सावधान! तुम्ही जोकर तयार करताय

Photo Source: Warner Brothers

माझा मित्र सिनेमावाला असल्यामुळं अत्यंत मन लावून, न हालचाल करता आणि एक शब्दही न बोलता तो सिनेमा पाहतो. मी सुरवातीला पाय सोडून बसते, मग मांडी घालून बसते. सिनेमातलं मला काही आवडलं वा खटकलं तर लगेच खुसपूस करून सांगते. त्यामुळे एकत्र सिनेमा बघणं हे जरा जिकिरीचंच काम असतं. त्यादिवशी आम्ही 'जोकर' सिनेमा बघायला गेलो आणि इंटर्वलच्या १२ मिनिटांच्या ब्रेकसकट माझी नजर, लक्ष आणि पाय क्षणभरासाठी देखील हलले नाहीत. हां, मन मात्र संपूर्ण हलून गेलं होतं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या कोणालातरी सोबत घेऊनच हा सिनेमा बघायला हवा. नाहीतर तुम्ही हरवून जाऊ शकता, भरकटू शकता किंवा तुम्हाला खरंच वाटही सापडू शकते. जोकर बघून तुम्ही तुमच्या सुरक्षित वातावरणात परत येऊ शकत नाही एवढं नक्की. म्हणून प्रेमाच्या माणसासोबत हा सिनेमा बघितला तर ते प्रेम आपल्याला घरी सुखरूप आणू शकतं.

खरंतर जोकर हे पात्र मला पहिल्यांदा भेटलं ख्रिस्तोफर नोलानच्या The dark knight मध्ये. मग The dark knight Rises मध्ये. बॅटमॅन हा त्यामधील हिरो; पण त्याच्या बरोबरीने व्हिलन देखील गाजला. DC, MARVELS या कॉमिक्सची चढाओढ, बॅटमॅनच्या बरोबरीने जोकर या व्हिलनला मिळालेली लोकप्रियता, वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या वेळी साकारलेलं जोकर हे पात्र,  जोकर सिनेमात कॉमिक बुक मधले साधलेले आणि निसटलेले संदर्भ, इटलीमधील वेनिस प्रीमियर इथे मिळालेलं आठ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन, सायको थ्रिलर थेअरी-सोशल इश्युज थेअरी- कॉमिक बुक थेअरी... अशी सगळी माहिती सिनेमा पाहण्याआधीच गुगलच्या एका क्लिकवर मिळाली. आणि तरीही मला जे सिनेमा बघताना जाणवलं ते या कुठल्याही माहितीतून आलं नव्हतं.

मी जोकर पाहिला तोपर्यंत त्यावर बऱ्यापैकी लिहून वगैरे आलं होतं. ती सगळी परीक्षणं मी वाचली होती. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या सिनेमाकडे वेगवेगळ्या अँगल्सनी बघत असल्याचं समजलं. माझी नजर मात्र सामान्य प्रेक्षकाची आहे. एखादा सिनेमा, नाटक, मालिका दर्जेदार आहे असं केव्हा म्हणता येईल? त्याचा एक निकष असा असू शकतो की त्याची कथा कुठल्याही भाषेत, कुठल्याही फॉर्ममध्ये परिणामकारक असते, सर्व तांत्रिक बाबी काढून टाकल्यानंतरही ती कथा एकसंध उरते, आठवते आणि दुसऱ्याला सांगता येते,  कलाकृतीमधले कुठलेही छुपे संदर्भ न समजता देखील ती पोचते,  काळाची बंधनं तोडून टिकून राहते. जोकरची कथा तशीच आहे.

'जोकर'मधला आर्थर फ्लेक Joaquin Phoenix याने साकारला आहे. हा आर्थर गॉथम शहरामध्ये आपल्या आईसोबत राहतो. हे काल्पनिक शहर आहे. हे शहर Laura Balinger या कलादिग्दर्शकानं निव्वळ या सिनेमासाठी उभं केलंय. आर्थर जोकरचं काम करत असतो. रस्त्यावर जाहिरातीचे बोर्ड घेऊन उभं राहणं, पार्टीजमध्ये जोकर बनून लोकांचं मनोरंजन करणं, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून असणाऱ्या मुलांना जोकर बनून हसवणं अशी वेगवेगळी कामं हा जोकर करतो. अशा जोकर पुरवणाऱ्या एका एजंटकडे आर्थर पगारी काम करतोय. सिनेमा सुरु होतो तेव्हा आर्थर आरशात बघत जोकरसाठीचा मेकअप करतोय. इथे फ्रेममध्ये आपल्याला बॅटमनचा संदर्भ दिसतो. अख्ख्या सिनेमाभर असे कॉमिक वा बॅटमॅनच्या सिनेमाचे संदर्भ पेरलेले आहेत. पण मी त्या सगळ्यांचा उल्लेख इथे करणार नाही कारण कथा आणि त्याचा परिणाम या संदर्भाहून खूप मोठा आहे; जोकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हे संदर्भ माहितच असायला हवेत असं मुळीच नाही.

