किरण नगरकर:व्यक्तिगत आदरांजली

धर्मांधतेचा व असहिष्णुतेचा प्रखर टीकाकार कायमचा शांत झाला

Mexy Xavier

स्नेहा नगरकर या माझ्या मैत्रिणीचा काल रात्री मेसेज आला. मेसेज वाचून मन सुन्न झाले आणि प्रचंड एकाकीपणाने ग्रासून गेले. किरण नगरकरांच्या मृत्यूची बातमी अशी अचानक येऊन धडकेल असे वाटले नव्हते. स्नेहा त्यांची पुतणी. तिच्याकडून कळले की नगरकरांना मंगळवारी ब्रेन हॅमरेजचा आघात झाला होता, त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली आणि गुरुवारी (५ सप्टेंबर, २०१९) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. एक लिहिता लेखक, जिज्ञासू विचारवंत, सुजाण भाष्यकार आणि धर्मांधतेचा व असहिष्णुतेचा प्रखर टीकाकार कायमचा शांत झाला. 

माझी आणि नगरकरांची ओळख अगदी अलीकडची. मी संपादन केलेल्या ‘अलबेर काम्यू : नव्या क्षितिजांचा शोध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये करायचे ठरल्यावर पाहुण्यांचा शोध सुरु झाला. काम्यूच्या पुस्तकाला योग्य न्याय देऊ शकतील अशा मराठीतल्या विचारवंतांमध्ये रेखा इनामदार-साने यांचे नाव पहिले डोळ्यासमोर आले. त्यांना विनंती करताच त्यांनी चटकन होकार दिला. या कार्यक्रमासाठी त्यांच्या सोबत किरण नगरकरही उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा होती. पण जागतिक कीर्तीच्या इतक्या मोठ्या लेखकाशी बोलण्याची धास्ती वाटत होती. 

प्रा. मंगला सरदेशपांडे यांच्या मध्यस्थीने नगरकरांशी संपर्क साधला. त्यांचा ‘हॅलो’ हा कानावर पडलेला पहिला शब्दच फार मृदू होता. मी जरा बिचकतच त्यांना माझी, पुस्तकाची आणि प्रकाशन समारंभाची माहिती दिली आणि पुढे म्हटले, “ पुस्तकाचे  प्रकाशन तुमच्या हस्ते करायची फार इच्छा आहे.”

त्यावर त्यांनी प्रश्न केला, “बट व्हॉट मेड यू थिंक ऑफ मी?”

मी म्हटलं, “काम्यू एक वसाहतोत्तर लेखक होता. तुम्ही वसाहतोत्तरी लेखकांपैकी एक महत्वाचे लेखक आहात. त्यामुळे  आपल्या आधीच्या पिढीतल्या या सुहृदाकडे तुम्ही कसे पाहता हे जाणून घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते.”

ते म्हणाले,  “काम्यू खूप मोठा होता आणि त्याच्या तुलनेने मी फारच  लहान आहे. पण काम्यूच्या प्रेमापोटी मी  तुझ्या पुस्तकाचे प्रकाशन  करायला येईन आणि थोडे फार बोलेन.”

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. अतिशय गंभीर आवाजात मला म्हणाले, “मला कार्यक्रमाला बोलावून तू खूप मोठी रिस्क घेतोयस असे नाही का वाटत तुला?”

आणि मग अतिशय मोकळेपणाने त्यांनी मला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितले. पुढे म्हणाले “मी तिथे आलो तर बहुदा लोकांना आवडणार नाही.”

मला त्या सगळ्या प्रकरणाची माहिती होती आणि त्या आरोपांमध्ये तथ्य असेलही कदाचित, पण त्यामुळे त्यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उभे रहात नाही असे मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, “ माझा कॉन्शिअस क्लीअर आहे… बट आय एम रिलीव्हड.”

त्यानंतर पुढे काही दिवस कुठल्या ना कुठल्या कारणाने आमचे नियमित फोन होत असत. अशाच एका संवादात सध्याच्या भारतीय  राजकारणाबद्दल त्यांनी तीव्र नापसंती आणि खंत व्यक्त केली. असहिष्णुता, धर्मांधता आणि केंद्र सरकारचे अरेरावी वर्तन याविरुद्ध ते पोटतिडकीने बोलत होते. त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा मानाचा पुरस्कार जर्मन सरकारकडून मिळाला होता. त्याबद्दल विचारताच ते उपहासाने  म्हणाले “ जर्मन सरकारची मोठी चूक झाली. खरे तर कोण्या वेगळ्याच किरण नगरकरला पुरस्कार द्यायचा असावा. पण संधी साधून मी बाजी मारली.”  

