सप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह यांची एक्सक्लूझिव मुलाखत

Stills from Hellaro Movie

 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वर्षीचा (2018) देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ‘हेल्लारो’ या गुजराती सिनेमाने सुवर्णकमळावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘हेल्लारो’ च्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गुजरातच्या वाट्याला पहिल्यांदाच येत आहे. (यापूर्वी केतन मेहता यांच्या ‘भवनी भवई’ या गुजराती सिनेमाला 1980 मध्ये २ विभागांत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.) ‘हेल्लारो’ या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक शाह यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. यापूर्वी त्यांनी गुजराती नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, लेखनाचं काम केलं आहे. या राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त दिग्दर्शक अभिषेक शाह यांची घेतलेली ही सविस्तर मुलाखत.

प्रश्‍न- हेल्लारो हा तुमचा पहिलाच सिनेमा आणि तुमच्या या पहिल्याच सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मागील 40 वर्षांत गुजराती सिनेमाला मिळालेला हा प्रथम बहुमान. सर्वप्रथम तुमचं, तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन.

अभिषेक- थँक्य यू, थँक्यू सो मच.

प्रश्‍न- गप्पांना सुरुवात करण्याआधी चित्रपटाच्या नावाविषयी कुतूहल आहे. तर आधी हेल्लारोचा अर्थ काय होतो हे जाणून घ्यायला आवडेल.

अभिषेक- हेल्लारो हा पुरातन गुजराती भाषेतील शब्द आहे. आताच्या बोलीभाषेत तो वापरला जात नाही. या शब्दाचा अर्थ पाण्याच्या प्रवाहातील उसळती लाट असा होतो. पाण्यात उसळणारी अशी लाट- जिच्या आगमनानं सारं काही हादरून जातं. परिवर्तन घडून येतं. किंवा असा एखादा धक्का- जो आतून इतक्या जोरात बसतो की सारं काही बदलून जातं. समजा की दडपशाहीचा- सप्रेशनचा असा काळ आहे; जेव्हा अशी एखादी लाट गवसते किंवा असं एखादं एक्स्प्रेशन बाहेर निघतं, जे आपल्या दडपशाहीला उधळून लावतं- त्याला म्हणतात हेल्लारो.

प्रश्‍न- सप्रेशन टू एक्सप्रेशन...खूपच रंजक वाटतंय. खरं तर, अद्याप सिनेमाचा ट्रेलरही कुठं उपलब्ध नाहीये. मात्र सिनेमाविषयी आमच्या मनात फार उत्सुकता आहे. सिनेमाची मध्यवर्ती कल्पना काय आहे?

अभिषेक- 1975 मधील कच्छमध्ये घडणारी कथा आहे. कच्छ हा गुजरातचा मोठा प्रदेश आहे. भारतात दोन मोठे वाळवंटी प्रदेश आहेत. एक राजस्थानात आणि दुसरा कच्छमध्ये. तर कच्छच्या रणामध्ये, वाळवंटाच्या मध्यभागात आम्ही एक गाव उभं केलं. या गावाचा दुसर्‍या कुठल्याच गावाशी कसलाच संपर्क नाही. 1975 च्या काळात हे गाव जगापासून असं तुटलेलं आहे की, त्यांना बाहेरच्या जगात काय घडतंय याची कल्पनाच नाहीये. बायकांची अवस्था तर त्याहून अवघड आहे. त्यांना घराबाहेर पडण्याची कसलीच मुभा नाहीये. त्या घराबाहेर पडल्याच तर केवळ पाणी भरण्यासाठी. वाळवंटातून 5-6 किमीच्या अंतरापर्यंत चालत जायचं आणि पाणी भरून आणायचं एवढ्याच कारणासाठी त्या घराबाहेर पडू शकतात. बाकी त्यांच्या आयुष्यात कुठलीच चैन नाही, मौज नाही, कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती नाही. आपण जसं नाचातून-गायनातून स्वत:शी गप्पा मारून किंवा कुठल्याही मार्गाने स्वत:ला व्यक्त करतो, मांडतो, एक्सप्रेस करतो. त्या सगळ्या गोष्टी तिथं स्त्रियांसाठी निषिद्ध आहेत. अशा दडपशाहीच्या माहोलात या स्त्रियांना एक व्यक्ती भेटते. त्या व्यक्तीमुळं या स्त्रियांच्या आत दडपलेला भाव प्रकट होतो. त्यांचं एक्सप्रेशन बाहेर येतं. ती व्यक्ती त्यांचं आयुष्यच बदलून टाकते. त्यांच्यात मुरून राहिलेलं दमन बाहेर काढतं. माझी ही कहाणीच मुळी ‘सप्रेशन टू एक्सप्रेशन’ असा प्रवास करणारी आहे. जर तुम्हाला कुणी म्हंटलं, यू कान्ट डान्स, यू कान्ट सिंग, यू कांट थिंक... आणि मग नेमक्या त्या वेळी तुम्हाला असा एक मार्ग सापडतो, ज्यातून तुम्हाला तुमचं हरवलेलं पॅशन मिळून जातं. तुम्हाला तुमचा आवाज मिळून जातो. सिनेमाची कथा याच सूत्रावर आहे.

