ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कारवायांवर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक

विल्यम डॅलरिम्पल लिखित “Anarchy” (अराजक) या पुस्तकाचा परिचय

https://www.britannica.com/topic/East-India-Company

1768 ते 72 या काळात बंगाल, बिहार आणि ओरिसा या पूर्वेकडील राज्यांना अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागला. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेती उत्पादन कमी झाल्यामुळे त्यातून होणारी करातली संभावित तूट भरून काढण्यासाठी कंपनीने दर वाढवले व अत्यंत निष्ठुरपणे कर वसुलीचे धोरण अवलंबिले. धान्याची लागवड न करता शेतकऱ्यांना अफू आणि निळीचे उत्पादन करण्यास भाग पाडले. भारतात इतरत्र उपलब्ध असलेले धान्य बंगालमध्ये आणून ते नागरिकाना वितरित करणे शक्य असूनही तसे काही केले नाही. उपलब्ध धान्य कंपनीचे कर्मचारी आणि उच्चपदस्थ वर्गातील लोकांसाठी वापरले. साहजिकच व्यापाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा उठवत साठेबाजी करून किमतींमध्ये भरमसाठ वाढ केली.

ब्रिटिशांच्या भारतातील सत्ताग्रहणासंबंधात आपण शाळेत जो इतिहास शिकलो त्यात सर्वसाधारणपणे 1857 मधील प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा क्लाइव्हकडून झालेला पराभव हा प्रारंभबिंदू असे. त्यानंतर 1857 मधील सैनिकांच्या उठावापर्यंतच्या शंभर वर्षांच्या कालखंडाबद्दल फारच जुजबी माहिती दिली जाई. प्रत्यक्षात सतराव्या शतकाच्या प्रारंभापासून पुढील अडीचशे-तीनशे वर्षांचा काळ अनेक घडामोडींचा होता. मुघल बादशाह आणि त्यांचे विविध प्रांतांतील सुभेदार, पेशवे आणि मराठा सरदार, दक्षिणेतील वेगवेगळ्या राजवटी यांमधील अराजक आणि बेबंदशाही यांचा पुरेपूर लाभ उठवत भारतात प्रामुख्याने व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने या सर्वांना क्रमाक्रमाने नामोहरम केले आणि दोनशे वर्षांत संपूर्ण भारत आपल्या कह्यात आणला. जवळपास 15-16 कोटींची लोकसंख्या असलेला खंडप्राय देश काही शेकड्यांच्या, फार फार तर हजारांच्या संख्येने आलेल्या इंग्रजांनी बळकावला. अपरिचित प्रदेश, अनेक भाषा, प्रतिकूल हवामान, दळणवळण आणि संपर्कातील अडचणी यांवर मात करत हे कसे काय शक्य झाले असेल? अर्थात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी अशीच करामत मध्य आणि दक्षिण अमेरिकेत 16-17 व्या शतकात केली होती, आणि भारतापाठोपाठ एकोणीसाव्या शतकात स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी आफ्रिका खंडात हाच कित्ता गिरवला. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात याचे याहून कोणते उत्तम उदाहरण पाहायला मिळेल?

अमेरिका आणि आफ्रिकेचे सोडून देऊ, पण आपल्या देशाच्या इतिहासाचा हा हिस्सा जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. विल्यम डॅलरिम्पल या स्कॉटीश लेखकाने “The Anarchy – The East India Company, Corporate Violence, and the Pillage of an Empire”  या 500 हून अधिक पृष्ठांच्या ग्रंथातून हे सर्व विस्ताराने मांडले आहे. 61 वर्षीय डॅलरिम्पल हे  प्रवासवर्णनकार आणि इतिहासकार आहेत. भारताचा इतिहास, संस्कृती व विशेषतः मुघलकालीन व ब्रिटिशकालीन इतिहासावरील त्यांच्या संशोधनासाठी ते ओळखले जातात. वयाच्या 22 व्या वर्षापासून सुरु झालेल्या लेखनयात्रेत आतापर्यंत त्यांची 12 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. झानाडू देश, दिल्ली तसेच भारत-पाकिस्तान-श्री लंका, मध्यपूर्व या देशांची प्रवासवर्णने, पहिले Anglo- Afghan युद्ध, प्राचीन भारताने जगाच्या संस्कृती, विज्ञान, धर्म आणि व्यापारावर टाकलेला प्रभाव असे अनेक विषय त्यांनी आपल्या पुस्तकांमधून हाताळले आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत; त्यांच्या पुस्तकांचे मराठीसह अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. 2019मध्ये प्रकाशित झालेलं “द अनार्की” हे त्यांच्या सर्वाधिक महत्वाच्या आणि लोकप्रिय पुस्तकांपैकी एक आहे.

