आर्टिस्ट पॉलिटिक्ससे हटकर हो ही नही सकता

आर्टिकल 15 हा सिनेमा 28 जून 2019 ला प्रदर्शित झाला आणि अजूनही चित्रपटगृहात सुरु आहे.  आर्टिकल 15 जातव्यवस्थेवर बोलतो. विचार करायला लावतो आणि आपण संवेदनशील असूच तर आपल्या संवेदनांनाही हात घालतो. त्यामुळं या सिनेमातल्या निषादशी म्हणजेच हे पात्र साकारणार्‍या मोहम्मद झीशान अयुबशी गप्पा मारायलाच हव्यात असं वाटत होतं. झीशान हा एनएसडीचा विद्यार्थी. त्याला आपण रांझणा, तनू वेडस मनू, फँटम, रईस, शाहीद अशा मोठ्या सिनेमांमध्ये ताकदीचा गुणी अभिनेता म्हणून पाहिलंच आहे. आता आर्टिकल 15 या गंभीर सिनेमाविषयी आणि त्यातल्या पात्रांच्या अंतरंगाविषयी जाणून घ्यायचं होतं. झीशानची ही मनमोकळी मुलाखत.

प्रश्‍न- आर्टिकल 15 सिनेमामध्ये तू निषाद हे महत्त्वपूर्ण पात्र साकारलं आहेस. या पात्रानं तुझी आजवरची एक इमेजही ब्रेक होण्यास मदत झाली. ही भूमिका तुझ्याकडे कशी आली, त्याची निवडप्रक्रिया कशी झाली याविषयी सर्वप्रथम सांग.

झीशान- मी निषादची भूमिका करेन असं आधी ठरलं नव्हतं. खरंतर मला वेगळ्याच भूमिकेची विचारणा झाली होती. अनुभव सिन्हाने (आर्टिकल 15 चा दिग्दर्शक) मला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला दिली आणि तुला यातली कुठली भूमिका करायला आवडेल हे तूच सांग असंही सांगितलं. मी कथानक वाचल्यावर त्याच्या प्रेमातच पडलो. कथेतलं पात्र स्वत:च निवडण्याची एक सुखद संधी होती. मला निषादचं पात्र खूप भावलं होतं. या भूमिकेला लहान-मोठे कंगोरे होते जे मला विशेष वाटत होते आणि मग काय मी निषादची भूमिका निवडली.

प्रश्‍न- वाह! आणि तू त्या भूमिकेला योग्य न्यायही दिलास. तू म्हणालास तसं तू स्वत:च ही भूमिका निवडलीस तरीही तुला यासाठी काही वेगळी तयारी करावी लागली का? कुठल्या प्रकारचा होमवर्क तू केला होतास?

झीशान- बहुतांशवेळा काय होतं की तुमच्याकडे एखादी भूमिका येते आणि मग तुम्ही त्याचा अभ्यास करता. इथं मात्र असं झालं होतं की मीच माझं पात्र निवडलेलं होतं. त्यामुळं एका अर्थानं मागील 19 वर्षांपासून जो अभ्यास सुरु होता. जे सिंथेसीस सुरु होतं ते साकारण्याची संधी चालून आलेली होती. आजवरच्या अनुभवांचं संचित कुठंतरी मुक्तपणे वापरता येणार हे जाणूनच मी या पात्राची निवड केलेली होती. निषादसारख्या पात्राचं अतर्बाह्य रंग आपण आसपास सातत्यानं धगधगताना पाहत असतो. त्यामुळं वेगळा अभ्यास करावा लागला नाही. हां, म्हणजे जातीभेद, वर्गभेद किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष याप्रकरची एकच एक गोष्ट कदाचित मला सांगता येणार नाही. पण रोहित वेमुलाची केस पहा, जेएनयूमधल्या घटना पहा, मॉब लिंचिंग असेल, सतत कुणाचा तरी ब्लेम करण्याची बाब असेल या सगळ्या आसपासच्या गोष्टी तुमच्या आत घुसळत राहतात. 

तुम्ही 18 वर्षांचे होता तेव्हाच मतदार होता त्यामुळं तुम्हाला तेव्हापासूनच राजकारण कळणं गरजेचं असतं. कॉलेजात असताना माझ्यासोबत वेगवेगळ्या विचारधारांचे मित्र होते. या सगळ्याचं मंथन होऊन हाती जे आलं होतं त्यातून निषाद उभा राहू शकणार होता.

प्रश्‍न- सिनेमात निषादचं अस्तित्व ते पात्र पडद्यावर नसतानाही जाणवत राहतं मात्र संपूर्ण सिनेमात आयान म्हणजे आयुष्यमान खुरानाच्या पात्रासोबत सिनेमा फिरतो. याचं काही विशेष महत्त्व वाटतं?