प्रश्‍न- या सिनेमात स्त्रियांची 13 पात्रं मध्यवर्ती भूमिकेत आहेत. हा1975 चा कालखंड आहे. स्वाभाविकच या स्त्रियांचं जगणं-वागणं त्या काळातलं असेल; तरीही या स्त्रियांचं नेमकं काय कॅरेक्टरायझेशन आहे? त्यांची समज, त्यांचं शिक्षण, त्यांचं व्यवहारज्ञान नेमकं कसं आहे?

अभिषेक- सिनेमात जिच्यामुळं एक्सप्रेशनचा, व्यक्त होण्याचा, मुक्त होण्याचा माहोल तयार होतो, ती मुख्य नायिका मंजिरी. तिचं पात्र सातवीपर्यंत शिकलेलं आहे. ती मुळात कच्छच्या एका शहरी भागातून ग्रामीण भागात आली आहे आणि म्हणून तिचं थोडंफार शिक्षण झालं आहे. इतर 12 स्त्रिया अशिक्षित आहेत. या गावातली एकही स्त्री शिकलेली नाही. शिक्षण तर दूरचीच गोष्ट; या स्त्रियांनी कधी संपूर्ण गावही पाहिलेलं नाही. त्यांना आपण ग्रामीण भागात राहतो की शहरी याचा अंदाजही नाही. त्यांनी कधी जवळपासचं दुसरं गावही पाहिलेलं नाही की- त्यांना ‘गाव’ म्हणजे काय, ‘शहर’ म्हणजे काय याची प्रचिती यावी. आपल्या गावाबाहेरचं जग किती पुढं गेलंय, आपला देश कुठं चाललाय, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजे एक स्त्री आहे- अशी कुठलीच खबर त्यांना नाहीये. त्यांच्याकडं असं कुठलं माध्यमही नाहीये की- ज्यातून त्या बाहेरचं जग समजू शकतील.

प्रश्‍न- सिनेमासाठी 1975 हेच वर्ष तुम्ही का निवडलं? त्यामागं विशेष काही कारण होतं का?

अभिषेक- माझ्या सिनेमाची प्राथमिक गरज म्हणजे कथेतलं गाव बाहेरच्या जगाशी कनेक्टेड नाही हे दाखवणं, ही होती आणि म्हणून मी ते वर्ष निवडलं. आजच्या पार्श्‍वभूमीवर मला ते तुटलेपण दाखवता येणार नव्हतं. मी जर आज कच्छच्या कुठल्या गावातलं डिस्कनेक्शन दाखवलं तर ते खरं वाटणार नाही. तुम्हाला सांगतो- आम्ही या सिनेमासाठी जिथं शूट केलं, ते गुजरातचं पाकिस्तानच्या हद्दीजवळचं शेवटचं गाव. मात्र तिथंही आता मोबाईल फोन होते. नेटवर्क होतं. लोक हातातल्या मोबाईलवर युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहत होते. ही सगळी सुविधा त्या शेवटच्या गावापर्यंत पोहचलेली दिसत असताना मला ते काळापासून, जगापासून तुटलेलं गाव दाखवण्यासाठी काळाच्या थोडं मागं जावं लागणार होतं. हा कटऑफ महत्त्वाचा होता. जोवर तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललंय याची कल्पना नसते, तोवर तुम्हाला तुमच्या जगात जे घडत असतं ते फार भारी वाटत राहतं. मात्र ज्या क्षणी तुम्हाला कळतं की- नाही बाहेरचं जग खूप पुढं निघून गेलंय, तेव्हा आपण खूप मागास आहोत याची जाणीव होऊ लागते.