साहित्यात रुची असलेल्यांना हे माहीतच असेल की अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या “जयपूर लिटररी फेस्टिवल” या साहित्य महोत्सवाचे डॅलरिम्पल हे सह संस्थापक होते. ते आणि त्यांचे कुटुंबीय यांचे वास्तव्य बराच काळ भारतातच असते. या वर्षाच्या आरंभीच दिवंगत झालेले विख्यात पत्रकार मार्क टुली यांच्याप्रमाणेच डॅलरिम्पल यांनादेखील भारताविषयी विशेष ममत्व वाटते आणि ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या लिखाणात प्रतिबिंबित होते.

प्रवाही कथनशैली आणि व्यक्तिचित्रण यांमुळे त्यांचे इतिहासलेखन अत्यंत वाचनीय बनते. तथापि भारताच्या इतिहासाविषयी त्यांनी काढलेल्या काही निष्कर्षांवर अनेक भारतीय इतिहासकार आणि अभ्यासक यांनी असहमती दर्शविली आहे. ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ लावताना अशी मतमतांतरे नेहमीच होतात. काहीही असले तरी आधुनिक काळातील भारताच्या इतिहासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे सादर करणाऱ्या लेखकांमध्ये डॅलरिम्पल यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

“The Anarchy” हे पुस्तक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे रूपांतर एका व्यापारी संस्थेतून भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय व्यवस्थेत कसे झाले याचे कथन करते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर एकीकडे मुघल साम्राज्य उतरणीला लागले असताना सतराव्या शतकाच्या अखेरीपासून कंपनीचा विस्तार कसा होत गेला याचा मागोवा हे पुस्तक घेते. 

ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज आणि कोट ऑफ आर्म्स

इ. स. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना लंडनमध्ये एका लहानशा कार्यालयात झाली. तत्कालीन सरकारमधील काही उच्चपदस्थांच्या सहभागामुळे भारत आणि त्याच्या आसपासच्या देशांबरोबर व्यापाराचे सर्व हक्क या कंपनीला देण्यात आले. मात्र सुरुवातीची काही वर्षे कंपनीसाठी अत्यंत आव्हानात्मक होती. काही सागर मोहिमा फसल्या, भारतातील मुघल आणि इतर राजवटी कंपनीला हातपाय पसरू देत नव्हत्या.  भारतात पाठविलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी तरीही हार मानली नाही, ते चिवटपणे प्रयत्न करत राहिले. सुरतमध्ये त्यांनी आपला पहिला तळ उभारला, आणि त्यापाठोपाठ मद्रासमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात बस्तान बसविले. भारतातील स्थानिक व फ्रेंचांसारख्या परकीय राजवटी यांच्याशी प्रसंगी दोन हात करण्यासाठी कंपनीने आपली फौजदेखील तैनात केली होती. मूठभर अधिकारी सोडले तर शिपाईदलात भारतीयांचाच भरणा असे. “राष्ट्रीयत्वा”च्या भावनेचा अजून उदय व्हायचा होता, लोक निर्वाहासाठी कोणाच्याहीसाठी काम करायला तयार असत. भारतात हातपाय पसरण्याचे फ्रेंचांचेदेखील मनसुबे होते. मात्र काही चकमकींमध्ये कंपनीच्या फौजांनी त्याना नामोहरम केल्यावर त्यांनी भारतातील महत्वाकांक्षाना मुरड घातली.