मेकअप केलेला जोकर जाहिरातीची पाटी हातात घेऊन गजबजलेल्या रस्त्याच्या फुटपाथवर उभा राहतो. रस्त्यावरून जाणारी ३-४ सुखवस्तू तरुण मुलं सहज गम्मत म्हणून त्याच्या हातातली पाटी पळवतात. जोकर जीव तोडून त्यांचा पाठलाग करतो. या पाठलागाच्या सीनपासून सीनेमेटोग्राफरची एन्ट्री होते. अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असणं आणि ते कलात्मकतेने वापरता येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. Lawrence Sher चा कॅमेरा आपल्याशी बोलतो पण त्याचवेळी  कुठेही तो कथा ओलांडून पुढे जात नाही, कथेत मिसळून करामती दाखवत राहतो. पुढे जोकर त्या मुलांना गाठतो पण ते त्याला थोडी मारहाण करून जाहिरातीची पाटी मोडून टाकतात. तो जमिनीवर पडतो. इथे सिनेमाच्या म्युझिकची एन्ट्री आहे. ‘जोकर’चं पार्श्वसंगीत एकट्याने ऐकू नये अशी सूचना त्यांनी सिनेमाच्या सुरवातीला द्यायला हवी, इतकं ते जादुई, मनोहारी आणि विस्कटून टाकणारं आहे.

चाळवजा घर आणि झोपून असणारी आजारी आई हे आर्थरचं विश्व आहे. अस्वस्थ झाला की तो हसत सुटतो. मग त्या हसण्यावर त्याचं नियंत्रण राहत नाही. त्यासाठी त्याचे मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार चालू आहेत. त्याची डॉक्टर सरावाने त्याला प्रश्न विचारते. तो मात्र अत्यंत प्रामाणिकपणे त्याची उत्तरं देतोय.

आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 'जोकर'चा दिग्दर्शक Todd Philips याने यापूर्वी 'Hangover'सारखा अत्यंत विनोदी सिनेमा बनवलेला आहे. आर्थरला स्टॅन्डअप कॉमेडियन व्हायचंय. जोकरमध्ये स्टॅन्डअप कॉमेडियन म्हणून फेल गेल्यानंतर आर्थर म्हणतो, 'I used to think that my life was a tragedy; but now I realized it’s a fin comedy’. 

सिनेमातील Murray Franklin या स्टॅन्डअप कॉमेडियनचा आर्थर मोठा फॅन आहे. Murray चं पात्र साकारलं आहे Robert De Niro यांनी. आर्थर त्याच्या शोमध्ये एकदा प्रेक्षक बनून जातो आणि याच शोमध्ये शेवटी आर्थरला पाहुणा म्हणून बोलावलं जातं. आर्थरचा जोकर या शो मधूनच मोठा होतो. तो कसा हे तुम्ही सिनेमातच पहा.

आर्थर वेगवेगळ्या कॉमेडी शोज् ना जाऊन नोट्स काढतो. जोक लिहितो. एकदा हिम्मत करून तो परफॉर्म देखील करतो. पण मंचावर गेल्यावर अस्वस्थ झाल्याने तो खूप हसू लागतो, त्याच्या हसण्यावर त्याचं नियंत्रण राहत नाही. तो तशाही परिस्थितीत जोक सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं हसू थांबत नाही. थोड्याच वेळात त्याचं हसू थांबून तो जोक नीट सांगायला लागतो आणि लोकही हसायला लागतात. पण Murray च्या शो मध्ये आर्थरच्या स्टॅन्डअप मधील तो सुरवातीचा हसण्याचा भागच ‘क्रिन्ज कॉमेडी’ म्हणून दाखवला जातो.

