळ्यात आकर्षक तरुण-तरुणी कोण’ हे मतदानाद्वारे शोधण्यासाठी त्यानं ‘फॅस मॅश’ नावाची वेबसाईट तयार केली. त्या तरुण-तरुणींची माहिती आणि त्यांचे फोटो मिळवून या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्यासाठी त्यानं अनेक उपद्व्यापही केले. कधी कॉलेजच्या कॉम्प्युटरला नेटवर्क केबल जोडून, तर कधी मित्राच्या अकाउंटचा लॉगइन आणि पासवर्ड मिळवून त्यानं ही माहिती मिळवली. 

फक्त 8 तासांत तयार झालेल्या त्याच्या या वेबसाईटनं काही तासातच धुमाकूळ घातला. पण आपल्याविषयी ही माहिती सर्वांसमोर जाहीररीत्या आल्यामुळे मुली खूपच वैतागल्या. शेवटी मुलींच्या तक्रारी आल्यावर वसतिगृहानं ताबडतोब पावलं उचलून झुकरबर्गची इंटरनेट सेवाच बंद करून टाकली होती. पण पुढे जाऊन झुकरबर्गनं याच कल्पनेतून अनेक कॉलेजकुमारांना आणि कुमारीना एकत्र आण्याच्या उद्धिष्टानं आपल्याकडचे 1000 डॉलर्स घालून आणि एदुआर्दो सॅव्हेरिन या आपल्या व्यवसायाची जाण असलेल्या मित्राला सोबतीला घेऊन 4 फेब्रुवारी, 2004 रोजी ‘फेसबुक’ची निर्मिती केली. आणि हळूहळू या लहानशा कल्पनेचा वटवृक्ष झाला. आणि आता फेसबुकवरून लोक एकमेकांशी संवाद साधायला लागले. नवनवे मित्र-मैत्रिणी (फ्रेंडज) जोडले जायला लागले. 

फेसबुक आल्यावर काहीच वर्षांतच व्हॉटस्अ‍ॅपनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली. पण फेसबुकनं या कंपनीलाही विकत घेतलं आणि या दोन्ही माध्यमांनी सगळं जग पादाक्रांत करून प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली. अर्थात या प्रवासात अनेक अडचणी आल्या; अनेक आरोप झाले तर अनेकदा टीका झाली. हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. 

या सोशल मीडियाचे अनेक फायदे झाले. आज या दोन्ही माध्यमांनी जगभरातल्या अनेक लोकांना एकत्र आणलं आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस कुठल्याही देशातल्या माणसाशी मैत्री करू शकतो. जग खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम ‘फेसबुक’नं केलं आहे. पूर्वी फेसबुक फक्त डेटिंगची वेबसाईट आहे असं मानलं जायचं. पण या वेबसाईटचा उपयोग लक्षात यायला लागला आणि फेसबुक विविध कामांसाठी उपयोगात यायला लागलं. 

शाळा किंवा शहर सोडल्यावर आपले मित्र-मैत्रिणी भेटण्याची शक्यता तशी कमीच असते. जगाच्या कोणत्या कोपऱ्यात ते आहेत हेही आपल्याला माहीत नसतं. पण फेसबुकच्या मदतीनं अनेकांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना चक्क फेसबुकवरून शोधून काढलं आहे. अनेक जणांनी हरवलेल्या किंवा दूर गेलेल्या आणि संपर्कात नसलेल्या आपल्या आप्तांना ‘फेसबुक’वरून शोधून काढलं. यातल्या अनेक जणांनी आपली भेट या जन्मी कधी होईल याची आशाच सोडली होती. अनेक जणांची लग्नंही ‘फेसबुक’मुळे जुळली आहेत. 

आपले फोटो/व्हीडिओज/गाणी शेअर करणं किंवा डॉक्युमेंटस् शेअर करणं अशाही गोष्टी आपण फेसबुकमुळे आता सहज करू शकतोय. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं म्हणून अनेक व्यावसायिक फेसबुकचा फायदा घेतात. अनेक कंपन्या किंवा लहान लहान व्यावसायिक, सामाजिक संस्था, इन्श्युरन्स कंपन्या आपल्या जाहिराती ‘फेसबुक’वर टाकतात. फेसबुकचा विक्रीवर अतिशय चांगला परिणाम होतो असं अनेकांचं मत आहे. नाटक किंवा सिनेमा यांच्याही जाहिराती ‘फेसबुक’वर आपल्याला बघायला मिळतात. 

फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप यांचा एक चांगला आणि वेगळा फायदा कोणता असेल, तर लोक स्वत:ला व्यक्त करायला शिकली आहेत. ही दोन्ही माध्यमं मोबाईलवरही घेता येतात. त्यामुळे आपल्या कविता असोत, लेख असोत किंवा आपलं एखादं मत असो ते या माध्यमांतून जगासमोर सहजपणे मांडणं शक्य व्हायला लागलं आहे. कित्येकांना प्रकाशक मिळणं, त्यांनी आपलं पुस्तक लवकर छापणं अशा गोष्टी शक्य होत नाहीत. अशांना आता व्यक्त व्हायला फेसबुक किंवा व्हॉटस्अ‍ॅप ही चांगली माध्यमं मिळाली आहेत. शिवाय एखाद्यानं आपल्या कवितेचं पुस्तक जरी छापलं तरी ते वाचणाऱ्यांची संख्या कमी असते. पण इथे मात्र एका झटक्यात अनेक लोकांना आपली कविता/लेख पाठवता येतात आणि तेही कमीत कमी खर्चात! या सगळ्यामुळेच कदाचित फेसबुक घराघरात पोहोचलं आहे. 

