एंडोमेट्रिओसिस: ओळख, निदान आणि अडथळे (2/3)

एंडोमेट्रिओसिसचे निदान कसे होते किंबहुना, का होत नाही?

लेखाचा पहिला भाग येथे वाचा

जर एखाद्या स्त्रीच्या प्रजननक्षमतेविषयी काही अडचण आली तरच एंडोमेट्रिओसिसची तपासणी करायला लावली जाते. अन्यथा खूप वर्षांपासून असह्य वेदना होऊनसुद्धा अशा प्रकारची चाचणी करणे महत्त्वाचे समजले जात नाही. प्रजनन क्षमतेच्या बाबतीत अशा प्रकारची काळजी घेणे किंवा तपासण्या करणे केव्हाही योग्यच परंतु ते फक्त तेवढ्याच कारणासाठी व्हायला नको. तसेच जे समलैंगिक, ट्रान्स जेंडर आहेत, ज्यांना लग्न करायचं नसेल अथवा स्वतःहून मूल नको असेल तर अशा रुग्णांना योग्य ते उपचार मिळू नयेत का? आणि त्यासाठी डॉक्टर तसेच आपला समाज यांनी प्रयत्न करायला नकोत का?


एंडोमेट्रिओसिसवर उपचार घेण्याच्या प्रक्रियेत येणार्‍या अडचणी 

आता या आजाराची लक्षणे पहिली असता स्त्रियांना वेदना तर होतातच पण आपल्या समाजातील रुढी परंपरांमुळे अजून जास्त त्रास सहन करावा लागतो. याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे हा आजार ज्यांना गर्भाशय असते त्यांना होतो. त्यांच्या वेदनांना तेवढ्याच गांभीर्याने घेतले जात नाही. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे हे इतके स्वाभाविक समजले जाते की, बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बर्‍याच वेळा असेही म्हटले जाते की हे दुखणं नॉर्मल आहे, ते फक्त तुमच्या डोक्यात आहे, इतर गोष्टींमध्ये मन गुंतवले ना, तर वेदना जाणवणार नाहीत. बर्‍याच वेळा डॉक्टर योग्य मार्गदर्शन करत नाहीत. महिलांना लग्न किंवा मूल झाल्यानंतर बरे होईल असे सांगून योग्य उपचार करणे टाळतात. महिलांच्या स्वास्थ्याकडे आपल्या समाजात तसेही दुर्लक्षच केले जाते आणि ते डॉक्टरांकडूनसुद्धा होते. एंडोमेट्रिओसिसच्या बाबतीत डॉक्टरांनी माहिती देण्याऐवजी बर्‍याच वेळेला रुग्णांना स्वतःहून पुढाकार घेऊन एंडोमेट्रिओसिसची माहिती काढावी लागते व तज्ञ डॉक्टरांचा शोध घ्यावा लागतो.

एंडोमेट्रिओसिसचे उशीरा किंवा चुकीचे निदान 

एखाद्या देशामध्ये आरोग्यसेवा अकार्यक्षम असू शकते हे आपण समजू शकतो. परंतु जर ते जगाच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी असे होत असेल तर? असे असूनही महिलांच्या आजाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. व्यक्तीच्या जात, वर्ग, संपत्ती यामुळे आरोग्यसेवेच्या सुविधा मिळण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु व्यक्तीच्या लिंगामुळेसुद्धा आरोग्यसेवा प्राप्त होण्यास अडचणी येतात. आपल्या देशात महिला स्वतःहून खूप जास्त दुखलं खुपलं तरच डॉक्टरकडे जातात. असे असूनही महिलांच्या आजाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सर्वे नुसार जगभरात एंडोमेट्रिओसिस या आजाराचे निदान होण्यास सरासरी दहा वर्षे लागतात. २०२० साली इंग्लंडमध्ये केलेल्या एका सर्वे अनुसार ४३७१ एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलांपैकी ४७% महिलांनी दहापेक्षा जास्त वेळा डॉक्टरांना भेटी दिल्या होत्या तर ७०% पेक्षा जास्त महिलांनी ५ पेक्षा जास्त वेळा डॉक्टरांना भेटी दिल्या होत्या. जर प्रगत देशात अशी परिस्थिती असेल तर भारतात काय परिस्थिती असावी हे आपण विचार करू शकतो. 

