संवेदनशीलतेतून परिवर्तन घडवून आणण्याचा कृतीशील उत्सव

सहावा राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह : 15 ते 21 ऑगस्ट 2025

तथागत बुद्ध, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राजा राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहूजी महाराज, पेरियार नायकर, फातिमा शेख, मदर तेरेसा. या सर्व महान व्यक्तींनी समतामूलक समाज निर्मितीसाठी केलेल्या कार्यातून याची प्रचीती आपल्याला अनेकदा येते. संवेदनशील मन हे अपोआप तयार होत नाही किंवा त्यासाठी बाजारात विशेष औषध-गोळी मिळत नाही. समाजपरिवर्तनासाठी विवेकशील दृष्टीकोनातून जाणीवपूर्वकच प्रयत्न करावे लागतात. मनात बदलाची आग पेटावी लागते, त्यासाठी ठोस कृतीकार्यक्रम आखून कार्य करावे लागते. 

सामाजिक न्याय व मानव-अधिकार हे समाजकार्य व्यवसायाचे प्रेरणास्रोत आहेत. समाजातील गरीब, दीन-दुबळे, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास समूहांचा संवेदनशीलपणे अभ्यास करून सुनियोजितपणे सेवा देण्यासाठी निर्माण झालेल्या या व्यवसायिक क्षेत्राची निकड आज दिवसेंदिवस अधिकाधिक भासू लागली आहे. मागील एका आठवड्यापासून राष्ट्रीय स्तरावर समाजकार्य सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी विविध स्वरूपात साजरा केला जात आहे. या सप्ताहानिमित्त समाजकार्य या व्यवसायाचे वाढते महत्त्व आणि प्रशिक्षित, व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांचे राष्ट्रविकासातील योगदान याचा आढावा घेणारा हा लेख.

समाजकार्य : एक व्यवसायिक शिक्षण क्षेत्र
अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर अमेरिका आणि युरोप खंडांतील अनेक राष्ट्रांमध्ये  सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत मूलगामी स्वरूपात परिवर्तन झाल्याचे आपणास पाहिला मिळते. या औद्योगिक क्रांतीने रोजगाराच्या संधीसह अनेक नव्या स्वरूपातील जटिल सामाजिक-सांकृतिक समस्यांनाही जन्म दिला. रोजगार व उदरनिर्वाहासाठी अनेकांनी ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर केले. आपले गाव, परिसर सोडून स्थलांतरित कामगाराचे समूह शहरात जिथे कुठे जागा मिळेल तेथे स्थायिक होऊ लागले. स्थलांतरित लोकांच्या नव्याने वसलेल्या या वस्त्यांनाच पुढे झोपडपट्टी अशी ओळख मिळाली. शिवाय विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांची कॉस्मोपॉलिटन संस्कृती उदयास येऊ लागली. झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांना पुढे मूलभूत सेवा-सुविधांचा तुटवडा अधिक भासू लागला.

अशावेळी ख्रिस्ती धर्मसंस्था स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबाना आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासारख्या मूलभूत सेवासुविधा देण्यासाठी पुढे सरसावल्या. सुरुवातीस धार्मिक आणि स्वंयसेवी प्रेरणेतून दिल्या जाणाऱ्या या सेवेचे रूपांतर कालांतराने प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून व्यवसायिक क्षेत्रात झाले. या दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा अधिक संघटितपणे, नियोजन आखून, गरजूंच्या गरजांवर आधारित दिल्यास त्या अधिकाधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरू शकतात याची जाणीव सुरुवातीच्या काळातील स्वंयसेवी समाजकार्यकर्त्यांना झाली. समाजकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन पुढे  अमेरिकेतील शिकागो व कोलंबिया विद्यापीठांमध्ये व्यवसायिक समाजकार्य शिक्षणाचे पदविका व पदवीव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम सुरू झाले.