दुसरं असं की- मला सिनेमात कुठल्याही संवादातून असं सांगायचं नव्हतं की, हे 1975चं वर्ष सुरू आहे. त्यासाठी मला इतिहासातील घटना हवी होती. आणीबाणी 1975 मध्ये लागू झाली होती. एका ओझरत्या वाक्यात देशात आणीबाणी लागलीये, असा उल्लेख करून मला सिनेमाचा अख्खा पट उभा करायचा होता, म्हणून या वर्षाची निवड केली.

प्रश्‍न- या सिनेमाचं प्रेरणास्थान काय राहिलं?

अभिषेक- केतन मेहतांचा ‘मिर्च मसाला’. हो, केतन मेहतांचा हा सिनेमा मी जितक्या वेळा पाहिला, त्या प्रत्येकवेळी मला वाटायचं की- मी जर सिनेमाच्या माध्यमातून काही कम्युनिकेट करेन, तर ते अशा रीतीनं. माझ्या सिनेमामेकिंगचं बीज तिथंच आहे. पाहा ना मिर्च मसालातील कथा प्रचंड गुंतवून ठेवणारी आहे, त्याचा सोशल रेलेव्हन्स प्रचंड आहे आणि तरीही तुम्ही त्या कथेशी खिळून राहता. आपण कथा मिर्च मसालासारखी सादर करावी असा काही फॉर्म्युला ठरलेला नव्हता. खरं तर माझा सिनेमा मिर्च मसालाहून खूपच निराळा आहे. मात्र विचारांची प्रक्रिया, कथा सादरीकरणातल्या सहजतेचं बीज तिथंच आहे. मिर्च मसाला, भवनी भवई, सरदारसारखे अप्रतिम सिनेमे बनवणार्‍या केतन मेहतांशी कालच माझं फोनवर बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, 'थँक्यू सो मच सर. मी एकलव्याप्रमाणं तुमच्या सिनेमांतून शिकत राहिलो. तुम्ही माझे गुरु आहात. या सिनेमाचं प्रेरणास्थान ‘मिर्च मसाला’आहे.' तेही आनंदले.

प्रश्‍न- पण या सिनेमाचं कथाबीज कुठून आलं? कल्पना कशी साकारली गेली?

अभिषेक- या कथेचं वन-लायनर हे एका गुजराती लोकगीतात सापडलं. ते लोकगीत ऐकताना त्यातल्या स्त्रियांच्या कथनातून मला वाटलं की- या पात्रांना घेऊन कथा सांगता येईल. सिनेमाची कथा लोकगीतातली नाही, लोकगीतातून प्रेरित आहे. लोकगीतात असं होतं की- स्त्रिया गरबा करत असतात आणि त्यांच्यासोबत एक ढोली म्हणजे ढोलकी वाजवणारा असतो. त्याच्या तालावर त्यांचा गरबा बेतला आहे. लोकगीतातली कथा फार लांबलचक होती, पण मी फक्त गरबा करणार्‍या स्त्रिया आणि ढोलकी वाजवणारी व्यक्ती ही पात्रं घेतली आणि मग पुढं फेमिनिस्ट दृष्टिकोनातून कथा साकारली. एका नव्या अभिव्यक्तीसह लेखन केलं. सिनेमातली सगळी पात्रं, संपूर्ण कथा माझी स्वत:ची आहे. सिनेमातलं आमचं जग आम्ही स्वत: तयार केलं.

प्रश्‍न- स्त्रीसंबंधी विषय, तुम्ही म्हणाला तसा ‘सप्रेशन टू एक्स्प्रेशन’ असा एक गंभीर प्रवास जाणवतोय. तर सिनेमाच्या मांडणीबाबत तुम्ही बारीकसारीक काय विचार केला होता?

अभिषेक- सर्वप्रथम एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की- मला कुठल्याही प्रकारे डार्क सिनेमा करायचा नव्हता. मला समस्येवर आधारित गंभीर सिनेमा करायचा नव्हता, की जो सर्वसामान्य प्रेक्षक पाहायला येतील आणि म्हणतील की, ‘अरे, बहुत कुछ देख लिया हमने, मत दिखाओ.’ मला स्त्रियांवरची हिंसा दाखवायची नव्हती, स्त्रीमुक्तीचे आपणच वाहक असल्याचा आविर्भाव आणायचा नव्हता हे पक्कं होतं. काय करायचं नाही हे ठरल्यावर हेही पक्कं होतं की, सर्वसामान्य प्रेक्षकालाही आपलासा वाटावा असा सिनेमा करायचा.