झीशान- अर्थातच. आयानच्या नजरेतून कथानक पुढं सरकणं ही तर या चित्रपटाची जमेची बाजू आहे. हा सिनेमा तुमच्या कास्टिजमवर (जातीव्यवस्थेवर) बोलणारा आहे. उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण यांना ‘ब्राह्मण’ म्हणून पाहणं, यातूनही आपली जातीयवृत्ती दिसत राहते. अनेकदा ब्राह्मणांनाही अतिचिकित्सक आणि पूर्वग्रहातून पाहिलं जातं जे की चूकच आहे. सटलपणे तेही येणं महत्त्वाचं होतं. दुसरं असं की अनेकदा उच्चवर्णीय समाजाला इतर जातीसमूहांविषयी फारशी माहितीच नसते. कुठल्या प्रकाराचा स्पृश्य-अस्पृश्य भेद सुरु आहे हे त्यांच्या गावीच नसतं. त्यांचं जगणं सुखवस्तू असतं. त्यांना या गोष्टींचीं झळच लागलेली नसते. सिनेमातला प्रोटागोनिस्ट तसाच आहे.

आर्टिकल 15 हा समानतेविषयी बोलतो. ब्राह्मण जात वगळून सिनेमा करणं म्हणजे पुन्हा भेदाभेदच. यापुढं जाऊन हेही समजून घ्यायला हवं की सिनेमातला आयान हा जर उच्चवर्णीय नसता तर कदाचित संपूर्ण सिनेमा कुणा एकाच्या आयुष्यातली कर्मकहाणी इतकाच सिमीत राहिला असता. पण तसं नसल्यानं तो संपूर्ण समाजाचं चित्र उभं करु शकला आणि हा विषय समाजाच्या पोटातला आहे हे ही अधोरेखित करु शकला. शिवाय अयानसोबत प्रेक्षागृहात बसलेला प्रेक्षक चटकन रिलेट होऊ शकला कारण आपण अनेक गोष्टींबाबत अनभिज्ञ असतो. आपण स्वत:त मश्गूल असतो. तेव्हा अचानक तुम्हाला समाजाचं वेगळं रुप दिसायला लागलं तर ते आत जाऊन भिडू लागतं. या सिनेमाचं लेखन इतकं सुरेख केलंय की हा सिनेमा एकाचवेळी अयानचा आहे, मोहम्मद अयाज, जाधव, निषाद, डॉ. राव, चंद्रभान असा सर्वांचाच आहे. हे सगळे अंत:स्तर समजून घ्यायचे असतील तर प्रेक्षकाला तटस्थ स्तरावर आणणं आवश्यक असतं. ते काम आयानचं पात्र करतं.

प्रश्‍न- अगदी हीच भावना चित्रपट पाहून मनात आली होती. तसं तर निषादचा या सिनेमातला पसर्पेक्टीव्ह उघड उघड कळतो तरीही तुझ्याकडून या पात्राची मनोभूमी समजून घ्यायला आवडेल.

झीशान- निषादचं पात्र सहज कळण्याजोगं आहे. कुणाही क्रांतीकारकाचं असावं असंच आहे. गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशी वेडावलेली माणसं त्या पात्रात आहेत. कुणाही सळसळत्या रक्ताचा तरुण असावा तसाच निषाद आहे. तो फक्त समाजानं उपेक्षित समजलेल्या जातीत जन्मला आहे आणि म्हणून त्याच्यापुढे फार मोठा संघर्ष आहे. तो सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाहीये, रोमान्स करु शकत नाहीये. तुला आठवत असेल तर रोहित वेमुलाने देखील त्याच्या आत्महत्येच्या नोटमध्ये म्हटलं होतं की मी या जातीत जन्माला यायला नको होतं. जातीव्यवस्थेतून आपण इतकी हतबलता, इतकं नैराश्य पेरतो. रोहितही एक चांगलं आयुष्य जगू शकला असता, त्यानं काहीतरी नक्कीच मिळवलं असतं मात्र केवळ तो कथित जातीतला होता म्हणून अपमानित होत राहिला आणि संपला. असे कित्येक जण असतात.  कविता, सौंदर्य, निसर्ग, सृष्टी, चंद्र कशाविषयीही गप्पा मारायला, कविता करायला त्यांच्याकडे वेळ नसतो. कित्येकदा तर चंद्र पाहण्याची उसंतही कुणाकुणाला मिळत नाही. हे किती त्रासदायक आहे. निषादचं पात्र अशा जगण्याभोवती फिरणारं आहे.

प्रश्‍न- हा सिनेमा धगधगत्या विषयाची गंभीर मांडणी करतो. तूदेखील नेहमी म्हणत असतोस की कलेतून व्यक्त होण्याला बंधनं नकोत. तुला स्वत:ला राजकारण आणि कलाकार यांच्यात सहसंबंध वाटतो का? कलाकार राजकारणापासून विलग होऊ शकतो का?

झीशान- आर्टिस्ट पॉलिटिक्ससे हटकर हो ही नही सकता. कोणीही व्यक्ती कलाकार का होतो तर त्याच्याकडे असणारी संवेदनशीलता आणि त्याला काहीतरी सांगण्याची उर्मी. साचेबद्ध आयुष्य जगणारा माणूस काय करेल झोपून उठेल, कामावर जाईल, काम करेल, रात्री घरी येईल आणि पुन्हा झोपी जाईल. पण कलाकाराचं असं होणार नाही. मुळात कला कुठून येते तर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं माध्यम म्हणजे तुमच्याजवळील कला. जगभरात कुणीही Apolitical असूच शकत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की मी Apolitical statement  करतोय याचा अर्थ तीही राजकीयच कृती आहे. समाजात जे काही भलं बुरं घडत असतं त्यानं आपल्या आयुष्यावर परिणाम होतच असतो. मग तुम्ही अंग काढून कसे जगू शकता!