एंडोमेट्रिओसिसच्या निदानासाठी सोनोग्राफी, एमआरआय (MRI), ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड, लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) म्हणजे दुर्बिणीतून तपासणी ह्या पद्धती अवलंबवल्या जातात. एंडोमेट्रिओसिसच्या निदानाच्या पद्धती किचकट आणि खर्चिक असल्या तरी आपल्या समाजातील रुढी परंपरांमुळे त्या वापण्याविषयी लोकांमध्ये गैरसमज असतात. त्यामुळे समसयेत अजून भर पडते. भारतीय समाजात महिलांच्या कौमार्य (virginity) आणि प्रजनन क्षमता यावर जास्त भर दिला जातो तसेच विवाहापूर्वी लैंगिक संबंध निषिद्ध मानले जातात यामुळे बहुतेक डॉक्टर तसेच रुग्णसुद्धा अविवाहित स्त्रियांसाठी हे पर्याय मानत नाहीत, ज्यामुळे निदानास आणखी विलंब होतो. तसेच त्यांना वैद्यकीय सुविधा प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होतात. लहान वयात मासिक पाळी मध्ये होणारा त्रास गांभीर्याने घेतला जात नाही मग ते शाळेत असो किंवा डॉक्टरांकडून असो. मुद्दाम असे करत असेल का? किंवा नाटक करत नसेल ना? अशाप्रकारे लहान वयात मासिक पाळीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मी या अभ्यासाच्या निमित्ताने ज्यांना भेटली त्या सगळ्यांना इतका जास्त त्रास आणि वेदना होतात की प्रत्येक महिन्याला त्यांना शाळा, ऑफिस किंवा घरचे काम यापैकी काहीच करायला जमत नाही. त्यांना सुट्टी घेण्याची, आराम करण्याची, प्रसंगी डॉक्टर कडे जाण्याची तसेच मदतीची सुद्धा गरज भासते. त्यांची काही वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचारसुद्धा चालू आहेत. 

प्रियांका म्हणते की “मासिक पाळी सुरू झाल्यापासून मला त्रास सुरू झाला आणि सुरवातीपासूनच मला प्रत्येक महिन्याला दवाखान्यात नेले जायचे. आईवडिलांनी नेहमीच सर्वोत्तम डॉक्टरकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये डॉक्टरांना भेटी देऊनसुद्धा समाधानकारक उपचार मिळाले नाहीत.” प्रियांका अजूनही योग्य डॉक्टरांच्या शोधात आहे. 

तर विक्रमगड तालुक्यातील सावी ताई म्हणाल्या की “प्रत्येक महिन्याचं हे दुखणं. देव पटकन घेऊन जाता तर काय झालं असतं? नुसतं सहन करावं लागत आहे”. सावी ताई यांचे वय चाळीस वर्षे आहे आणि त्यांना दहा ते पंधरा वर्षे झाली आहेत, मासिक पाळीचा त्रास होत आहे. त्यांनी शक्य तितक्या जवळपासच्या डॉक्टरांना भेटी दिल्या आहेत तसेच त्या आयुर्वेदिक उपचार सुद्धा घेत आहेत. त्या मासिक पाळी जाण्याची (रजोनिवृत्तीची) वाट पहात आहेत जेणेकरून त्यांचे दुखणे थांबेल. 

बर्‍याच देशांमध्ये समाज तसेच अग्रभागी असणारी आरोग्य यंत्रणा अपुरी असते. या आरोग्य यंत्रणेतील सेवा पूरवणारे कर्मचारी एंडोमेट्रिओसिसची लक्षणे गांभीर्याने घेण्याइतके प्रशिक्षित नसतात. मासिक पाळीतील त्रास किंवा असह्य वेदना सामान्य नाहीत व यामुंळे व्यक्तीच्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो याची त्यांना जाणीव नसते. एका डॉक्टरांनी मला असेही सांगितले की एंडोमेट्रिओसिस या आजाराची लक्षणे एमर्जन्सी सारखी परिस्थिती तयार करत नाहीत किंवा यामुळे कोणाचा मृत्यू होइल अशी परिस्थिती नसते म्हणून त्यासाठी आरोग्य यंत्रणेत काही बदल करण्याची गरज आहे. एंडोमेट्रिओसिसविषयी असलेल्या मर्यादित जागरूकतेमुळे रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. याव्यतिरिक्त विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एंडोमेट्रिओसिसच्या अचूक निदानासाठी साधनांची कमतरता आहे. आरोग्य यंत्रणेच्या मर्यादित क्षमतेमुळे, उपकरणांची कमतरता व उपचारांसाठी आवश्यक कौशल्ये यांची कमतरता यामुळे एंडोमेट्रिओसिसचे निदान होण्यास काही काळ लागू शकतो. 

