सूडनाट्यापलीकडे जाऊ पाहणारा 'असुरन'

धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे योग्यच होते. 

‘असुरन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट तमीळ सिनेमा पुरस्कार आणि सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (विभागून) मिळाला. पूमनी यांनी लिहिलेल्या ‘वेक्कई’ नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा जातिभेदासारखा विषय हुशारीनं मांडतो. ‘जात’ हा शब्दही न उच्चारता तो त्या शब्दाखाली पिचलेल्या समाजाची आणि त्यांच्या उद्रेकाची-विवेकाची वास्तवपूर्ण कहाणी सांगतो. वेत्री मारनसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने त्याच्या ‘इंटरोगेशन’, ‘वाडा चेन्नई’ या सिनेमांप्रमाणे याही सिनेमातून प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा अनुभव दिला आहे...

पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब! एक पाय पाण्यात पडतो आणि ते शांत चित्र डुचमळून जातं. ‘असुरन’ सिनेमाचा हा पहिलाच शॉट!

पन्नाशी गाठलेला बाप डोक्यावर पिशवी घेऊन घनदाट जंगलातील नदीच्या पात्रातून आजूबाजूचा कानोसा घेत सावधपणे चालला आहे. त्याच्या मागोमाग त्याचा बारापंधरा वर्षाच्या मुलगा आहे. नदीचे पाणी छातीपर्यंत येते. दोघे पिशव्या डोक्यावर घेऊन चालू लागतात.

“बाबाऽ माझ्या पिशवीतले बॉम्ब भिजतील!”

“कशाला आणलेस मग ते?” तो थकल्या, शांत आवाजात मागे वळत विचारतो. ती पिशवी स्वतःकडे घेतो. पुन्हा आजूबाजूचा कानोसा घेत चालू लागतो.

“बाबाऽ यापेक्षा नदीच्या काठानं गेलेलं सोपं पडलं असतं!”

बाप आजूबाजूची नजर न काढता म्हणतो, “ते आपल्यापेक्षा आपल्याला शोधणाऱ्या लोकांना सोपं पडलं असतं.”

दोघे नदीच्या पलीकडच्या काठाजवळ येतात. बाप म्हणतो, “सरळ बाहेर जाऊ नकोस. उलटा चालत जा!” दोघे सावधपणे उलटे चालत बाहेर पडतात. त्यांच्या पावलांचे उलटे ठसे नदीकाठच्या ओल्या मातीत उमटतात...

वेत्री मारनने दिग्दर्शित केलेला ‘असुरन’ हा सिनेमा पहिल्याच दृश्यापासून सिनेमाची आणि विषयाची बैठक पक्की करत जातो. त्या दृश्याच्या चौकटीत वावरणारे भय, कुणाला चाहूल न लागता, पाऊलखुणा न सोडता चालण्याची-जगण्याची तऱ्हा हे सिनेमातील विशिष्ट समाजाच्या जगण्याचा भाग आहे. उच्च वर्गाच्या नजरेस न येता, त्यांच्या डोळ्यांत न खुपता, आडोशाने जिवंत राहणारी ही माणसे.

‘असुरन’ सिनेमा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते लेखक पूमनी यांच्या ‘वेक्कई’ नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे. सिनेमाची कथा 1950-60 ते 1980 अशा कालखंडात घडते.

सिनेमा सुरू होतो 1980च्या काळात! सिवा सामी (धनुष) हा हीन दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील सर्वसाधारण शेतकरी. दिवसा काम करून रात्रू दारू पिऊन तर्रर्र होणारा! तो, त्याची बायको पचियम्मा (मंजू वॉरिअर),  तरुण मुलगा मुरुगन (टी जय अरुनासलम), लहान मुलगा चिदंबरम (केन करुनास) आणि एक लहान मुलगी यांच्यासोबत गावात राहून शेती करत असतो. 

सिवा सामी दारुडा असला तरी त्याची बायको-मुले त्याचा आदर करतात. त्याच्या शेजारच्या शेताचा मालक जमीनदार नरसिंहन (अदुकलम नरेन) हा त्याचे शेत बळकवण्याच्या प्रयत्नात आहे. तो आणि त्याची मुले सिवा सामीच्या शेतातले पाणी उपसून घेतात. सिवा सामीचा मुलगा मुरुगन हा उसळत्या रक्ताचा तरुण. तो जमीनदाराच्या मुलांशी दोन हात करत भिडतो. सिवा सामी मात्र पंचायतीच्या समोर गाऱ्हाणे मांडून समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा लहान मुलगा चिदंबरम बापाच्या या बोटचेप्या स्वभावामुळे त्याच्यावर राग धरून असतो. 