रॉबर्ट क्लाईव्ह या कर्तबगार आणि तडफदार अधिकाऱ्याची भारतात नेमणूक झाल्यानंतर हालचालींना वेग आला. सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर याला फितूर करून प्लासीची लढाई कंपनीच्या फौजांनी जिंकली व बंगालमध्ये एकछत्री अंमल सुरु झाला. इथून पुढे कंपनीचे धोरण अधिक महत्वाकांक्षी व आक्रमक बनले. लढायांसोबत राजकीय कारस्थाने, संधिसाधू हातमिळवण्या, स्थानिक राजांचे आपापसातील वैर याचा फायदा घेत कंपनीने पद्धतशीरपणे अधिकाधिक क्षेत्र आणि संपत्ती गोळा केली. बंगाल ही त्यांच्यासाठी पैशाची टांकसाळ बनली, त्यातून इतरत्र हातपाय पसरायला बळ मिळाले. कंपनीचे अधिकारी आणि प्रामुख्याने क्लाईव्ह यांनी अतोनात भ्रष्टाचार केला. मात्र क्लाईव्हचे नशीब जोरावर होते, त्याच्यावर कोणतेही बालंट आले नाही.

1768 ते 72 या काळात बंगाल, बिहार आणि ओरिसा या पूर्वेकडील राज्यांना अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागला. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेती उत्पादन कमी झाल्यामुळे त्यातून होणारी करातली संभावित तूट भरून काढण्यासाठी कंपनीने दर वाढवले व अत्यंत निष्ठुरपणे कर वसुलीचे धोरण अवलंबिले. धान्याची लागवड न करता शेतकऱ्यांना अफू आणि निळीचे उत्पादन करण्यास भाग पाडले. भारतात इतरत्र उपलब्ध असलेले धान्य बंगालमध्ये आणून ते नागरिकाना वितरित करणे शक्य असूनही तसे काही केले नाही. उपलब्ध धान्य कंपनीचे कर्मचारी आणि उच्चपदस्थ वर्गातील लोकांसाठी वापरले. साहजिकच व्यापाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा उठवत साठेबाजी करून किमतींमध्ये भरमसाठ वाढ केली. या सर्वाच्या परिणामी स्थानिक जनता आणि पशु पक्षी यांची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. एका अंदाजानुसार जवळपास एक कोटी लोक, एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश  इतके बळी गेले आणि अनेक जणांना आजाराचा सामना करावा लागला. या सर्वाचे पडसाद इंग्लंडमध्ये पडले, ब्रिटिश शासन व तेथील जनतेने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. (मात्र ब्रिटिशांच्या अमदानीत 1942मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला, तेव्हांदेखील हेच घडले.) 

1760 च्या सुमारास ब्रिटनमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीची झळ भारतातील विविध क्षेत्रातील कारागीरांना बसली. इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतात खपावा यासाठी भारतात तयार होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध आणून येथील कारागिरांचे कंबरडेच मोडले गेले. केवळ कच्चा माल भारतातून बाहेर तर ब्रिटनमध्ये तयार झालेला माल भारतात येऊ लागला. एके काळी जागतिक व्यापारात आघाडीवर असलेला भारत आता झपाट्याने खोल गर्तेमध्ये जाऊ लागला.

क्लाईव्हनंतर Warren Hastings  ला कंपनीचा भारतातील प्रमुख अधिकारी म्हणून नेमले गेले. त्याने उत्तम काम केले, कार्यपद्धतींमध्ये सुसूत्रता आणली. आधीच्या भ्रष्ट व्यवहारांच्या तुलनेत स्वच्छ कारभार या काळात झाला. मात्र त्याच्या हितशत्रूंनी त्याच्या विरुद्ध आरडओरडा केला व त्याला महाभियोगाला सामोरे जावे लागले. पुस्तकातील एक स्वतंत्र प्रकरण या घटनेवर आहे, अखेरीस तो सर्व आरोपातून मुक्त झाला; मात्र दीर्घ काळ त्याला या दिव्यातून जावे लागले. 

