एका मुलाखतीत अक्षयने स्वतःच म्हटलेलं वाक्य त्याच्या प्रवासाचं सार आहे. “बॉलिवूडमध्ये स्टार व्हायचं असेल तर पार्ट्यांना जावं लागतं, गॉसिप करावी लागते, कंट्रोव्हर्सी करावी लागते. मला ते काही करायचं नाही. मी हरलो नाही… मला खेळायला नीट मैदानच दिलं नाही.” पण तो मैदान स्वतः उभं करायला शिकला. आणि त्यात एकहाती गोलही मारू लागला. आज अक्षय खन्ना वयाच्या पन्नाशीत आहे. पण त्याच्या अभिनयातली परिपक्वता, त्याची नजर, त्याचा आवाज, त्याची शरीरबोली हे सर्व पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक, अधिक प्रभावी आहे. तो आता बॉलिवूडचा ‘दुर्लक्षित अभिनेता’ नसून, ‘अनन्यसाधारण अभिनयाचा ब्रँड’ झाला आहे.
बॉलिवूड हा केवळ मनोरंजनाचा उद्योग नाही. ते एक जंगल आहे. जिथे तगड्याला म्हणजे मुरब्बी कलाकाराला जागा मिळते आणि कमकुवतांना विसरले जाते. ज्याच्याकडे चमक आहे त्यालाही प्रकाशझोत अनुकूल मिळण्याची हमी नसते. कित्येक तेजस्वी चेहरे या विशाल इंडस्ट्रीत हरवून जातात, अनेक प्रतिभाशाली कलाकार अंधारात गडप होतात; पण काहींचा प्रवास इतका वेगळा, इतका हटके आणि इतका संघर्षमय असतो की तो इतिहासात कोरला जातो. त्यापैकीच एक नाव म्हणजे अक्षय खन्ना.
‘अडगळीत फेकून दिलं म्हणून हिऱ्याची चमक कमी होत नाही’ हे वाक्य जणू काही अगदी त्याच्यासाठीच बनले आहे. सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा असल्यामुळे त्याला नेपॉटिझमचा फायदा मिळाला असे अनेकांना वाटते; पण खरे तर, नेपॉटिझमच्या या विषारी वातावरणात तो ‘बळी’ ठरला. इतर स्टारकिड्सना प्रचंड मार्केटिंग, भव्य लॉन्च आणि अनेक प्रॉडक्शन हाऊसेसची साथ मिळाली; पण अक्षय खन्नाच्या बाबतीत इंडस्ट्रीने त्याच्याकडे फारसा गांभीर्याने पाहिलेच नाही. लोकांचा असा गैरसमज होता की ‘स्टारचा मुलगा’ म्हणजे त्याला सर्व काही आयते मिळत असेल. पण वास्तव या मताच्या अगदी उलट होतं. इंडस्ट्रीने त्याला मागे ढकललं, दुर्लक्षित केलं, आणि वर्षानुवर्षे त्याच्या प्रतिभेकडे पाहण्यासही टाळाटाळ केली.
आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छावा सिनेमात त्याने साकारलेला दमदार औरंगजेब प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर आता धुरंधर सिनेमामध्ये त्याने साकारलेला 'रहमान डकैत' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तो काय ताकदीचा अभिनेता आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अक्षय खन्नानं वयाच्या 22 व्या वर्षी इंडस्ट्री डेब्यू केला. त्याचा पहिला चित्रपट ‘हिमालय पुत्र’ अपेक्षापूर्ती करू शकला नाही. पहिल्याच चित्रपटात अपयश आले की बॉलिवूड त्वरित न्याय देऊन बसते. ‘हा चालणार नाही’, ‘याच्यात स्टारडम नाही’. अक्षयवरही असा बोजा टाकला गेला. पण त्याच्यातील आत्मविश्वास, कौशल्य यांना फार काळ कोणी रोखू शकत नव्हतं. त्याच्या आयुष्यात पहिले निर्णायक वळण आले ते जे. पी. दत्तांच्या सुप्रसिद्ध ‘बॉर्डर’मुळे.
या चित्रपटात त्याने साकारलेली छोटी पण हृदयाला स्पर्श करणारी भूमिका भारतीय सिनेमात अमर झाली. फक्त काही दृश्यांतून त्याने सैनिकाचे मनोभाव, देशभक्तीचे ओझे, युद्धाची जबाबदारी आणि घरापासून दूर असण्याची वेदना हे सर्व इतक्या ताकदीने दाखवले की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. याच अभिनयामुळे त्याला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला. अनेक स्टारकिड्सना हा पुरस्कार ‘भव्य लॉन्च’मुळे मिळतो, पण अक्षयला तो ‘अभिनयामुळे’ मिळाला, ही गोष्ट खूप मोठी होती. यानंतर आला ‘ताल’. ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर अशा प्रचंड स्टारडम असलेल्या कलाकारांसोबत अक्षयने एक नाजूक, संवेदनशील आणि प्रेमळ भूमिका साकारली. पण जगाचे लक्ष ऐश्वर्याच्या मोहक सौंदर्याकडे अधिक गेले. तिच्या सौंदर्याच्या तेजापुढे अक्षयचा अभिनय झाकोळला गेला. ही त्याच्यासाठी आणखी एक निराशा होती. पण हा संघर्षच त्याच्या भूमिकांना अधिक खोल, अधिक गंभीर बनवत होता.
फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ने मात्र त्याला नवी ओळख दिली. या चित्रपटात आमिर खान आणि सैफ अली खान यांच्या तुलनेत त्याची भूमिका ‘साइड ऍक्टर'ची होती. पण ‘सिद्धार्थ’ हे पात्र एवढं सूक्ष्म, एवढं अंतर्मुख आणि एवढं भावपूर्ण होतं की चित्रपटाचा आत्माच जणू त्याच्यावर आधारला होता. त्याने संवादांपेक्षा शांततेत अभिनय केला. त्याच्या नजरेतली तुटलेली भावना, प्रेमातील वेदना, मैत्रीतील मूकता हे सर्व इतकं नैसर्गिक होतं की प्रेक्षक त्याच्यावर मोहित झाले. याकरिता त्याला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण तरीही गौरवाचं केंद्रबिंदू आमिर खानच राहिला. अक्षयच्या अभिनयाची खोली समजण्यासाठी पुरेसं मार्केटिंग, पुरेसं गाजावाजा काहीही नव्हतं.
यानंतर कॉमेडीचा नवा अवतार म्हणजे ‘हंगामा’. विनोद समजून घेणं आणि तो योग्य टायमिंगमध्ये सादर करणं ही एक वेगळीच कला आहे. अक्षयने त्याची विनोदी टायमिंग इतक्या अचूकतेने वापरली की हा चित्रपट आजही लोकांच्या आवडीचा आहे. त्याचबरोबर ‘हमराज’मध्ये त्याने साकारलेल्या गूढ, कूटनीतिपूर्ण आणि थंड खलनायकी भूमिकेने लोकांना दचकलं. तो एका फ्रेममध्ये भावूक प्रियकर लावण्यासारखा वाटतो आणि पुढच्याच क्षणी थरकाप उडवणारा धोकेबाज. हे वैविध्य फार कमी कलाकारांमध्ये पाहायला मिळतं.
पण २००९ नंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष सुरू झाले. केस गळणे ही साधी वाटणारी समस्या बॉलिवूडमध्ये खूप मोठी ठरते. कारण इथे अभिनयापेक्षा ‘लुक’ महत्त्वाचा समजला जातो. अनेक प्रोडक्शन हाऊसेसनं त्याला नापसंती दाखवली. ‘हा आता हिरो मटेरियल नाही’ असं म्हटलं गेलं. इंडस्ट्रीतील लोकांच्या नजरेत कमीपणा येऊ लागला. पण अक्षय खन्ना कधीच हार मानणाऱ्यांच्या यादीत नव्हता. त्याच्या आत्मविश्वासाचा पाया त्याच्या अभिनयावर होता, ग्लॅमरवर नव्हे.
२०१६ मध्ये ‘ढिशूम’ने त्याचा पुनर्जन्म घडवला. या चित्रपटातील खलनायकी भूमिकेत त्याने दाखवलेली महाकाय उपस्थिती, संवादांतील टोकदार धार, आणि मनोवैज्ञानिक खोली या सर्वांमुळे प्रेक्षकांनी त्याला पुन्हा ओळखायला सुरुवात केली. त्यानंतरच्या ‘मॉम’मध्ये त्याने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत ज्या प्रकारे शांततेतून धडकी भरवली, त्याला तोड नव्हती. ‘दृश्यम 2’मध्ये तर त्याने अक्षरशः स्क्रिनवर वादळ निर्माण केले. विजय सालगावकरच्या सत्याच्या शोधात तो ज्या प्रकारे झपाटलेला पोलिस अधिकारी दाखवतो, ती भूमिका आता भारतीय सिनेमातील आयकॉनिक भूमिकांमध्ये गणली जाते.
या नव्या प्रवासात त्याला मिळालेली सर्वात मोठी संधी म्हणजे ‘छावा’. शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकाळातील एका कळीच्या व्यक्तिरेखेचं चित्रण करताना अक्षयने आपली सर्व कौशल्ये एका चित्रपटात एकवटली. त्याचा कणखरपणा, त्याची अभिव्यक्ती, त्याची नजर हे सगळं इतकं प्रामाणिक होतं की प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. हा अक्षयच्या अद्वितीय प्रतिभेचा सर्वोच्च सन्मान होता.