डॉ. अभिषेक मंगेशीकर म्हणतात की “जगभरात एंडोमेट्रिओसिसबाबत जागरूकता आणि तज्ज्ञांचा अभाव इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की माझ्याकडे येण्यापूर्वी रुग्णांचे वर्षानुवर्षे चुकीचे निदान आणि त्यांना अपुरे उपचार मिळालेले असतात. साधारणतः मला भेट देण्यापूर्वी रुग्ण सरासरी पाच ते दहा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आलेले असतात. तसेच माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची एखादी-दुसरी अयशस्वी शस्त्रक्रिया झालेली असणे अगदीच सामान्य आहे.” डॉ. अभिषेक मंगेशीकर हे भारतातील नावाजलेले एंडोमेट्रिओसिस तज्ञ आहेत. माझी शस्त्रक्रिया यांनीच केली. ते इंडियन सेंटर फॉर एंडोमेट्रिओसिस (Indian Center for Endometriosis) चालवतात. त्यांचे हे केंद्र जगातील सर्वात मोठ्या एंडोमेट्रिओसिस केंद्रांपैकी एक आहे.

फोटो २. डॉ. अभिषेक मंगेशीकर इंडियन सेंटर फॉर एंडोमेट्रिओसिस, मुंबई येथे.

पितृसत्ताक समाजात प्रजननक्षम राहण्यावर जास्त भर 

मासिक पाळीचा आणि लैंगिकतेचा जवळचा संबंध असल्याने मासिक पाळी येणे सुरू झाले की मुलींवरील बंधने वाढायला लागतात, कारण ती वयात येते. स्त्रियांच्या लैंगिकतेशी कुटुंबाची, समाजाची इज्जत जोडली जाते. पाळी यायला सुरू झाल्यानंतर मुलीचं लग्नसुद्धा लावून दिले जाते. आपल्या पुरुषप्रधान समाजात अविवाहित स्त्री लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय असू शकते हे नाकारले जाते किंवा तसलं काही होऊ नये म्हणून अनेक बंधने घातली जातात. हेच म्हणणे अप्रत्यक्षरीत्या लग्नानंतर त्रास कमी होईल अशा पद्धतीने सांगितले जाते. आपल्या समाजात अजूनही लैंगिकतेबाबत चर्चा करणे म्हणजे मोठं पाप समजलं जाते.

गरोदर राहिल्याने किंवा लग्न झाल्यावर हा आजार बरा होतो किंवा एंडोमेट्रिओसिसचा त्रास होणे कमी होते हे एक मिथक आहे. गरोदरपणात नऊ महिने पाळी येत नाही त्यामुळे होणारा त्रास काही काळ थांबतो किंवा काही काळासाठी तो त्रास पुढे ढकलला जातो इतकेच. एंडोमेट्रिओसिसच्या लक्षणांपैकी वंध्यत्व हे एक लक्षण आहे. याचबरोबर खूप जास्त पोट दुखणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे, आणि इतर इ. लक्षणेसुद्धा आहेत व यामुंळे होणार्‍या वेदना असह्य असतात आणि तरीसुद्धा उपचारादरम्यान प्राधान्य वंध्यत्व येऊ नये यास किंवा प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास दिले जाते. यामुळे महिलांवर आई होण्यासाठी वैद्यकीय आणि सामाजिकदृष्ट्या दबाव येऊ शकतो, जरी त्यांना आई व्हायचे नसले तरी. एंडोमेट्रिओसिस असणाऱ्यांपैकी ३०%-५०% रुग्णांना वंध्यत्व येऊ शकते. जरी असे असले तरी रुग्णांना इतक्या यातना होत असतात की ते स्वतःच्या प्रजनन क्षमतेविषयी विचारसुद्धा करत नाहीत. त्यांना फक्त होणार्‍या त्रासातून मुक्त व्हायचे असते. एंडोमेट्रिओसिसच्या बाबतीत रुग्णांना होणार्‍या प्रचंड वेदना आणि प्रजनन क्षमता यांना समान महत्त्व देणे गरजेचे आहे.