पुस्तकातील कथनाची व्याप्ती प्रामुख्याने 1799 मधील टिपूचा पाडाव व त्यानंतर 1803 पर्यंत मुघल साम्राज्याला पूर्णपणे नामोहरम करून संपूर्ण भारतावर आपला एकछत्री अंमल कंपनीने कसा बसवला येथपावेतो आहे. एकीकडे हे घडवून आणत असतानाच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि भरमसाठ खर्च यांमुळे कंपनीच्या डोक्यावर 3.15 कोटी पौंडांचे (आजच्या हिशेबाने 330 कोटी पौंड इतके) कर्ज जमा झाले होते. याची परिणती वेलस्ली याला परत बोलावण्यात झाली. त्यानंतर क्रमाक्रमाने कंपनीच्या कारभारावर अधिकाधिक अंकुश ठेवण्यात आला. 1857 मधील “पहिल्या स्वातंत्र्यलढ्या”चा कंपनीच्या फौजांनी यशस्वीपणे बीमोड केल्यानंतर पुढल्याच वर्षी भारताचा राज्यकारभार ब्रिटिश शासनाने आपल्या हातात घेतला. 1874 मध्ये कंपनीने अखेरचा श्वास घेतला हे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते! या अखेरच्या प्रकरणाचे शीर्षक “The Corpse of India”  (मृतवत भारत) बरेच काही सांगून जाते. 

डॅलरिम्पल यांच्या कथनाचे मध्यवर्ती सूत्र हे आहे की ब्रिटिश साम्राज्याचा भारतातील उदय निव्वळ अधिक सरस बळामुळे नव्हता, तर राजकीय फुटीरता (fragmentation), कंपनीची वाढती आर्थिक ताकद, ब्रिटिश शासनाचे पाठबळ, लष्करी संघटना आणि दुबळी झालेली मुघल सत्ता यांचा एकत्रित परिणाम होता.

उत्तर आणि पूर्व भारतातील मुघल साम्राज्याशी निगडित सुभेदार यांच्या बरोबरील कंपनीच्या संघर्षाचे खूपच विस्तृत वर्णन, अनेक तपशीलांसह पुस्तकात वाचायला मिळते. आपण ज्याचे फारसे नावदेखील ऐकले नाही त्या शाह आलम द्वितीय याला पुस्तकात खूपच महत्व दिले गेले आहे. वस्तुतः त्याचे विशेष काही कर्तृत्व नव्हते. केवळ नामधारी राजा असलेला तो गादीवरून हुसकून लावला गेल्याने बंगालमध्ये परागंदा झालेला. कसेही करून दिल्लीला  सिंहासनावरूढ व्हायचे, ते केवळ तोंडदेखले, सत्ताहीन का असेना, अशा मनोधारणेचे हे व्यक्तिमत्व. तुलनेने दक्षिणेकडील राजांबरोबरील गतविधींचे संक्षिप्त चित्रण पुस्तकात आहे,


हेही वाचा : भारतीय संस्थानांच्या इतिहासाचा धांडोळा (अजिंक्य कुलकर्णी)


नाना फडणवीसांचा गौरवपूर्ण उल्लेख पुस्तकात आहे. कंपनीच्या विस्तारवादी योजनांचा धोका त्यांनी ओळखून इतर स्थानिक सत्तांबरोबर संघटीत होऊन एकत्रितपणे प्रतिकार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. मात्र नेहमीप्रमाणे काहींचा “अहं” आणि काहींकडून फंदफितुरी यांमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. एकूणच मराठे/ पेशवे यांच्याबद्दल मोजकेच उल्लेख पुस्तकात आहेत. मोहीमांदरम्यान करत असलेल्या अमाप लुटीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये मराठयांबद्दल अविश्वास आणि नाराजी  असल्याचे चित्र उभे राहते.

काही वर्षांपूर्वी टिपू सुलतानावरून आपल्याकडे उलटसुलट राजकीय वाद झडले होते. डॅलरिम्पल यांच्या पुस्तकातून त्याची एकुणात चांगली प्रतिमा उभी राहते. परकीय प्रदेशांवर आक्रमण करताना त्याने तेथील मंदिरांचा विध्वंस केला, मात्र त्याच्या स्वतःच्या प्रदेशातील देवळांना तो आर्थिक सहाय्य करत असे. हिंदू पुजाऱ्यांचे, धर्मगुरूंचे आशीर्वाद तो घेई. तसे पाहता त्या काळची युद्धे ही धर्माच्या आधारावर नसत. धर्माला रोजच्या जीवनात अवास्तव महत्व नव्हते.