मग मी गुजराती रंगभूमीत नावाजलेले आणि गुजराती कवी म्हणून नावलौकिक असलेले सौम्य जोशी यांना माझ्या बोर्डवर घेतलं. सौम्य यांची ‘साधने’शी (साधना साप्ताहिक) नाळ जोडलेली आहे. साधनाचे अंक वाचतच ते मोठे झाले आहेत. त्यांच्या घरात साने गुरुजींचा खूप प्रभाव आहे. त्यांचे वडील जयंत जोशी हे साने गुरुजींचे खूप चाहते आहेत. हे लोक मूळ कोकणातले. सौम्यच्या आई मात्र गुजराती. सौम्य जितके गुजराती आहेत तितकेच मराठी आहेत. हां, मात्र त्यांनी गुजरातीत अधिक काम केलंय. ते माझ्या गुरुस्थानी आहेत. या सिनेमाचे संवाद आणि गीते त्यांनीच लिहावी हा माझा पहिल्यापासून आग्रह होता. कारण आमच्या विचारांची बैठक खूप सारखी आहे याची मला कल्पना होती. शिवाय ते  लेखन करतात, तेव्हा फारच वेगळ्या तर्‍हेनं व्यक्त होतात. मी त्यांचाच शिष्य आहे. माझी जी काही थॉट-प्रोसेस आहे किंवा मी ज्या तर्‍हेनं जगाकडं पाहतो त्याच्यावर त्यांचा प्रभाव आहेच. मी त्यांना कथा सांगितली तर तेही लगेच तयार झाले. मग सहलेखक प्रतीक गुप्ता सोबत आले. आम्ही तिघांनीही एक गोष्ट स्पष्ट ठरवली होती कि,कथा पूर्णत: प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी हवी. गुंतवणारी हवी. प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन करणारी हवी.

हल्ली व्यावसायिक किंवा कमर्शियल, एन्टरटेन्मेट यांच्या व्याख्या फारच विचित्र झाल्या आहेत. आपल्याकडं कमर्शियलची व्याख्या म्हणजे आयटमसाँग, व्हिलन, बारुद, गोला, सेक्स इतकीच मर्यादित आहे. पण माझ्यासाठी कमर्शियलची व्याख्या म्हणजे राजी, कहानी, बधाई हो, अंधाधूनसारखे सिनेमे आहेत. ही काही निवडक नावं सांगतोय. यादी मोठी आहे. मुद्दा समजून घ्या हे सिनेमे सरसकट कमर्शियल विचार धारेतून बनलेले नसूनही तुमचं मनोरंजन करतात, तुम्हाला बांधून ठेवतात तरी डोईजड होत नाहीत. आम्हाला सिनेमा याच धर्तीवर करायचा होता. पुरस्कार मिळेल अशी एखादी कथा लिहावी, सिनेमा करावा आणि लोक जेव्हा बघायला जातील तेव्हा ते एकमेकांचंच तोंड पाहतील, अशी मांडणी करायचीच नव्हती. त्यामुळं आम्ही सिनेमात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी जे-जे काही करणं अपेक्षित होतं, ते-ते केलं.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सिनेमातला हीरो कोण असेल तर तो आहे, ‘गरबा’.  सिनेमात चार गरबा आहेत आणि ते चांगल्या प्रकारे सादर करायचे होते. सौम्यने फारच अप्रतिम गीते लिहीली आहेत. ‘ढोली तारो’ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले नृत्यदिग्दर्शक संदीप दंडा, हर्ष दंडा यांना बोर्डवर घेण्यामागंही हेच कारण होतं. त्यांनी आमची चारही गाणी दिग्दर्शित केली आहेत. सिनेमॅटोग्राफर त्रिभुवन बाबू यांनी तर कमालच केली आहे.

सिनेमा क्लास आणि मास दोघांसाठी करण्याचा प्रयत्न केला. तो तसा झालाय की नाही हे तर प्रत्यक्ष प्रेक्षकच ठरवतील. हे माझंच अपत्य असल्यानं तो फारच भारी आहे,असं मी म्हणणार नाही; पण क्लास व मास या दोघांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न नकीच दिसेल.

प्रश्‍न- गरबातील एक्स्प्रेशन कसे आहेत? नेहमीच्या गरबांपेक्षा यात विशेष काय आहे?

