साधना प्रकाशन - शरच्चंद्र चट्टोपाध्याय - 'श्रीकांत' व 'सव्यसाची' - अनुवाद - मामा वरेरकर

बंगालीतील प्रख्यात कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय (15 सप्टेंबर 1876 - 16 जानेवारी 1938 ) यांचे 150 वे जयंती वर्ष आज, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. भारतातील विविध भाषांमध्ये आणि इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट आणि मालिका आलेल्या आहेत. 1940 च्या दशकात शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्या मराठीमध्ये मामा वरेरकर यांनी अनुवादित केल्या. गेली काही वर्षे ती अनुवादित पुस्तके उपलब्ध नव्हती. सुप्रिया सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून साधना प्रकाशनाकडून त्यापैकी पाच अनुवादित कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत आहोत. नव्या आवृत्त्यांची संपादन प्रक्रिया, प्रस्तावना, आणि लेखक व अनुवादक यांचा परिचय यांचे लेखन त्यांनी स्वतःच केले आहे. आज 'श्रीकांत' व 'सव्यसाची' या दोन कादंबऱ्यांचा प्रकाशन समारंभ साधनाच्या सभागृहात पार पडला. आगामी वर्षभरात 'शेषप्रश्न', 'चरित्रहीन' व 'देवदास' या तीन कादंबऱ्यांच्याही नव्या आवृत्त्या आणणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला सुप्रिया सहस्रबुद्धे, ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, प्राध्यापिका विजया देव, लेखिका वर्षा गजेंद्रगडकर आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती. विनोद शिरसाठ यांनी नव्या आवृत्तीमागची प्रकाशकीय भूमिका स्पष्ट केली. भारतातल्या अनेक भाषांमधल्या साहित्यावर ज्यांचा प्रभाव आहे, सामाजिक स्वातंत्र्य आणि स्त्रीवाद याविषयी ज्यांची काळाच्या पुढची भूमिका राहिली आहे अशा एका महत्त्वाच्या लेखकाची महत्त्वाची पुस्तके पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचा मानस यांनी बोलून दाखवला. सुप्रिया सहस्रबुद्धे यांनी शरच्चंद्रांच्या साहित्यातले वेगवेगळे विचार त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आणि त्यांच्या साहित्याचा एकूण भारतीय साहित्यावर असलेला प्रभाव याविषयी विवेचन केले. उमा कुलकर्णी यांनी मामा वरेरकर यांची अनुवादक म्हणून असलेली श्रेष्ठता दाखवून दिली. विजया देव आणि वर्षा गजेंद्रगडकर यांनी या प्रकारचे महत्त्वाचे साहित्य पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी साधना करत असलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.