मुघलकालीन भारताचे नकाशे, महत्वाच्या व्यक्ती आणि घटनांची रंगीत चित्रे असणारी 48 पाने हे या पुस्तकाचे आणखी एक आकर्षण आहे. नाना फडणवीसांचे पूर्ण पानभर चित्र आहे. महादजी शिंदे व त्याचा वारस दौलतराव यांनादेखील चित्ररूपात पाहावयास मिळते. Warren Hastings च्या महाभियोगाचे दोन पानी चित्र, तसेच पोल्लीलूरच्या लढाईतील विजयाची स्मृती म्हणून टिपूने त्याच्या दर्यादौलत बागेत केलेले भित्तीचित्र, शाह आलम क्लाईव्हला बंगालची सनद नजर करत असल्याचे चित्र, ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेसाठी गुंतवणूक करणाऱ्या 101 जणांच्या यादीतील एक पान ही काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे.

निवेदनाच्या ओघात इतकी नावे येत राहतात की काही वेळा गडबडायला होते. ही अडचण ओळखून लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीला प्रमुख व्यक्तींची थोडक्यात ओळख करून दिली आहे. हा “पात्र परिचय” दहा पानांचा आहे. जागोजागी तळटीपा आहेत, त्यांची संख्या 1100 च्या वर, म्हणजे दर पृष्ठामागे सरासरी दोन टीपा अशी भरते. पुस्तक लिहिताना ज्या दस्तऐवजांचा वापर केला आहे ती सूची जवळपास 30 पानांची आहे. पुस्तक लिहिताना घेतलेल्या परिश्रमाची कल्पना या वरून येऊ शकेल. तरीही हे पुस्तक काही प्रमाणात घटनांची जंत्री आणि व्यक्तिचित्रणे या पातळीवर राहिले आहे. ज्यांना या विषयावर अधिक  अभ्यासपूर्ण, विश्लेषक विवेचन हवे असेल त्यांच्यासाठी फिलिप लॉसन यांचे “The East India Company : A History”  किंवा जी. जे. ब्रायंट यांचे “The Emergence of British Power in India 1600-1784” आणि भारतीय दृष्टिकोनासाठी आर. सी. मजुमदार यांचे “British Paramountcy and Indian Renaissance”  ही पुस्तके उपयुक्त ठरतील. एवढ्या खोलात जाण्याची इच्छा नसणाऱ्या सर्वसाधारण वाचकांसाठी डॅलरिम्पल यांचे पुस्तक उत्तम आहे.

हे पुस्तक प्रकाशित होऊन 6-7 वर्षे उलटून गेली असली तरी त्यातील कथन आधीच्या काळासंबंधी असल्याने ते समकालीनच म्हणता येईल. सतराव्या आणि अठराव्या शतकाचा भारताचा इतिहास तपशीलवार जाणण्यात ज्यांना रस आहे  आणि जाडजूड पुस्तक पाहून ज्यांची छाती दडपणार नसेल त्यांनी “Anarchy” जरूर वाचावे. मराठीतूनच हा सर्व इतिहास वाचायचा असेल तर रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी “अराजक” या नावाने मराठीत केलेला अनुवाद उपलब्ध आहे.

- प्रमोद के. बापट
bapatpk@yahoo.co.in 
(आयआयटी व आयआयएम मधून उच्च शिक्षण घेतलेल्या प्रमोद बापट यांनी उद्योग क्षेत्रांत दीर्घकाळ काम केले आहे. त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन साधना साप्ताहिकाच्या अंकांत प्रसिद्ध झालेले आहे.)

Tags: इंग्रज इंग्रजांची सत्ता ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश ब्रिटिश सत्ता ब्रिटिश राजवट भारत पाकिस्तान विल्यम डॅलरिम्पल अनार्की इतिहास 1857 व्यापार गुलामगिरी राजवट स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्यसंग्राम 1947 1872 Load More Tags

Add Comment