अभिषेक- सिनेमात येणार्‍या पहिल्या गाण्याविषयी सांगतो. पहिल्यांदाच गरबामध्ये ‘लोरी’ म्हणजेच अंगाईगीत असणार आहे. गरबा आहे पण त्यात आईचं काळीजदेखील आहे. या गाण्यात आई मुलीला सांगतेय की- बाळ तुला उडायचं नाहीये, बागडायचं नाहीये, स्वप्न पहायचं नाहीये, जी स्वप्नं तुला पुढं घेऊन जाईल त्यात रमायचं नाहीये. एखाद्या माध्यमातून तू स्वत:ला व्यक्त करू शकतेस किंवा तू तुझं भविष्य तुझ्या प्रतिभेनं उज्ज्वल करू शकतेस, असे काही विचार येत असतील; तर माफ कर पोरी. तू मुलगी आहेस म्हणून हे करू शकणार नाहीस. अशा अर्थाचा तो गरबा आहे. चारही गीतं सौम्यने फारच अर्थपूर्ण लिहीली आहेत.

प्रश्‍न- या सिनेमातल्या अभिनेत्रींची निवड कशी केली?

अभिषेक- ही प्रक्रिया फारच लांबलचक झाली. आता मराठीत ‘सैराट’ हा सिनेमा आहे ना, तर त्या सिनेमातली भाषा एका प्रदेशाची बोलीभाषा आहे. त्याचे आपले आपले एक उच्चार, अर्थ आहेत. तसंच कच्छचंही आहे. ज्या भागातली कथा सांगणार होतो, तिथं बोलली जाणारी गुजराती वेगळी आहे. त्याचा एक स्लँग आहे.  स्वत:चा एक लहेजा आहे. तशा पद्धतीनं उच्चार करू शकणार्‍या, बोलू शकणार्‍या अभिनेत्रींसाठी आधी एक ऑडिशन ठेवली. ज्या या बोलीत संवाद म्हणू शकल्या त्यांची निवड केली. या सिनेमात गरबादेखील महत्त्वाचा होता म्हणून मग पुन्हा गरबाची ऑडिशन ठेवली. त्यातून मग ज्यांना बोलीभाषा व्यवस्थित येतेय, अ‍ॅक्टिंग येतेय आणि गरबाही येतोय अशा बारा जणींची निवड केली. या बारा जणी व एक बालकलाकार यांना  स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार 13 जणींमध्ये पहिल्यांदाच शेअर होणार आहे.

विशेष म्हणजे, या फार लोकप्रिय नव्हत्या. मात्र त्या सगळ्या जणी नाटक क्षेत्राशी निगडित आहेत. खरंतर आमचे पुरुष कलाकारही नाट्यक्षेत्राशी निगडित आहेत. मी, सौम्य, प्रतीक आमचंही नाट्यक्षेत्राशी घनिष्ठ नातं आहे. हे ठरवून केलं नाही; पण अंतिम यादी आली, तेव्हा सगळेच नाट्यक्षेत्रातले आहोत हे पाहून एक वेगळाच आनंद झाला.

प्रश्‍न- संपूर्ण टीम नाटयक्षेत्राशी निगडीत आहे या गोष्टीची वेगळी काही मदत मिळाली का?

अभिषेक- थिएटरवाली मंडळी फार कष्टाळू असतात. 30-35 दिवस सतत रिहर्सल करूनही आपलं 100 टक्के बेस्ट करायचंय आणि तेही प्रत्येकवेळी हे त्यांना माहीत असतं. नाट्यक्षेत्रातली मंडळी स्वत:ला खूप तयार करतात. मग भाषा असो, उच्चार असो, पात्रातले बारकावे असोत; ते स्वत: तयारी करतात. सहकलाकारांसोबत कसं वागायचं याची त्यांना जाण असते. त्याचा मला खूप फायदा झाला.

प्रश्‍न- सिनेमाचा काळ आणि पट पाहता, तयारी म्हणून तुम्ही कलाकारांसाठी काही कार्यशाळा घेतल्या का?

अभिषेक- सर्वप्रथम बोलीभाषा समजवण्यासाठी, त्या भाषेच्या उच्चारासाठी कार्यशाळा घेतली. त्यानंतर प्रत्येकाला त्यांचं पात्र समजावण्यासाठी कार्यशाळा घेतली. तीन ते चार वेळा पूर्ण स्क्रीनप्ले सांगण्यात आला. मी स्वत: कहाणी नरेट करत असे. जेणेकरून ते जे काही वागणार बोलणार आहेत त्याचे मागचे पुढचे धागे त्यांना पाठ असावेत. बोली भाषेच्याबाबतही असंच होतं की, नुसतं संवाद म्हणणं अपेक्षित नव्हतं; कारण सौम्य जोशीसारखा लेखक जेव्हा संवाद लिहीतो तेव्हा तो असंच काहीही वाक्य लिहीत नाही. त्या प्रत्येक संवादातले अंडरकरंट, अन्वयार्थ माहीत असायला हवेत म्हणून त्यासाठीही आम्ही खूप दिवस घालवले. 