एंडोमेट्रिओसिस असल्याने प्रजननक्षमता कमी होते याचा इतक्या मोठ्या प्रमाणात बागुलबुवा करून ठेवला आहे की इंटरनेट वर जर एंडोमेट्रिओसिस विषयी शोध घेतला तर जास्त करून एंडोमेट्रिओसिस आणि वंध्यत्व यावर माहिती दिसते. मुळात एंडोमेट्रिओसिस या आजाराचा संबंध मोठ्या प्रमाणात वंध्यत्वाशी जोडला जातो. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. वाडा तालुक्यातील भाविका म्हणते की तिने प्रजननक्षमता यावर डॉक्टरांना भेट दिली असता त्यांनी एंडोमेट्रिओसिसची चाचणी करायला सांगितले. मासिक पाळी आल्यावर तिला जास्त काही त्रास होत नाही. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. यावरून आपण असा तर्क लावू शकतो की जर प्रजननक्षमतेविषयी काही अडचण आली तरच एंडोमेट्रिओसिसची तपासणी करायला लावली जाते परंतु खूप वर्षांपासून असह्य वेदना होऊनसुद्धा अशाप्रकारची चाचणी करणे महत्त्वाचे समजले जात नाही. अशा प्रकारची काळजी घेणे किंवा तपासण्या करणे केव्हाही योग्यच परंतु ते फक्त ठराविक कारणासाठी नको व्हायला. तसेच जे समलैंगिक, ट्रान्स जेंडर आहेत किंवा ज्यांना लग्न करायचं नसेल अथवा स्वतःहून मूल नको असेल तर अशा रुग्णांना योग्य ते उपचार मिळू नयेत काय? आणि त्यासाठी डॉक्टर तसेच आपला समाज यांनी प्रयत्न करायला नकोत का? 

अनुजा म्हणतेय की ठाण्याला एंडोमेट्रिओसिस तज्ञांनी तिला असा सल्ला दिला की, मूल झाल्यानंतर त्रास कमी होईल. ती म्हणते की एंडोमेट्रिओसिस तज्ञांकडून तरी असे उत्तर अपेक्षित नव्हते. अनुजाच्या मते एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी योग्य डॉक्टर शोधणे कठीणच आहे. तिच्या म्हणण्यानुसार महिलेला माणूस म्हणून पाहिले पाहिजे. तिला वर्तमानकाळात किती त्रास होतो याकडे लक्ष न देता ती भविष्यात आई होण्यासाठी कशी सक्षम राहील याकडे जास्त लक्ष देतात. तर प्रियांका म्हणतेय की, ज्या डॉक्टरांना भेटी दिल्या त्यांनी सांगून सांगून इतके डोक्यात बसले की आईवडिलांनासुद्धा हेच वाटायला लागले की लग्नानंतर त्रास बरा होईल. 

मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. जोवर स्त्रीला पाळी येत नाही तोवर तिला पूर्णत्व नाही अशी समाजात धारणा आहे. त्यामागील कारण म्हणजे पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. मूल होत नसेल तर महिलेला समाजात किती त्रास सहन करावा लागतो हे तर आपल्याला माहीतच असेल. पाळी आणि मातृत्व यांचा जवळचा संबंध असला तरी स्त्रीचे अस्तित्व फक्त मूल-बाळ एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? आपला वंश पुढे चालला पाहिजे याकडे लक्ष दिले जाते. सध्या विज्ञानाच्या मदतीने अनेक उपाययोजना करणे शक्य आहे. मूल दत्तक घेण्यासारखे पर्याय उपलब्ध असले तरी महिलांवर नैसर्गिकरित्या आई होण्यासाठी दबाव खूप असतो. मातृत्वाशिवाय स्त्रीजीवनाचे सार्थकच होऊ शकत नाही असा गैरसमज आपल्या समाजात रूढ झालेला आहे. 