यावर मी विचारले, “भारत सरकारने तुम्हाला साधा पद्म पुरस्कार सुद्धा देऊ नये?”

ते मिश्किलपणे म्हणाले, “इतक्या वर्षात नाही दिला, पण लवकरच देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे.  त्या अगोदर सरकारची एक अट आहे की, मी संघात प्रवेश करावा. माझी हरकत नाही, बट देन गॉड हेल्प द संघ!”

“अशीच उपेक्षा मराठी साहित्य- विश्वाने आणि वाचकांनी सुद्धा केली असे नाही वाटत?” मी म्हणालो.

“त्या काळी वाटायचे. पण आता नाही वाटत. माझा कोणावरच राग नाही. खरे तर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी मला इंग्रजीमधून लिहायची होती. पण मराठीत सुचत गेली आणि लिहीत गेलो. आणि बेड-टाइम्स स्टोरीजचे याच्या एकदम उलट घडले.”

पुस्तक  प्रकाशनाच्या वेळी रेखा इनामदार यांनी त्यांच्या भाषणात ‘सात सक्कं त्रेचाळीस’ विषयी गौरवोद्गार काढले आणि नगरकरांच्या साहित्याचे दुवे काम्यूच्या साहित्याशी जोडता येतात या अर्थाचे विधान केले. नगरकरांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला प्रा. ग. प्र. प्रधान आणि प्रा. मे. पुं. रेगे या त्यांच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला आणि म्हणाले “रेखाताईंसोबत आज खरे तर प्रधान सर किंवा रेगे सर या व्यासपीठावर हवे होते. पण ते आता आपल्यात नाहीत म्हणून त्यांच्या एका शिष्याला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि मान मिळाला आहे. ही माझ्यावरची एक मोठी जबाबदारी आहे असे मी मानतो.”

त्यानंतर त्यांनी काम्यू आणि स्वतःचे बालपण यांतील साधर्म्य उलगडून सांगितले (दोघे लहानपणी सतत आजारी असत), पहिल्यांदा काम्यूचे लेखन वाचले त्याची आठवण, त्यानंतर त्यांच्या विचारांना मिळालेली विलक्षण कलाटणी आणि काम्यूचे जागतिक साहित्यामधले अनन्यसाधारण महत्त्व याविषयी ते भरभरून बोलले.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर उद्विग्न होऊन त्यांनी मला एक मेसेज केला, “हे संकट आपल्याच प्रिय देशबांधवांनी ओढवून घेतले याचे फार वाईट वाटते. काही लोक गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचे अहित करणारे ठरवत आहेत. भारतीय संविधानाचा हा अंतकाळ समजावा. एका चिरकालीन हिंदुत्ववादी राष्ट्राचा उदय झालेला आहे.”

अलीकडच्या काळात त्यांना अपराधी भावनेने सतत ग्रासलेले  असायचे. राजकारणाचा विषय निघाला की ते म्हणायचे, “अवर जनरेशन फेल्ड यू. या संघवादी- हिंदुत्ववादी राजकारणाचा साप आमच्या पिढीने ठेचायला हवा होता. पण आम्ही कचरलो. आणि आता त्याचे विषारी डंख तुम्हाला सोसावे लागणार आहेत.”

त्यांना तरुण पिढीशी संवाद साधायचा होता. या सप्टेंबर महिन्यात मी शिकवत असलेल्या महाविद्यालयात त्यांचे भाषण आणि विद्यार्थ्यांशी चर्चा आयोजित करण्याबद्दल  आम्ही बोलत होतो, तेव्हा ते म्हणाले, “ मी फार आजारी असतो. आता यापुढे कितपत काम करता येईल सांगणे कठीण आहे. त्याआधी मला मुलांशी बोलायचे आहे. त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आता भारताचं भविष्य या नव्या पिढीच्या हातात आहे.”

तो संवाद आता कायमचा अपुरा राहून गेला. माझे आणि त्यांचे संभाषणही अर्धवट राहिले. एकदा मी त्यांना म्हणालो होतो, “ आपला परिचय फार उशिरा झाला. मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे आणि त्याला अनेक वर्षे लागतील असे वाटते.”

त्यावर ते हसून म्हणाले, “ परिचय झाला हे महत्वाचे आणि अल्लाह ने चाहा तो बडे लंबे अरसे तक जिऊंगा” प्रत्येक संभाषणाच्या शेवटाला ते म्हणायचे, “गॉड ब्लेस यू”...

‘मे गॉड ब्लेस युवर सोल, किरण नगरकर.'

Tags: साहित्य लेखक श्रद्धांजली आलोक ओक Kiran Nagarkar Alok Oak Literature obituary Load More Tags

Add Comment