शूटींगच्या आधी एकदा त्यांना प्रत्यक्ष कच्छमध्ये नेलं. तिथले लोक कसं चालतात, बोलतात, थांबतात याविषयीचं निरीक्षण करणं अपेक्षित होतं. शूटींगसाठी एक गाव तयार केलं होतं. ती मातीची घरं होती. या अभिनेत्रींनी सिनेमातल्या आपापल्या घरांना स्वत:च मातीनं सारवलं. शिवाय सिनेमात पाणी भरण्यासंबंधीचे सीन होते. या सीनसाठी त्यांना मडकी उचलायची होती. मडकी उचलून चालण्याची प्रॅक्टिस करवून घेतली. कारण आम्हाला कुठल्याच फ्रेममध्ये कोणीही व काहीही नैसर्गिक वाटू द्यायचं नव्हतं. तसं झालं तर ते फेक वाटलं असतं. अ‍ॅक्टिंग  वाटली असती.

प्रश्‍न- सिनेमाचं अर्थकारण कसं जुळवलं?

अभिषेक- आम्ही चार पार्टनर्स आहोत. मी, प्रतीक गुप्ता, मिंट जानी आणि आयुष पटेल. मुख्य निर्माता आशिष पटेल. आशिष पटेल यांनी सिनेमाची निर्मिती केली. फक्त दहा मिनिटांचं नरेशन ऐकून ते पैसे गुंतवायला तयार झाले. पण एकुणातच ही आमच्यासाठी तशी अवघड गोष्ट होती. अहमदाबादहून 400 किमी दूर जावं लागणार होतं. 45 डिग्रीच्या तापमानात एप्रिलमध्ये शूट होणार होतं, जिथं खाण्या-पिण्याची नीट सोय नाही. राहण्याची सोयदेखील 20 किमी अंतरावर असणार होती. पण आशिषभाईंनी कुठेच हात आखडता घेतला नाही. कुठलाही गुजराती सिनेमा ज्या बजेटमध्ये बनतो त्याच बजेटमध्ये आम्ही सिनेमा केला.

हे खरंतर असंही पाहता येईल की- राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या स्पर्धेत आमच्यापुढं काही उत्तम बंगाली, मल्याळी, पंजाबी आणि अर्थात हिंदीतले सिनेमे होते. त्यातून अशा सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी निवड झाली जो कमी खर्चात बनला. उत्कृष्ट सिनेमा करण्यासाठी मुळात एक चांगली कथा, चांगली टीम हवी असते.

प्रश्‍न- सिनेमातलं नरेशन आजच्या काळाशी किती रिलेट करणारं आहे असं वाटतं? सिनेमातलं स्त्रियांचं जग आजच्या काळाशी सुसंगती दाखवेल असं वाटतं का? 

अभिषेक- मी तर सिनेमातल्या प्रत्येक स्त्रीशी आजही फार रिलेट करतो. मला आजही स्त्रियांच्या जगात एक तर्‍हेचं दमन, दडपण जाणवतं. मागे एकदा माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीनं मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनं सांगितलं की, आम्ही कॉलेजात एकत्र होतो. मग मी तिच्या प्रोफाईलवर गेलो, तर मला तिचा एकही फोटो दिसत नव्हता. सगळे देवदेवतांचे, गुरु-महाराजांचे फोटो. नावावरुन ती माझी कॉलेज मैत्रिणच आहे का याची मला कुठंच खात्री होत नव्हती. शेवटी तिला त्याबाबत स्पष्ट विचारलं तर म्हणाली माझ्या नवर्‍याला आवडत नाही. दुसरीही अशीच एक मैत्रीण जी व्हॉटसअ‍ॅप डीपीवर  फिलॉसॉफी सांगणारे  फोटो लावत असते. मी म्हटलं? तू काय जगाला ज्ञान देत राहतेस. तिचंही हेच उत्तर होतं की नवर्‍याला आवडत नाही दुसरं काही ठेवलेलं. अशा घटना खूप वर्षांपासून माझ्या मनात घोळत होत्या. अशा अनेक गोष्टी तुमच्या मेंदूत घर करून बसलेल्या असतात. मी त्या गोष्टींना या कथेशी जोडलं. तुम्ही असं कुणालाही सांगू शकत नाही की, तू नाचू शकत नाहीस, तू गाऊ शकत नाहीस, तू उडू शकत नाहीस. यू कान्ट मूव्ह... वगैरे. मग भले तुम्ही त्यांचे पिता, भाऊ, बॉयफ्रेंड, पती काहीही असाल. त्या स्त्रिया ट्रिगर पॉईंट होत्या. खूप सारे पुरुष आपल्या पत्नीला शहरीपद्धतीनं दडपण्याचा- अर्बन सप्रेस्ड करण्याचा प्रयत्न करतात. असे सर्व आजच्या काळातील स्त्री-पुरुष या कथेशी रिलेट करु शकणार आहेत.