भारतातील समाजकार्य शिक्षणाची सुरुवात 
भारतात मुंबई शहर औद्योगिक व्यापार केंद्र म्हणून नावारूपास आले. महाराष्ट्राच्या व देशाच्या विविध प्रांतातून अनेक गिरणी कामगार, मजूर मुंबई शहरात स्थायिक होऊ लागले. मुंबईतील नागपाडा ही अशाच स्थलांतरित कामगारांची वस्ती. या वस्तीमध्ये सन 1936 मध्ये डॉ. किल्फ्रड मान्शार्ड्ट यांनी सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या संस्थेच्या माध्यमातून व्यवसायिक समाजकार्य शिक्षणाची सुरुवात केली. पुढे ही संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) या नावाने ओळखली जाऊ लागली. येत्या 2026 सालात समाजकार्य व्यवसायीक शिक्षण क्षेत्राला 90 वर्ष पूर्ण होतील. टिस नंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, मद्रास, चेन्नई,केरळ अशा अनेक ठिकाणी समाजकार्य शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची स्थापना झाली. आजघडीस भारतात सातशेहून अधिक केंद्रीय, राज्यनिहाय विद्यापीठीय विभाग आणि महाविद्यालयातून समाजकार्य व्यवसायाचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जात आहे. केवळ महाराष्ट्रात सत्तरपेक्षा अधिक संस्थामधून समाजकार्याचे शिक्षण प्रशिक्षण दिले जात आहे.  

मागील नऊ दशकांपासून समाजकार्य शिक्षणाचा प्रवास अविरतपणे सुरू असूनदेखील, आजही समाजकार्याच्या या व्यवसायिक क्षेत्राविषय अनेकांच्या मनात शंका व संभ्रम असल्याचे आढळून येते. समाजकार्य हे व्यवसायिक शिक्षण क्षेत्रपण असते हे अनेकांच्या मनात बिंबलेले नाही. प्रोफेशनल फिल्ड म्हणून समाजकार्य व्यवसायाची ओळख आजही अनेकांच्या तोंडवळणी पडली नसल्याचे पाहायला मिळते. सामान्य लोकांमध्ये समाजकार्याच्या व्यवसायिक क्षेत्राविषयी नेहमीच विचारले जाणारे प्रश्न म्हणजे समाजकार्य करण्यासाठी वेगळ्या शिक्षण-प्रशिक्षणाची गरज काय? अनेक संवेदनशील लोक प्रशिक्षण न घेताही कार्य करतात, बहुतांशी राजकीय पक्ष-संघटना, राजकीय नेतेदेखील स्वतःला समाजकार्यकर्ते अशी उपाधि लावतात मग पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले समाजकार्यकर्ते व इतरांमध्ये फरक काय?

या क्षेत्राविषयी अशा स्वरूपाचे प्रश्न आणि गैरसमज असण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे भारतात वैद्यकीय शिक्षण, लॉ, इंजिनियरिंग, या व्यावसायिक अभ्यासक्रम क्षेत्रांचे नियमन करणाऱ्या संरचित काउन्सिल आहेत. त्याप्रमाणे भारतात समाजकार्य व्यवसायाचे नियमन करणारी स्वतंत्र अशी काउन्सिल नाही. राष्ट्रीय स्तरावर समाजकार्य काउन्सिल गठित व्हावी यासाठी नाप्स्वी व इतर संघटना संघर्ष करत आहेत परंतु केंद्र सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.   

समाजकार्य व्यवसायाची मूळ प्रेरणा ही सामाजिक न्याय व मानव अधिकार या तत्त्वावर आधारलेली आहे. समाजकार्य ही केवळ नोकरी किंवा पदवीपुरती मर्यादित व्यावसायिक शाखा नाही; ती समाजातील पीडित, वंचित व दुर्बल घटकांसाठी न्याय मिळवून देणारी आणि गुणात्मक परिवर्तन घडवून आणणारी चळवळ आहे. समाजकार्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, दिव्यांग हक्क, दलित-आदिवासी विकास, पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. याची अनेक उदाहरणे आपणास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पटलावर पाहायला मिळतात.  

समाजकार्याचे उच्च शिक्षण घेऊन ज्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्यातून ओळख निर्माण केली, त्या नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर, युवा संस्थेचे संस्थापक डॉ. मिनार पिंपळे, युनोमध्ये प्रतिनिधत्व करणाऱ्या पौर्णिमा माने, सिकोईडिकोन संस्थेचे संस्थापक शरद जोशी, मराठवाड्यात दलितांना हक्काची गायरान जमीन मिळवी यासाठी मानवी हक्क अभियान चळवळीचे प्रणेते श्री. एकनाथ आव्हाड, मेळघाट परिसरात आदिवासी मुलांच्या कुपोषणच्या समस्यांवर खोज संस्थेच्या माध्यमातून कार्य करणारे बंडू साने व पौर्णिमा उपाध्याय तसेच राजस्थानातील अजमेर येथे आर.एम.के.एम. या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारे क्षमा व राकेश कौशिक हे सर्व प्रशिक्षित समाजकार्यकर्ते अनेक वर्षांपासून वंचित समूहांसोबत कार्य करून राष्ट्रविकासात भरीव योगदान देत आहेत. राज्यसभेतील खासदार मनोज कुमार झा हे दिल्ली विद्यापीठातील समाजकार्य विभागात प्राध्यापक आहेत. ते सध्या लोकशाहीच्या सुदृढ आरोग्यासाठी, सांविधानिक मूल्ये अबाधित राहावीत म्हणून तसेच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी समाजाच्या न्याय्य व सांविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांतून सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत. 