संशोधनास प्राधान्य दिले जात नाही

पुरुषांपेक्षा स्त्रियांना त्यांच्या वेदनांवर उपचार मिळण्याची, त्यांच्या आजारांची लक्षणे गांभीर्याने घेण्याची किंवा लवकर निदान होण्याची शक्यता कमी असते कारण वैद्यकीय चाचण्यांमध्ये (ज्यामुळे प्रभावी उपचार शोधणे कठीण होते) महिलांची शरीरे आणि त्यांच्या शरीरावर प्रामुख्याने परिणाम करणाऱ्या गोष्टींचा अभ्यास कमी प्रमाणात होतो. जे आजार जास्त करून पुरुषांना होतात किंवा स्त्री आणि पुरुष दोघांना होतात अशा आजारांवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधनावर जास्त भर दिला जातो. महिलांना होणार्‍या आजारांच्या संशोधनावर कमी प्रमाणात लक्ष दिले जाते. उदा गर्भाशयाचा कॅन्सर, पीसीओएस /पीसीओडी सारख्या आजारांवर संशोधन करण्यास निधी कमी वापरला जातो. २०२२ मध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूलने केलेल्या एका सर्वेनुसार, २०१९ यावर्षी कॅन्सर, ह्रदयासंबधी आजार आणि मनोविकार या तीन आजारांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये फक्त ४०% महिलांचा समावेश केला होता. हे आजार महिलांना होण्याची शक्यता जास्त असते असे असले तरी अशा चाचण्यांमध्ये त्यांच्या आरोग्याचा विचार जास्त केला जात नाही. अमेरिकेत अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) १९९३ मध्ये वैद्यकीय चाचण्यांमध्ये महिलांचा समावेश करणे अनिवार्य केले कारण त्याआधी अशा चाचण्यांमध्ये प्रजननक्षम महिलांना म्हणजेच १५-४९ या वयोगटातील महिलांना समाविष्ट केले जात नसायचे, आणि त्याचे प्रमाण अजूनही कमीच आहे. 

२०२१ मध्ये स्वतंत्र संशोधक आर्थर मिरिन यांनी यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) द्वारे विविध रोगांसाठी निधीचे वाटप दर्शविणाऱ्या डेटाचा अभ्यास केला. त्यांनी गोळा केलेल्या डेटाद्वारे निधी देण्याच्या वर्तनात लैंगिक असमानतेची व्याप्ती तपासली आणि असे आढळले की स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या रोगांपेक्षा पुरुषांना प्रभावित करणाऱ्या रोगांसाठी जास्त निधी वाटप करण्यात आला. आरोग्यसेवेमध्ये रूढ असलेली पितृसत्ता आणि स्त्रियांविषयी भेदभावामुळे महिलांना आरोग्यसेवा मिळण्यास अडचणी निर्माण होतात. विशेषतः प्रजनन आरोग्यासंबंधी (Reproductive Health) उपचार घेत असताना त्यांना सन्मानपूर्वक वागणूकही मिळत नाही. यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो तसेच एंडोमेट्रिओसिस (किंवा अशाप्रकारच्या समस्या) असलेल्या महिलांना जास्त होतो. आपल्या देशातसुद्धा महिलांच्या आरोग्यावर खर्च करताना सरकार प्राथमिक लक्ष माता आरोग्यावर देते जे गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित आहे परंतु स्त्रीरोगविषयक आजार जसे की पीसीओएस, पीसीओडी आणि एंडोमेट्रिओसिसकडे दुर्लक्ष केले जाते.

अमेरिकेच्या ओरेगॉन हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मासिक पाळी मध्ये वापरण्यात येणारी उत्पादने जसे की सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स, मासिक पाळीचा कप, इत्यादींची चाचणी २०२३ मध्ये पहिल्यांदा मानवी रक्त वापरून करण्यात आली. याआधी या उत्पादनांची शोषकता प्रत्यक्ष रक्ताने कधी मोजलीच गेली नव्हती. तर याआधी मीठ पाणी, साधे पाणी किंवा सलाईन वापरून चाचण्या केल्या जायच्या. मासिक पाळी ही नेहमीच संवेदनशील बाब मानली जाते व त्यामुळे मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल उघडपणे चर्चा करणे टाळले जाते. तसेच मासिक पाळी संबंधित सांस्कृतिक आणि सामाजिक गैरसमज व नियमांमुळे मासिक पाळी निषिद्ध मानली जाते. याचा परिणाम या विषयावरील संशोधनावरसुद्धा होतो. याचबरोबर विविध देशांतील राजकीय वातावरणाचासुद्धा अशा संशोधनांवर परिणाम होतो. सध्या अमेरिकेत चालू असलेल्या प्रजनन आरोग्यासंबंधी राजकीय आणि कायदेशीर लढाया (गर्भनिरोधक, सुरक्षित गर्भपात, लैंगिक हक्क, इ.) प्रजनन आरोग्य सेवेवर थेट परिणाम करतात.

अपुर्‍या वैद्यकिय सुविधा आणि तज्ञांचा अभाव

एंडोमेट्रिओसिसचे निदान उशीरा होणे किंवा डॉक्टरांकडून चुकीचे निदान केले जाणे यामागे एंडोमेट्रिओसिसविषयी जागरूकता नसणे याबरोबरच योग्य वैद्यकीय सामग्री नसणे जसे की एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी विशेष दवाखाने नसणे तसेच एंडोमेट्रिओसिस तज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असणे ही महत्वाची कारणे आहेत. तसेच सध्या वैद्यकीय सेवेत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ एंडोमेट्रिओसिसचा योग्य उपचार करण्यासाठी तितकेसे प्रशिक्षित नसतात. म्हणून बर्‍याच वेळा परिपूर्ण उपचार केला जात नाही.