प्रश्‍न- हा सिनेमा बनवण्यासाठी किती दिवस लागले?

अभिषेक- या सिनेमाचं कथाबीज मनात रुजलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत असं बघितलं तर सिनेमाच्या लेखनासाठी दीड वर्ष लागलं, प्रॉडक्शनसाठी 4 महिने, शूटिंगसाठी 32 दिवस लागले. पोस्टप्रॉडक्शन म्हणजेच एडिटिंग, साउंड डिझायनिंग, पार्श्‍वसंगीत, कलर-करेक्शन अशा सगळ्यासाठी अजून पुढे 9 महिने लागले.

प्रश्‍न- या सिनेमाला गुजरात सरकारनेही 2 कोटींच पारितोषिक जाहिर केलंय ना?

अभिषेक- खरं तर आमच्याकडे  सिनेमा बनवण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिलं जातं. सिनेमा पूर्ण झाल्यावर खर्चाच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून द्यावी लागते. त्यात कथा, दिग्दर्शन आणि तुमची तिकिटं किती विकली गेली या सगळ्यांना गुण दिले जातात आणि त्यावरुन अनुदानाच्या ए, बी, सी, डी या प्रकारानुसार रक्कम मिळते. ए प्रकारच्या अनुदानात 75 लाख रुपये मिळतात. याच अनुदानात एक अशीदेखील शिफारस आहे की -राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर अनुदानासाठी अर्ज करावा लागणार नाही.  पारितोषिकाच्या रक्कमेतून अनुदान आपोआपच दिलं जातं. थोडक्यात, हे सिनेमासाठीचं अनुदानच आहे. मात्र त्याला पारितोषिक समजलं जाईल. हेल्लारोला सुवर्णकमळ आहे म्हणून 2 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळेल. प्रोत्साहन म्हणूनच हे अनुदान दिलं जातं.

प्रश्‍न- सिनेमा अद्याप प्रदर्शित का केला नाहीत?

अभिषेक- आमचा सिनेमा डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होणार होता. त्याआधी आम्हा चौघा पार्टनर्सचं ठरलं होतं की- जोवर कथा कागदावर पूर्ण लिहून होत नाही, तोवर पुढंच काम हाती घ्यायचं नाही. कथाच जोवर स्वत: सांगत नाही की- आता शूटिंग करायला हरकत नाही तोवर पुढं जायचं नाही. त्यामुळं आम्ही लेखनालाही बराच काळ घेतला. तीच गोष्ट पोस्टप्रॉडक्शनच्या मिटींगमध्येही ठरवली. डायरेक्टर व एडीटर म्हणून आपण पूर्ण समाधानी होत नाही तोवर एडिटिंगचं काम करत रहायचं. पोस्टप्रॉडक्शनसाठी आम्ही पूर्ण दिवस घेतले.

सेन्सॉरकडून 31डिसेंबर 2018 रोजी सर्टिफिकेट घेतलं. म्हणून 2018च्या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो. असा विचार होता की, मार्च-एप्रिलपर्यंत पुरस्कार जाहीर होतील आणि मग सिनेमा रिलीज करू. मात्र यंदा निवडणुका लागल्या मग सगळं प्लॅनिंग फसलं. दरम्यान  बाहेरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमा पाठवायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची अशी अटच असते की तिथं फिल्मचा प्रिमियरच होऊ शकतो. लोक पैसे देऊन फेस्टिव्हलला आलेले असतात. सिनेमा आधी रिलीज केला तर ते फेस्टिवलसाठी घेत नाहीत. बर्लिन, टोरंटो इथंही फेस्टिवलसाठी सिनेमा पाठवला, तिथूनही अद्याप उत्तरं आलेले नाही. आणि राष्ट्रीय पुरस्कारही घोषित होत नाहीयेत. अशा एका दुविधेत आम्ही अडकून होतो. आता मात्र ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलीज करू.