मात्र फेसबुकचा दुरुपयोगही प्रचंड होतोय. मुलगा असून मुलगी असल्याचं भासवून ‘फेक अकाऊंट’ तयार करणं, मुलींबरोबर मैत्री करणं, आधी मैत्री करून प्रेमाचं नाटक करून फसवणं, फेसबुकच्या मैत्रीचा फायदा घेऊन पैशांची मागणी करून फसवणं, एखादीने मैत्रीस नकार दिला की तिचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करून तिची बदनामी करणं असे अनेक फसवाफसवीचे प्रकार आपल्याला आज बघायला मिळताहेत. अनेक दहशतवादी संघटना द्वेष पसरवण्यासाठी ‘फेसबुक’चा वापर करतात हेही लक्षात आलं आहे. 

आजची तरुणाई या दोन्ही माध्यमांत इतकी गुंतली आहे की तिला खरं जग आणि आभासी जग (Virtual World) याचं भानही उरलं नाहीये. सतत आपले फोटो फेसबुकला अपलोड करणं, त्याला लाईक किती मिळताहेत हे बघत राहणं, जास्त लाईक मिळाले नाहीत की निराश होणं, अनेकदा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी झाल्यामुळे नैराश्यात जाणं, वेळप्रसंगी आत्महत्याही करणं, फेसबुकवर मित्र-मैत्रिणींची संख्या जास्त होण्यासाठी अनोळखी लोकांशीही मैत्री करणं अशा सगळ्या विश्वातच आजची तरुणाई रमली आहे. 

अनेकांची ‘फेसबुक फ्रेंड’ची यादीही बरीच मोठी असते. अनेकदा या यादीतली मंडळी एकमेकांना कधी भेटलेलीही नसतात. अनेकांचे हजारो फेसबुक फ्रेंड्ज असतात, पण अडीअडचणीच्या वेळी धावत येईल किंवा विश्वासानं ज्याच्या खांद्यावर अश्रू ढाळता येतील असा एकही मित्र किंवा मैत्रीण नसते. त्यामुळे लोक एकाकी पडायला लागले आहेत. अनेक जण नैराश्याच्या गर्तेतही गेले आहेत. ‘फेसबुक’वर ‘आपण किती खुश आहोत, यशस्वी आहोत’ हे दाखवणं आणि खऱ्या आयुष्यात मात्र नैराश्यात जगणं असं दुट्टपी आयुष्य अनेक जण आज जगताहेत. 

अनेक जणांना फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचं व्यसन लागलं आहे. अशा तरुणांवर एक प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यापासून २ दिवस मोबाईल आणि लॅपटॉप लांब ठेवला गेला. एखाद्या दारूचं किंवा ड्रग्जचं व्यसन लागलेल्या माणसाला दारू किंवा ड्रगज दिले नाहीत, तर तो जसा अस्थिर होतो किंवा थरथर कापतो, तशीच या फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचं व्यसन लागलेल्यांची अवस्था झाली होती. शेवटी हा एक मनोविकार असून त्याचा ‘फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर (एफएडी)’ या नावानं मनोविकारांच्या यादीत समावेश करण्याचा विचार झाला. या दोन्ही माध्यमांमुळे वाचनसंस्कृतीलाही प्रचंड फटका बसलाय. पुस्तकं घेऊन वाचण्यापेक्षा फेसबुक किंवा व्हॉटस् अपवरच्या लहान लहान पोस्ट्स वाचण्यात आणि ती फोरवर्ड करत बसण्यातच आजचे तरुण धन्यता मानतात. 

हे सगळं भयंकर आहे. पण झुकरबर्गनं आपल्याला जी संपर्काची मध्यमं दिली आहेत, त्या माध्यामांचा आपण कसा उपयोग करायचा याचा विचार आपणच केला पाहिजे. आपण या माध्यमांना नियंत्रित करायचं की त्यांना आपल्याला नियंत्रित करू द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. एकूणच फेसबुकचा हा 16 वर्षांचा प्रवास अचंबित करणारा आहे. फेसबुकला 16 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

- अच्युत गोडबोले 
achyut.godbole@gmail.com 

(अनेकविध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले महाराष्ट्रातील लोकप्रिय लेखकांपैकी एक आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, संगीत, चित्रकला अशा विविध विषयांवरील त्यांची 32 हूनही अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

 

Tags: फेसबुक तंत्रज्ञान सोशल मिडिया Achyut Godbole Marathi Faceook Technology Load More Tags

Comments: Show All Comments

Vasant Ekbote

खूपच माहितीपूर्ण लेख. असेच नवनविन विषय घेत जा.

Vivek SISAL

खूप छान माहितपूर्ण लेख

Daniel

खरंच फेसबुकचा प्रवास अचंबित करणारा आहे

Swapna Shetty

Wow Hats off Achyut ! Stay blessed always ! ! Great job ! ! !

Namdeo Shinde

Very useful and interesting information

Popat Pagar

Achyut God bole tells actual fact in interesting manner

Sudam Gopal Sutar

माहिती खूपच छान

Vaishali

सरांचे लेख नेहमीच माहितीपूर्ण आणि छान असतात.

Popat Pagar

Interesting facts & at is knowledge

Add Comment