इकडे नरसिंहनला खालच्या जातीतील मुरुगनचे बंड सलत राहते. तो मुरुगनची हत्या घडवून आणतो. आतातरी आपला बाप पेटून उठेल अशी चिदंबरमची अपेक्षा फोल ठरते. मुरुगनच्या मृत्यूच्या दुःखात चूर झालेला सिवा सामी दारू पिऊन येतो. पचियम्मा मुलाचा मृत्यू स्वीकारू शकत नाही. आईच्या मनाला उतारा मिळावा म्हणून चिदंबरम सूड घ्यायचे ठरवतो आणि नरसिंहनवर कोयत्याने वार करून त्याचा जीव घेतो. नरसिंहनची मुले बापाच्या मृत्यूने आणि खालच्या जातीतल्या पोराच्या आक्रमकपणामुळे पिसाळतात. ती त्यांचे गुंड आणि त्यांना मिंधे असलेले पोलिस यांच्या साहाय्याने सिवा सामीच्या कुटुंबाचा काटा काढण्यासाठी त्यांचा शोध घेऊ लागतात. तशा परिस्थितीत आपले कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी सिवा सामी जे निर्णय घेतो ते ‘असुरन’ सिनेमामध्ये पाहायला मिळते.

दिग्दर्शक वेत्री मारनची सिनेमातल्या नाट्यावर विलक्षण पकड आहे. ‘असुरन’ सुरू होतो तो एक महत्त्वाची घटना घडून गेल्यानंतरच्या तणावपूर्ण वातावरणात! सिनेमा सुरू झाल्यानंतरची काही दृश्ये केवळ संवादपूर्ण दृश्य आहेत. ना धावपळ, ना मारधाड... मात्र तरीही केवळ संवादांमधून निर्माण होणारा तणाव प्रेक्षकाला असह्य होत जातो. साध्या-साध्या वाटणाऱ्या प्रसंगांमधून विलक्षण ताण निर्माण करणे ही वेत्री मारनची हातोटी आहे. ती बाब त्याच्या सर्वच सिनेमांमध्ये पाहायला मिळते. 

‘असुरन’मधला हिंसाचार स्टायलाइज्ड किंवा ग्लोरिफाईड नाही. तो चवीने आनंद घेत पाहता येत नाही. ती दृश्ये अंगाचा थरकाप उडवतात. वेत्री मारनचा पात्रांबाबतचा विचार बारकाईचा असतो. तो त्यांना साचेबद्ध किंवा आकर्षक पद्धतीने मांडत नाही. त्याची पात्रे खरीखुरी माणसे वाटतात. त्यांना भावना-विचार असतात आणि स्वानुभवांची चौकट असते. त्यांच्यावर भूतकाळाचे ओझेदेखील असते. ती पात्रे त्या चौकटीत राहूनच निर्णय घेतात, कृती करतात.

‘असुरन’मधल्या स्त्री-व्यक्तिरेखा विशेष वाटतात. पचियम्मा, मरियम्मल या स्त्रिया खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजात जन्माला आलेल्या आहेत... मात्र तरी त्या कणखर आहेत. त्या धीटपणे निर्णय घेतात. त्या समाजाचा चिवटपणा, विशेष करून स्त्रियांमधली सोशीकता आणि त्यांचा खंबीरपणा ही त्यांची शक्तिस्थाने असल्यासारखी चितारली गेली आहेत. त्या स्त्रीपात्रांची बोलीदेखील तेवढीच आक्रमक आहे. 

वेत्री मारनची पात्रे सो कॉल्ड सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली त्यांच्या लॉजिकल कक्षेच्या बाहेर जात नाहीत. ‘असुरन’मध्ये सिवा सामी स्वतःचा मुलगा मरण पावल्यानंतरसुद्धा चवताळून उठत नाही याचं सयुक्तिक कारण आहे आणि तो या सिनेमाचा महत्त्वाचा पैलू आहे. ते कारण सिवा सामीच्या भूतकाळात दडलेले आहे.

सिनेमाचा 1950-60च्या दशकात घडणारा फ्लॅशबॅक सिवा सामीचे अगदी वेगळे रूप दाखवतो. त्या फ्लॅशबॅकमध्ये एका नीडर, आत्मविश्वासपूर्ण माणसाचे वाकून, मान खाली घालून जगणाऱ्या माणसात कसे रूपांतर होते याची मन सुन्न करणारी कथा आपल्याला दिसते. सिनेमात मध्यांतरापर्यंत प्रेक्षकांना दोन भिन्न स्तरांत राहणाऱ्या माणसांमध्ये जातीबाबतचा वाद आहे हे जाणवत असते... मात्र तोपर्यंत जात हा मुद्दा कुठेच उच्चारला जात नाही. त्याची प्रथम स्पष्टता येते ती मध्यांतरानंतर! तेव्हा प्रेक्षकाच्या मनात विचार येतो की, जी गोष्ट सिनेमाने आत्तापर्यंत दाखवली नव्हती, सुचवलीसुद्धा नव्हती ती आपल्याला कळली कशी? आणि मग ‘जी जात नाही ती जात!’ या वाक्याचे भीतिदायक आकलन होते. 