प्रश्‍न- पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तुमच्या भावना काय आहेत?

अभिषेक- आज मी 36 वर्षांचा आहे. साडेपाच वर्षांपूर्वी डिसेंबर 2013 मध्ये मला मुलगी झाली. मी अत्यानंदात होतो. मुलीच्या जन्मानंतर मी इतका हरखून गेलो होतो की, बस्स! या प्रतीचा आनंद आपल्याला पुन्हा मिळेल असं वाटलं नव्हतं. मात्र त्या प्रतीचाच संतोष मला आता होतोय. सांगता येणार नाहीत अशा भावना आहेत.

प्रश्‍न- गुजरातमध्ये सिनेमा कसा स्वीकारला जातो. तिथलं मार्केट कसं आहे? हेल्लारो या सिनेमाचा आता गुजराती सिनेमासृष्टीत काय रोल राहील?

अभिषेक- इथं अद्यापही व्यावसायिक, मनोरंजनात्मक सिनेमे करण्याचा प्रघात आहे. लोकांना आवडतील असेच मसालापट बनतात आणि पाहिले जातात. असंच होत राहिलं तर तुमची सिनेमासृष्टी पुढं जात नाही. मग तो धंदा होऊन बसतो. फिल्ममेकरसाठी तो धंदा असायला नको. धंदा निर्मात्यासाठी, तंत्रज्ञांसाठी असू शकतो; मात्र फिल्ममेकर्ससाठी नसावा. अन्यथा, सिनेमानिर्मितीतून कुठलाच विचार पुढं येणार नाही. मी पाहतो, श्‍वास सिनेमानंतर मराठी चित्रपटसृष्टी पुनरुज्जीवित झाल्यासारखी वाटते. तसंच हेल्लारोनंतर गुजराती सिनेमासृष्टीत व्हावं, अशी अपेक्षा आहे. हेल्लारोने गुजरात सिनेमासृष्टीला एक नवी दृष्टी देण्यात यश मिळवलं, तर तो फारच मोठा पुरस्कार ठरेल. गुजराती सिनेमा अद्यापही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला नाही. हेल्लारोमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुजराती सिनेमानं जाणं, ही फार मोठी गोष्ट ठरेल.

प्रश्‍न- शेवटचा प्रश्‍न. मगाशी तुम्ही साने गुरुजींचा उल्लेख केलात. आता हेल्लारोला सुवर्णकमळ मिळाले आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ वर बेतलेल्या सिनेमाला पहिले  सुवर्णकमळ मिळाले होते. ‘श्यामची आई’ आपण पाहिलाय?

अभिषेक-  सर्वप्रथम सुवर्णकमळ ‘श्यामची आई’ चित्रपटाला मिळालंय, हे मला ठाऊक आहे. पूर्वी जेव्हा वेगवेगळ्या भाषा, प्रदेशातले सिनेमे मिळवून पाहायचो, त्या यादीत श्यामची आई हा सिनेमा होता. मात्र दहा-बारा वर्षांपूर्वी तितक्या सहजतेने सिनेमे उपलब्ध होत नसायचे. कदाचित माझे प्रयत्नही अपुरे पडले असतील. त्यामुळं सिनेमा पाहायचा राहिला. मात्र मी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं आहे. साने गुरुजींचं लेखन परिचित आहे. श्यामची आईचं साहित्यिक मूल्य मी जाणतो. त्यामुळंच आज कोणी म्हटलं की माझा हेल्लारो सिनेमा श्यामची आई या चित्रपटाच्या पंक्तीत बसणारा आहे, तर ती माझ्यासाठी फारच सन्माननीय बाब ठरेल.

(मुलाखत व शब्दांकन : हिनाकौसर खान)

Tags: Abhishek Shah Hellaro National Award Winner Gujarti cinema Ketan Mehta Sane Guruji Saumy Joshi Interview सिनेमा अभिषेक शाह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुवर्णकमळ गुजराती सिनेमा केतन मेहता साने गुरुजी सौम्य जोशी मुलाखत Heenakausar Khan-pinjar हिनाकौसर खान-पिंजार Load More Tags

Comments:

Suniti Deo

Very interesting story. Would like to see the movie though do not understand Gujrati. congratulations.

Ravi patil

Amazing concept ..! Congratulations..1

Namdeo

चित्रपटाविषयी उत्सुकता वाढविणारी ही मुलाखत आहे . Suppression to expression ही theme भारी वाटतेय!

Add Comment