टिसमधून समाजकार्याचे उच्च शिक्षण घेऊन अनेक तरुण नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवत राष्ट्रविकासात योगदान देत आहेत. डॉ. राहुल सोनपिंपळे, आयस्कचे संस्थापक अध्यक्ष दलितांची स्वतंत्र चळवळ उभी करून नवी उभारी देऊ पाहत आहेत. दलित-बहुजन विद्यार्थीना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात एकलव्य चळवळीच्या माध्यमातून जोडणारे प्रशांत चव्हाण व राजू केंद्रे, दिव्यांग व्यक्तींना ‘स्वाधार’च्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करणारे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संस्थेचे प्रशांत सुडे, ‘मिशन बदलाव’ या संस्थेच्या माध्यमातून झारखंड राज्यात आदिवासी लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणारे भूषण भगत, तसेच समाजकार्य संशोधन पद्धतीचा अवलंब करून भटक्या विमुक्त समुदायांचे प्रश्न ऐरणीवर आणणारे आणि ‘झोळी’ या आत्मकथनाचे लेखक डॉ. कालिदास शिंदे, डॉ. दादा धडस, डॉ. स्वाती जाधव यांच्या पीएचडी संशोधन अभ्यासातून निघालेले निष्कर्ष नवी सरकारी नीती-धोरणे आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. टिळक विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे प्रा. प्रकाश यादव यांनी पुणे जिल्यातील भैरवाडी गावात सीएसआर च्या साह्याने राबवलेला ग्रामीण विकासाचा पथदर्शी प्रकल्प, यामुळे महिला व युवक सक्षमीकरणास अधिक बळ मिळत आहे. तसेच जातीय संरचना आणि समाजकार्य अभ्यासक्रम याची संशोधनपर मांडणी करणारे प्रा. डॉ. प्रदीप जारे, तसेच माझे स्वतःचे ‘दलित साहित्याची समाजकार्य शिक्षणासाठीची उपयोगिता’ हे पीएचडी अभ्यासादरम्यान केलेले संशोधन यांमुळे जातीवादाला खतपाणी न घालता समाजकार्याच्या माध्यमातून रचनात्मक परिवर्तन घडवून आण्यानयसाठी आवश्यक असलेला दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी मदत होत आहे.

अजमेर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठातील प्रा. जगदीश जाधव आणि त्यांची टीम यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. ते त्यांच्या पीएचडी स्कॉलर्सना तत्कालीन सामजिक प्रश्नांवर कृतिशील संशोधन पद्धतीचा अवलंब करून काम करायला सांगतात. आणि त्या समस्यांचे निवारण करण्यासाठीचे प्रत्यक्ष अमलात आणण्यासारखे उपाय सातत्याने शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. ललिता सुब्रमण्यम या आर.जे.एन.वाय.डी येथील समाजकार्य विभागात प्राध्यापक आहेत, मागील चार वर्षांपासून त्या पीएचडी करणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींतील विद्यार्थ्यांचे अकॅडेमिक लेखनकौशल्य वाढवे यासाठी ब्रिटिश अकॅडेमीच्या निधीसाहाय्याने महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवत आहेत. या सर्व व्यक्ती समाजकार्य शिक्षण-प्रशिक्षण व संशोधनाचे महत्त्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करत आहेत. 

राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह : संकल्पना व उद्दिष्ट
National Association of Professional Social Workers in India (NAPSWI) ही राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांची अग्रगण्य संस्था आहे. ही संघटना म्हणजे भारतातील समाजकार्य व्यवसायाचा बळकट आधारस्तंभ आहे. या संस्थेची स्थापना समाजकार्य व्यवसायाला व्यावसायिक दर्जा, सशक्त धोरणात्मक भूमिका आणि जनमानसात योग्य ओळख मिळवून देण्यासाठी झाली. या संस्थेच्या  माध्यमातून समाजकार्यकर्ते आपली व्यावसायिक ताकद वाढवून सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि समानतेसाठी लढा अधिक प्रभावीपणे राबवत आहेत. नाप्स्वी संस्थेने मागील सहा वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर व्यवसायिक समाजकार्य क्षेत्राची ओळख अधिकाधिक सुस्पष्ट व्हावी म्हणून 15 ते 21 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह राबवण्याची संकल्पना सुरू केली. या सप्ताहाच्या माध्यमातून  समाजकार्याच्या तत्त्वांचा गौरव करणे, समाज कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून नागरिकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी एका विशेष थीमच्या माध्यमातून हा सोहळा साजरी केला जातो. या वर्षाची थीम ही आरोग्याच्या क्षेत्रातील वाढती विषमता व निकड ध्यानात घेऊन ‘आरोग्य क्षेत्रातील समाजकार्य : सेवेतून संवेदनशीलतेकडे’ अशी आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सप्ताहाची औपचारिक सुरुवात अहिल्यानगर येथील पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सीएसआरडी-आयएसडब्ल्यूआर समाजकार्य महाविद्यालयातून झाली. या सप्ताहाच्या उद्घाटनपर भाषणात NAPSWI संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संजय भट्ट व सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी गरीबी, निरक्षरता, अपंगत्व, मानसिक आजार तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव या कारणांमुळे अनेक रुग्ण उपचारांपासून कसे वंचित राहतात आणि अशावेळी समाजकार्यकर्ते 'सेवा आणि संवेदनशीलता यांच्यातील दुवा' बनून आधिक प्रभावीपणे कसे कार्य करू शकतात याचे महत्त्व अधोरेखित करून या राष्ट्रीय साप्ताहाचे महत्त्व विषद केले.

आज आपण 79 वा स्वतंत्रता दिवस जरी धूमधडाक्यात साजरा करीत असलो तरी देशापुढे वाढती बेरोजगारी, सतत वाढत असलेली आर्थिक व सामाजिक विषमता, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, जातीय भेदभाव, लिंगविषमता आणि हवामान बदल या समस्या गुंतागुंतीच्या स्वरूपात आ वासून उभ्या आहेत. समाजकार्य या सर्व प्रश्नांना संवेदनशील, वैज्ञानिक आणि मानवकेंद्री दृष्टीकोनातून पाहते. या सर्व प्रश्नांची जटिलता समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने कटिबद्ध आहे.


हेही वाचा - शक्ती कार्यकर्त्यांची (मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 25) लेखक - मिलिंद बोकील


सहाव्या राष्ट्रीय समाजकार्य सप्ताहाची संकल्पना 
“आरोग्य ही केवळ आजारमुक्ती नाही; ती माणसाच्या संपूर्ण जीवनगुणवत्तेची काळजी घेणारी प्रक्रिया आहे." आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ-तंत्रज्ञान यांच्यासोबतच एक महत्त्वाची, पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी भूमिका म्हणजे समाजकार्यकर्त्यांची. रुग्णालये, पुनर्वसन केंद्रे, मानसिक आरोग्य संस्था, समुदाय आरोग्य प्रकल्प या सर्व ठिकाणी समाजकार्यकर्ते रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनिक, सामाजिक आणि आर्थिक गरजांशी निगडित काम करतात. आरोग्य क्षेत्रातील समाजकार्यकर्त्यांची जबाबदारी केवळ वैद्यकीय उपचारापुरती मर्यादित नसते, तर त्यात रुग्णाच्या मानसिक व भावनिक आधाराची काळजी घेणे, उपचार प्रक्रियेत कुटुंबीयांचा सहभाग वाढवणे, आर्थिक साहाय्य व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून  देणे, पुनर्वसन व दीर्घकालीन देखरेखीचे नियोजन, समुदायात आरोग्य जनजागृती मोहीमा राबवणे या सर्व  बाबींचा समावेश होतो.