आजच्या काळात तर dominant ideology चा प्रसार होताना दिसत आहे. विचारधारा म्हणजे काय असतं तर पद्धतशीररित्या तयार झालेला विचार संग्रह. समजा की दहा लोक आहेत. चार लोक दोन लोकांना मारत असतील आणि बाकीचे चार बघत असतील तर ते बघे चारजणं एका अर्थाने मारणार्‍या चौघांना मदतच करत असतात की. शक्तीशाली लोकांची शक्ती अशीच तर वाढते. आजकाल जिकडे प्रवाह वाहतोय त्याबाजूला न बोलता उभं राहण्याची प्रथा वाढलीये. ज्यांचा प्रभाव जास्त त्यांच्या विरोधातही न बोलणं याचा अर्थ काय तर तुम्ही त्यांना न बोलता समर्थन देता. अशी dominant ideology वाढतच चालली आहे.

जगप्रसिद्ध राजकीय कवी, नाटककार बर्टलोल्ट ब्रेच्टचं प्रसिद्ध वाक्य आहे. ‘Worst illiterate is the political illiterate .’ आपल्या आसपास महागाई वाढतेय, भ्रष्टाचार वाढतोय,वेश्याव्यवसाय वाढतोय हे कशामुळं तर आपण चूकीचे राज्यकर्ते निवडून दिलेले असतात म्हणून. आता दरवर्षी मुंबई पावसामुळं बंद पडते. पूरसदृश्य स्थिती तयार होते. लोकल बंद होतात आणि वर्षानुवर्षे हे सुरुच राहतं. का? बीएमसीमध्ये आपण निवडणून दिलेली माणसं आहेत. आणि आपल्या मताची जबाबदारी आपण नाही घेणार? आपल्या आयुष्यात राजकारण असं घुसून बसलेलं असताना आपण त्यापासून दूर कसे राहू शकतो? नाही तर मग मग कलाकार तरी कसा दूर राहणार.

प्रश्‍न- अभिव्यक्तीच्या या उर्मीतूनच तुम्ही प्रोटेस्ट नाटकंही करता. त्यासाठी तुमची बिईंग असोसिएशन म्हणून संस्था आहे ना..

झीशान- प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्हाला ठरवून राजकीय भाष्य करायचं असतं, विरोध करायचा असतो, निषेध नोंदवायचा असतो असं मुळीच नाही पण आसपास इतकं काही घडत असतं की ते मांडल्याशिवाय चैनही मिळत नाही. तुमच्या आत काहीतरी धगधगत असतं, तुम्हाला काहीतरी अतिशय ठामपणे, निर्भयपणे मांडायचं असतं अशा वेळी आम्हाला येणारी गोष्ट कोणती तर नाटक करणं, कला सादर करणं. समाजात काही प्रमाणात तरी बदल व्हावेत म्हणून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून नाटक करतो. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करतो. लोक प्रतिसाद देतात.

प्रश्‍न- शेवटचा प्रश्‍न, लोक गंभीर विषयांच्या सिनेमांना प्रतिसाद कसा देतात. आर्टिकल 15 विषयीच सांग, कसा प्रतिसाद मिळत आहे.

झीशान- बहुतेकवेळा गंभीर विषयांवरचे सिनेमे हे फिल्म फेस्टिव्हलला दाखवायचे किंवा छोटं स्क्रीनींग करुन वाहवा मिळवायची अशी एक पद्धत रुढ होत चालली आहे. किंवा थोडी व्यावसायिकता जपण्यासाठी गंभीर विषय घेऊन विनोदी ढंगानं त्याची मांडणी करणं. मात्र हा सिनेमा या दोन्ही पद्धतींना बरोबर छेद देतो. गंभीर विषयावरचा, गंभीर मांडणी असणारा सिनेमाही लोक चांगल्यारितीनं स्विकारु शकतात. त्यातील गर्भित अर्थही त्यांच्यापर्यंत पोहचू शकतो हे या सिनेमानं करुन दाखवलंय. गंभीर विषय म्हटलं की लोक घाबरतात, दूर जातात असा समजही हा सिनेमा मोडून काढतो. सिनेमाची सिनेमागृहावरची व्यावसायिक कमाईदेखील चांगली होत आहे. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

(मुलाखत व शब्दांकन : हिनाकौसर खान)

greenheena@gmail.com

 

Tags: आर्टिकल 15 सिनेमा झीशान आयुब Zeeshan Ayub Heenakausar Khan-pinjar हिनाकौसर खान-पिंजार मुलाखत Load More Tags

Comments:

Ugaonkar

प्रथमच "कर्तव्य " वाचतो आहे .काही निराळे वाचायला मिळत आहे

Add Comment