आर्थरचा कॉमेडी विश्वातला प्रवास ही मूळ कथेतील एक रेष आहे. कथेची दुसरी रेष आहे त्याला मिळणाऱ्या वागणुकीची. आर्थरची आई त्याला 'हॅपी' म्हणते आणि त्याला नेहमी सांगत असते की तुझा जन्म लोकांना हसवण्यासाठी झालाय.  पण आर्थरला आठवतंय तेव्हापासून तो एका क्षणासाठीही ‘हॅपी’ झालेला नाही.

गॉथम मधील राजकारणी बडं प्रस्थ आहे Thomas Wayne. त्याच्याकडे आर्थरच्या आईने ३० वर्षं काम केलेलं आहे. आपण या अशा हलाखीच्या परिस्थितीत राहतोय हे सांगायला आर्थरची आई-Penny Flake सतत Thomasला पत्रं लिहीतीय. ती आर्थरला सांगत असते की थॉमस पत्रं वाचेल आणि त्याला जेव्हा कळेल की आपण कुठे राहतोय तेव्हा तो आपल्याला इथे राहू देणार नाही. थॉमसकडून येणाऱ्या पत्राची वाट बघणं हे सुद्धा सिनेमामध्ये योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने येतं आणि वातावरण निर्मिती करतं.

आर्थरला अशा एका पत्रातून स्वतःच्या बापाची माहिती मिळणं, त्या बापाला आर्थर गाठतो तेव्हा बापाकडून वेगळीच माहिती मिळणं, सरकारी रेकॉर्ड्समधून अजून वेगळी माहिती मिळणं यातून त्याच्या जन्माची कहाणी संदिग्ध ठेवण्यात सिनेमाकर्त्यांना यश आलेलं आहे.

आर्थर unpredictable आहे. आणि तितकाच स्वाभाविक पण आहे. तो त्याच्या वडिलांना भेटतो तेव्हाचा त्याचा संवाद खूप भावनिक आहे. तिथे तो मनोरुग्ण वाटत नाही, हिंसक वाटत नाही, प्रेमाला आणि आपलेपणाला आसुसलेला एक सेपियन वाटतो फक्त.

‘Why so serious?’ असं ‘The Dark Knight’ मध्ये म्हणणारा जोकर, ‘जोकर’ सिनेमात 'Is it just me? or is it getting crazier out there?’ असं म्हणतो. वडील, सहकारी, बॉस, डॉक्टर, बसमधले सहप्रवासी, रस्त्यावरची गर्दी, शेजारी-पाजारी अशा सगळ्यांसाठी अदखलपात्र असणारा आर्थर म्हणतो, 'I just hope my death makes more cents than my life' 

आर्थरचं मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही हे पहिल्या काही मिनिटातच दाखवून लेखक दिग्दर्शक सेफ गेम खेळले आहेत. त्यामुळे बरीच लिबर्टी ते घेऊ शकले आहेत. आणि तरीही आर्थरच्या जगण्यातले कंगोरे आपल्याला उलगडतात आणि त्याचं नंतरचं कुठलंही वागणं आपल्याला अनोळखी वा अस्वाभाविक वाटत नाही; हे त्यांनी लीलया साध्य केलेलं आहे.

कथेमधले अनेक दुवे हे 'open for interpretation'आहेत. म्हणजे त्याचे प्रत्येक प्रेक्षकाला वेगळे वेगळे अर्थ लागतात आणि ते सर्व अर्थ चपखल बसतात. उदा. आर्थरच्या जन्माची कथा. तसेच पूर्वी आर्थर असायलममध्ये असल्याचा उल्लेख सिनेमाच्या सुरवातीला येतो. त्यामुळे सर्व कथानक तो असायलममध्ये असताना त्याच्या  कल्पनेच्या दुनियेत घडलंय असाही संभ्रम निर्माण होतो.

या सिनेमाचं आणखी एक विशेष म्हणजे आर्थारच्या सभोवताली दिसणारी बरीच माणसं ब्लॅक आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही ब्लॅक रीप्रेजेंटेशनसाठी त्यांचं कास्टिंग झालेेेलं नाही. समतेचा संदेश असा सहज येऊन जातो. आर्थरचा एक मित्र बुटका आहे. अतिशय हिंसक झालेल्या आर्थरची त्याच्याप्रती असणारी वागणूक लक्षात राहणारी आहे. 