प्रियांकाला एंडोमेट्रिओसिसचे निदान झाले असले तरी सध्या तिला गर्भनिरोधक गोळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे. एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी हार्मोन्सच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या देणे उपचार पद्धतीमध्ये अगदीच सामान्य आहे. या उपचारांमुळे त्रास काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो. परंतु होणारा त्रास कायमचा बंद होईल असे अजिबातच नाही. बर्‍याच वेळा या गोळ्यांमुळे मासिक पाळी येणे पुढे ढकलले जाते, जेणेकरून पाळी आल्यावर होणारा त्रास काही काळ पुढे ढकलला जाईल किंवा काही काळासाठी त्रास बंद होईल. या अभ्यासासाठी मी ज्यांना भेटली आहे त्या सगळ्यांसाठी ही उपचारपद्धती अवलंबविली आहे. यामध्ये बर्‍याच वेळेला डॉक्टर रुग्णाला याबाबतीत माहिती सुद्धा देत नाहीत. परंतु या गोळ्या घेतल्याने त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो याकडे दुर्लक्ष केले जाते. 

एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव परिणामकारक उपाचाराचा मार्ग आहे ज्यामध्ये बाधित भागातून प्रत्यक्षात एंडोमेट्रिओसिसचे सिस्ट बाहेर काढतात. याव्यतिरिक्त अशा वैद्यकीय उपचार पद्धती उपलब्ध आहेत की जे लक्षणे विशेषतः वेदना व्यवस्थापित करण्यास मदत करतात. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या, हार्मोनल थेरपी किंवा वेदना कमी करण्यासाठी औषधे अशा उपचारपद्धती अवलंबवता येतात. 

फोटो ३. डॉ. अनिता महाले त्यांच्या जव्हार, पालघरमधील हॉस्पिटलमध्ये

आपल्या देशात एंडोमेट्रिओसिस तज्ञांची कमतरता खूपच आहे. मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये थोड्याफार प्रमाणात डॉक्टर असले तरी छोटी शहरे आणि खेड्यांमध्ये तर एंडोमेट्रिओसिस तज्ञ नसतात. ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव व तज्ञांची कमतरता यामुळे काय उपचार घ्यावेत याबाबत माहितीचा अभाव आहे. डॉ. मंगेशीकरांकडे जगभरातून रुग्ण येतात. परंतु त्यांच्याकडे ग्रामीण भागातून खूपच कमी रुग्ण येतात. त्यांच्या मते जगभरात फक्त जवळपास २०० एंडोमेट्रिओसिस तज्ञ आहेत आणि त्यापैकी फक्त ४०-५० डॉक्टर उच्च पातळीची (advanced level) शस्त्रक्रिया करतात. इतक्या मोठ्या संख्येसाठी इतके कमी तज्ञ असणे ही खेदाची बाब आहे. 

डॉ. अनिता महाले (स्त्रीरोगतज्ज्ञ) जव्हार येथे जवळपास पंधरा वर्षांपासून हॉस्पिटल चालवत आहेत. त्यांच्या मते या भागात उपचारांसाठी कमी पर्याय उपलब्ध आहेत. जव्हार तालुक्यात त्यांचे हॉस्पिटल आणि सरकारी दवाखाना सोडला तर कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीयेत. महिलांना उपचारासाठी शक्यतो शहरात म्हणजेच नाशिक किंवा सिल्वासा (दीव व दमण) ला जावे लागते. ही दोन्ही शहरे जव्हारपासून जवळपास ८० किलोमीटरच्या अंतरावर आहेत. किंवा वाडा, धूंदलवाडी (डहाणू) सारखे पर्याय उपलब्ध असले तरी तेसुद्धा जास्त जवळ नाहीत. 

**या लेखात सहभागींची नावे बदलली आहेत. 

- तनुजा हरड
tanuja.harad@gmail.com

Tags: साधना युवा अभ्यासवृत्ती 2024 अनिल अवचट अभ्यासवृत्ती तांबे रायमाने अभ्यासवृत्ती स्त्रियांचे आरोग्य प्रजनन आरोग्य एंडोमेट्रिओसिस endometriosis Load More Tags

Add Comment