आजपासून पन्नास ते सत्तर वर्षे मागच्या काळात घडणारा ‘असुरन’ वर्तमानात तेवढाच ताजा, खरा भासू लागतो. सोबत आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. ‘असुरन’मधील फ्लॅशबॅक पाहताना बाबा आढाव यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकात मांडलेले ग्रामीण भागातील भीतिदायक वास्तव आठवते. विशेषतः सिवा सामीचा सर्वांची माफी मागण्याचा किंवा मध्यांतरानंतर मरियम्मल या पात्राने पायात चप्पल घातल्यानंतरच्या प्रसंगासारखे प्रसंग फारच अंगावर येतात.

‘असुरन’मध्ये तीन भिन्न प्रकारचे वाद अस्तित्वात असलेले दिसतात आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा घडते. त्यांतील प्रादेशिक म्हणजे एक वाद उत्तरेकडील गावे आणि दक्षिणेकडील गावे असा आहे. दुसरा वाद जमिनीचा, स्थानिक पातळीवरचा. जमीनदारासारख्या मोठ्या सशक्त, ताकद एकवटलेल्या माणसांनी दुर्बल शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो... तर तिसरा वाद आहे तो जातींमधला. वेत्री मारनच्या दिग्दर्शनाचे कौशल्य हे की, तो सिनेमातील घटनाक्रम, हिंसाचार या सगळ्या गोष्टी खासगी स्वरूपाच्या वादातून निर्माण झाल्यासारख्या सादर करतो आणि त्यांच्या पार्श्वभूमीला जातीयवादाचा मुद्दा अधोरेखित करतो. सिनेमाच्या अखेरीला सिवा सामी त्याच्या मुलाला जातीयवाद, हिंसाचार या प्रश्नांवरचे जे उत्तर सुचवतो ते ओळखीचे असते... मात्र ते ज्या तऱ्हेने, ज्या घटनांनंतर प्रेक्षकापर्यंत पोहोचते त्यामुळे त्याची गंभीरता अधिक जाणवते.

सिनेमात सर्वच अभिनेत्यांची कामे वाखाणण्यासारखी झाली आहेत... मात्र धनुषने साकारलेले सिवा सामी हे पात्र विशेष आहे. ते सिनेमातील मध्यवर्ती पात्र आहे म्हणून नव्हे... तर ते पात्र हिंसेचा, स्वतःच्या समाजाचा, कुटुंबाचा ज्या पद्धतीने विचार करते ते फार महत्त्वाचे आहे. 

अभिनयाच्या पातळीवर धनुषने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्याने 1950-60च्या दशकातील सिवा सामी आणि वीस वर्षांनंतरचा, स्वभाव आणि शरीर या दोहोंमध्ये बदल झालेला सिवा सामी अशी त्या पात्राची दोन रूपे उत्तमरीत्या साकारली आहेत. त्या दोन्ही काळांतील वय-अनुभव यांना अनुसरून दिसणारा त्या पात्राचा आक्रमकपणादेखील सारख्याच प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. 

धनुषला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे योग्यच होते. त्याला पचियम्माच्या भूमिकेत तेवढीच उत्तम साथ देणारी मंजू वॉरिअर ही मल्याळम अभिनेत्री. तिचा हा पहिलाच तमीळ सिनेमा... मात्र तिने भाषेचा अडसर जाणवू न देता ही भूमिका सशक्तपणे वठवली आहे. मुरुगनची भूमिका करणाऱ्या टी जय अरुनासलमच्या वाट्याला केवळ चारपाच दृश्ये आली आहेत... मात्र तेवढ्यातसुद्धा त्याने स्वतःची छाप सोडलेली आहे. प्रकाश राज या उत्तम अभिनेत्याने वकिलाची लहानशी भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे.

‘असुरन’चा कालपट मोठा आहे. तो हिंसाचाराच्या सावलीत जगणाऱ्या दोन पिढ्यांची कथा सांगतो. माणसांचे निर्णय त्यांच्या भविष्यावर आणि कुटुंबांवर कसे परिणाम करतात याची झलक सादर करतो आणि दमन, अन्याय, बंड, हिंसा, सूड या घातचक्रामध्ये माणसाचा विवेक किती महत्त्वाचा आहे याचे सूतोवाच करतो. ‘असुरन’ हा अंगावर काटा आणणारा अनुभव आहेच... शिवाय तो प्रेक्षकाला विचारप्रवृत्तदेखील करतो.

(‘असुरन’ सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.)

- किरण क्षीरसागर
kiran2kshirsagar@gmail.com

Tags: लेख चित्रपट सिनेमा असुरन किरण क्षीरसागर धनुष Marathi Cinema Asuran Kiran Kshirsagar Dhanush Load More Tags

Add Comment