शेवटी उठलेल्या दंग्यांमध्ये Thomas Wayne च्या बायकोच्या गळ्यातली तोडलेली महागडी मोत्याची माळ, गॉथम शहरातला कचऱ्याचा प्रश्न, मानसिक असंतुलनाकडे पाहण्याचे  आणि अशा लोकांना वागवण्याविषयीचे भोवतालाचे पूर्वग्रह आणि उथळ दृष्टी, बंदुकीची पहिली गोळी चुकून उडते तेव्हा आर्थरला वाटलेली भीती, वेगवेगळ्या प्रसंगी रेडिओवर ऐकू येणारा मजकूर, क्लबमध्ये सुरु असलेला चार्ली चॅप्लिनचा मॉल मधल्या स्केटिंगचा प्रसिद्ध सीन अशा किती आणि काय गोष्टी बघता बघता टिपून ठेवण्यासारख्या आहेत. आर्थरने सिनेमात अनेकवेळा धुंद होऊन केलेला डान्स वातावरण निर्मिती करतो, आपल्याला त्या मूडशी धरून ठेवतो. अशा अनेक बारकाव्यांमधून दिग्दर्शकाने आपल्या पाऊलखुणा सोडत अगदी ऐटीत त्यावर स्वतःची सही केली आहे.

आर्थरचा हिंसेपर्यंतचा प्रवास ग्लोरिफाय न करता दाखवलेला आहे. आपल्याला जोकरचा राग येत नाही हे खरं असलं तरी त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण होते. जोकर आपल्याला हिरो वाटत नाही. वाट चुकलेला सामान्य माणूस वाटतो. त्याच्यात त्या अर्थाने बाकी काही असामान्यत्व नाही. परिस्थितीला प्रतिक्रिया देताना त्याचा ‘जोकर’ होत जातो. जोकरविषयी वाटणारी सहानुभूती देखील सिनेमाच्या शेवटपर्यंत टिकत नाही. ती मागे पडून फक्त प्रश्न आणि प्रश्न उरतात. आणि सुन्न होऊन आपण एकटे थिएटर मधून बाहेर पडतो.. जोकरने पछाडल्यासारखे आणि तरीही संपूर्ण एकटे.

पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, सिनेमेटॉग्राफी, म्युझिक, एडिटिंग अशा फक्त एकेका गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा हा सिनेमा बघितला पाहिजे.

अनेक दिवस आर्थरला ट्रीटमेंट देणाऱ्या सायकॉलॉजिस्टला आर्थर ‘जोकर’ झाल्यानंतरच्या सीनमध्ये म्हणतो, ‘I stopped pills and I am feeling better now’.  काही दिवसांनी त्या क्लिनिकला मिळणारे अनुदान  बंद होते आणि त्यामुळे आर्थरचे उपचार बंद होणार असतात तेव्हा तो तिला म्हणतो, ‘You don’t listen to me, do you?All I have are negative thoughts. But you don't listen. I don’t know if even I existed, if even you exist . they don’t give a shit about us’. हे डायलॉग नाहीत. विधानं आहेत. विचार करायला लावणारी. अंतर्मुख करणारी.

समाजातील आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्टया दुर्बल, दुर्लक्षित माणूस लक्ष वेधून घेण्यासाठी हिंसेचा आधार घेतो का असं जोकर पाहताना वाटत राहिलं. 'Kill The Reach' ही चळवळ त्याच्या हिंसेतून उत्स्फूर्तपणे उभी राहते. इथं एक निरीक्षण नोंदवावसं वाटतं. वंचितांचं मानसिक संतुलन बिघडलं तर ते हिंसक बनू शकतात. आणि अशा वेगवेगळ्या अर्थाने वंचित असणाऱ्यांची संख्या आपल्या समाजात जास्त आहे किंवा अशा लोकांना सहानुभूतीने बघणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. त्यातून अशा हिंसेला शौर्याच्या, हिरोच्या संकल्पनेत बसवलं जाऊ शकतं. सत्ता उपभोगणाऱ्या आणि अगदी एका व्यक्तीचंही शोषण करणाऱ्या प्रत्येकाला हा सिनेमा सांगेल, ‘सावधान तुम्ही जोकर तयार करताय!’

- मृदगंधा दीक्षित

mrudgandha.dixit@gmail.com

Tags: सिनेमा परीक्षण मृदगंधा दीक्षित Joker Cinema Review Mrudgandha Dixit Load More Tags

Comments:

Anjani Kher

Samaropacha vakya marmabjedi ahe. Apan saglyani ishara samjayla hava.

Parag

Khoop sunder

Daniel M

सध्या गाजत असलेल्या चित्रपटाचे ऊत्तम रसग्रहण. सुंदर लिखाण.

Add Comment