आणि आता ‘धुरंधर’ या चित्रपटाने अक्षयच्या करिअरला नव्या शिखरावर नेलं आहे. रहमान डकैतची भूमिका त्याने इतक्या धारदार पद्धतीने साकारली आहे की मुख्य नायक रणवीर सिंहसुद्धा अनेक दृश्यांत त्याच्यापुढे फिका पडतो. रहमानची चाल, त्याचा रौद्र शांतपणा, त्याची नजर अशी की जणू काही तो पडद्यावरून बाहेर येईल! अक्षयचं प्रत्येक फ्रेमवरील नियंत्रण इतकं परिपक्व आहे की जिथे तो आहे तिथे कॅमेऱ्याची पूर्ण पकड त्याच्यावरच असते. त्याचे संवाद जणू तलवारीसारखे, चेहऱ्यावर भाव अगदी कातळासारखे, आणि शरीरबोलीतून झळकणारी क्रूरता अविस्मरणीय आहे. रहमान डकैत ही व्यक्तिरेखा भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट अँटी-हिरो पात्रांपैकी एक बनली आहे, आणि त्याचं सर्व श्रेय अक्षयच्या अद्वितीय कौशल्याला जातं.
अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा “व्हॉट इफ” आहे. जर त्याला योग्य वेळी योग्य संधी मिळाली असती तर?
जर त्याला सुरुवातीपासून भावनांची, तीव्रतेची, मनोवैज्ञानिक खोली दाखवण्याची संधी असलेल्या भूमिका मिळाल्या असत्या तर?
जर त्याचं मूल्यमापन ‘स्टारडम’च्या तराजूत न करता ‘अभिनया’च्या तराजूत केलं गेलं असतं तर?
कदाचित तो आज भारतातील नव्हे तर जगातील टॉप 5 अभिनेत्यांमध्ये असता.
एका मुलाखतीत अक्षयने स्वतःच म्हटलेलं वाक्य त्याच्या प्रवासाचं सार आहे. “बॉलिवूडमध्ये स्टार व्हायचं असेल तर पार्ट्यांना जावं लागतं, गॉसिप करावी लागते, कंट्रोव्हर्सी करावी लागते. मला ते काही करायचं नाही. मी हरलो नाही… मला खेळायला नीट मैदानच दिलं नाही.” पण तो मैदान स्वतः उभं करायला शिकला. आणि त्यात एकहाती गोलही मारू लागला. आज अक्षय खन्ना वयाच्या पन्नाशीत आहे. पण त्याच्या अभिनयातली परिपक्वता, त्याची नजर, त्याचा आवाज, त्याची शरीरबोली हे सर्व पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक, अधिक प्रभावी आहे. तो आता बॉलिवूडचा ‘दुर्लक्षित अभिनेता’ नसून, ‘अनन्यसाधारण अभिनयाचा ब्रँड’ झाला आहे.
ऑनस्क्रीन आयुष्याबरोबर अक्षय खन्नाचं ऑफस्क्रिन आयुष्य देखील फार बरं नव्हतं. त्याने आजही लग्न केलेलं नाही. त्याला संसार आणि मुलं नकोत. अक्षय खन्नाकडे खूप झाडं आहेत. झाडांवर त्याचं खूप प्रेम आहे. झाडांप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावं, लग्न करावं असं कधी वाटलं नाही? असा प्रश्न त्याला एका मुलाखतकाराने विचारला असता तो म्हणाला, "मला असं वाटतं की मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलेलोच नाही."
आज बॉलिवूडमध्ये सौंदर्य, ग्लॅमर, सिक्स पॅक्स यांच्याआधारे हीरो बनतात; पण अभिनयाच्या बळावर ‘सुपरस्टार’ होण्याची किमया केवळ अक्षय खन्नाच करू शकतो. त्याचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्याची कथा नाही. तो एका कलाकाराच्याआत्म्याचा प्रवास आहे. संघर्षाने जखमा दिल्या, पण त्याने त्या जखमांमधूनच आपला स्वभाव, आपली कला आणि आपला वारसा तयार केला. आज तो ज्या उंचीवर आहे, ती उंची त्याला कुणी दिलेली नाही तर तो तिथे स्वतः पोहोचला आहे. अक्षय खन्ना हा हिरा जरी अडगळीत टाकला गेला होता, तरी आज तो पूर्वीपेक्षा जास्त तेजाने, जास्त प्रामाणिकतेने आणि जास्त खोलीने जगाच्या नजरेत झळकतो आहे.
- आशिष निनगुरकर
ashishningurkar@gmail.com
(लेखक चित्रपट अभ्यासक व समीक्षक आहेत.)
Tags: अक्षय खन्ना दिल चाहता है धुरंधर ताल उशिराने यश दुर्लक्षित अभिनेता Load More Tags
Add Comment