समाजकार्य व सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा अतूट संबध आहे. महामारी, नैसर्गिक आपत्ती किंवा औद्योगिक अपघातांच्या काळात समुदाय पुनर्वसन, मानसिक आरोग्य सहाय्य आणि आपत्कालीन मदत या क्षेत्रांत समाजकार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ते वैद्यकीय टीमचा विश्वासार्ह भाग बनून सामाजिक दृष्टीकोनातून आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवतात. त्यामुळे आरोग्यविषयक समाजसेवा हा केवळ वैद्यकीय प्रक्रियेचा भाग नसून, माणसाच्या एकूण स्वस्थतेचा (wellness, wellbeing) प्रवास आहे. या प्रवासात समाजकार्यकर्ते सेवा, संवेदना आणि विश्वासाचा पूल बांधून रुग्णाला संपूर्ण आरोग्याचा अनुभव देतात. त्यामुळेच, आरोग्य क्षेत्रातील समाजकार्य ‘Bridging Care and Compassion : Social Work In Health Setting’ स्वरूपाचे ठरते आणि हीच या वर्षीच्या राष्ट्रीय समाजकार्य सप्ताहाची मूळ संकल्पना आहे. मागील एका आठवड्यापासून महाराष्ट्र, केरळ, ओडीसा, कर्नाटक, दिल्ली या ठिकाणी या वेबिनार, कार्यशाळा, परिसंवाद या माध्यमांतून सप्ताह साजरा करून समाजकार्याचे आरोग्याच्या क्षेत्रातील वाढते महत्त्व याकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या सप्ताहाची सविस्तर माहिती (https://www.napswi.org) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

समाजकार्य महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह राबवला. यामध्ये काही ठिकाणी जागरूकता रॅलीचे आयोजन तर अनेक ठिकाणी कार्यशाळा व चर्चासतत्राच्या माध्यमातून आरोग्याच्या क्षेत्रातील प्रेरणादायी चित्रपट व लघु चित्रपटाचे प्रदर्शन लोकांमध्ये सामाजिक समस्यांविषयी जाणीव जागरूकता वाढावी या दृष्टीने प्रयत्न केले गेले. या सप्ताहामुळे अनेकांना सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची प्रेरणा मिळाली. समाजकार्य हे केवळ व्यावसायिकांची जबाबदारी नाही तर प्रत्येकच व्यक्ती आपल्या घराजवळील शेजाऱ्याची मदत करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, गरजू मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावणे, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे या छोट्या छोट्या कृतींमधूनही समाजपरिवर्तनास हातभार लावू शकते. हा महत्त्वपूर्ण संदेश देखील यातून पोहचवता आला. 

भारतात साजरा केला गेलेला हा राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह हा केवळ दिनदर्शिकेतील सात दिवसांपुरता मर्यादित राहिला नाही तर संवेदनशीलतेतून कृतीशील परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश देणारा उत्सव देखील ठरला. समाजकार्य व्यवसायिक शिक्षणाचे क्षेत्र हे सर्वांनी मिळून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय, सन्मान आणि संधी पोहोचवण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे खरा राष्ट्रविकास तोच जो सर्वासाठी सर्वसमावेशक, शांततापूर्ण, समतामूलक व शाश्वत ठरेल. हाच संदेश या राष्ट्रीय समाजकार्य सप्ताहातून आपणास घेता येईल.

- डॉ.सुधीर मस्के
Sudhir.dssw@gmail.com
(लेखक दिल्ली विद्यापीठातील समाजकार्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.) 

Tags: NAPSWI समाजकार्य व्यावसायिक समाजकार्य समाजकार्यकर्ते कार्यकर्ता प्रशिक्षित कार्यकर्ता Load More Tags

Comments:

Ajay Bagale

आपण लिहिलेला हा लेख आणि आपली ही अप्रतिम लेखनशैली खरंच उल्लेखनीय आहे. आपण सुचविलेले राष्ट्रीय स्तरावरील समाजकार्य काउन्सिल आणि व्यावसायिक समाजकार्यकर्ता हे दोन्ही मुद्दे भारताच्या सद्यपरिस्थितीत व येणाऱ्या काळात खूप उपयुक्त ठरतील.

Ajay Bagale

आपण लिहिलेला हा लेख आणि आपली ही अप्रतिम लेखनशैली खरंच उल्लेखनीय आहे. आपण सुचविलेले राष्ट्रीय स्तरावरील समाजकार्य काउन्सिल आणि व्यावसायिक समाजकार्यकर्ता हे दोन्ही मुद्दे भारताच्या सद्यपरिस्थितीत व येणाऱ्या काळात खूप उपयुक्त ठरतील.

pratik raut

लेख वाचनीय आहे.. यात काही ठिकाणी दिव्यांग हा शब्द वापरला आहे.. आपणास विनंती आहे कि अपंग व्यक्तीसाठी दिव्यांग शब्द न वापरता अपंग हा शब्द वापरावा.. ज्या शरीरातील एक अंग / अवयव पूर्ण श्म्तेने कार्य करू शकत नाही ; त्यात दिव्यत्व कोठून आणि कसे असेल?

Ravindra Chavan

Excellent write up. Congrats.

Add Comment