मुलांना प्रश्नोपनिषद बनवणाऱ्या लीलाताई

प्रयोगशील शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, 'सृजन आनंद शिक्षण केंद्र' या संस्थेच्या संस्थापिका, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका लीला पाटील (वय 93 वर्षे) यांचे 15 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची जडणघडण, व्यक्तिमत्त्व, शिक्षणविषयक त्यांचा दृष्टीकोन यांचे ओझरते दर्शन घडवणारा हा लेख.       

प्राचार्य लीला पाटील. महाराष्ट्रातील शिक्षक प्रशिक्षण आणि बालशिक्षण या दोहोंचा इतिहास या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्या सुविख्यात मराठी साहित्यिक प्रा. ना. सी. फडके यांच्या कन्या. लीला शाळकरी पोर होती, तेव्हा बाबांकडे खडूचा हट्ट धरायची. बाबाही न विसरता कोटाच्या खिशात तिच्यासाठी खडूचे तुकडे ठेवून असायचे. लहानपणी बाबांनी हाती दिलेल्या खडूवर लीलाताईंनी आपलं सारं जीवन पेललं. 

प्रा. ना. सी. फडके कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे तत्त्वज्ञान नि तर्कशास्त्राचे प्राध्यापक. पण स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध. सन 1942च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लाठीहल्ल्याच्या प्रतिकार केला, म्हणून त्यांना अटक झालेली. तत्पूर्वी सन 1930 च्या कायदेभंग चळवळीसाठी जी राज्यसमिती (War Council) नेमण्यात आली होती, त्यातही प्रा. ना. सी. फडके होते. ब्रिटिश पोलिसांच्या इंटिलिजन्सचे रिपोर्ट मध्यंतरी वाचनात आले. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय नि प्रभावी व्यक्तींची जी यादी आहे, त्यात प्रा. ना. सी. फडके नाव आहे. 

हे मी अशासाठी सांगत आहे की, या अशा प्रभावात, संस्कारात लीलाताई वाढल्या असल्यामुळे तरुणपणी त्या विद्यार्थी चळवळीत आपोआप सक्रीय झाल्या. बापूसाहेब पाटील, यशवंत चव्हाण, वसंत नाईक, मनोहर बागी, डेव्हिड डिसिल्वा या त्या काळात सक्रीय कार्यकर्त्यात लीला फडके ही एकटीच तरुणी सक्रीय असायची. ‘स्टुडंट युनियन’चे ‘डिक्टेटर’ बापूसाहेब पाटील यांची तडफ त्यांच्या आकर्षणाचं कारण बनली.

बापूसाहेब पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे भाचे. उभय घरात पारंपरिक विरोध. पण कर्मवीरांचा उदारपणा कामी आला नि उभयता विवाहबद्ध झाले. पहिला संसार कोरगावकरांच्या विनयकुमार छात्रालयात थाटला. लीलाताई प्रथम कोल्हापूर हायस्कूलमध्ये शिक्षिका झाल्या व नंतर शासकीय सेवेत प्राध्यापक. अकोला, पुणे, अमरावती, रत्नागिरी अशी सेवा करत सरतेशेवटी कोल्हापूरी स्थिरावल्या. या काळात बापूसाहेब पूर्णवेळ समाजसेवक झालेले. लीलाताई दर महिन्याला त्यांना पैसे पाठवत. हे ठरवून उचलेलं सतीचं वाण.

निवृत्तीनंतर लीलाताई पाटील यांचं व्यक्तिमत्त्व चहुबाजूंनी फुलत गेलं. त्यांनी ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र’ कोल्हापूरात सुरू केलं. चारएक दशकांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यानं शिक्षणाचं नवं असं भान त्यांना दिलेलं. शासकीय चौकटीत त्यांचे हात बांधलेले होते. निवृत्तीनंतर त्यांनी मुक्त शिक्षणाचा प्रयोग आरंभला. शिक्षण सृजनात्मक हवं. ते आनंददायी असायला हवं असा आग्रह धरणाऱ्या लीलाताईंनी शासनाकडे ‘सृजन आनंद विद्यालय’साठी परवानगी मागितली. परवानगी शासनाची, अटी मात्र लीलाताईंच्या. काय तर शाळा प्रयोगशील असेल, शिक्षक नेमायचे अधिकार शाळेचे असतील, शाळा शासन अनुदान घेणार नाही, सबब शाळेवर शासनाचे कोणतेही बंधन असणार नाही. त्याच सुमारास असेच दोन प्रस्ताव कोल्हापूरहून गेलेले. एक होता माईसाहेब बावडेकरांचा. हायस्कूल मान्यतेचा. दुसरा होता बालकल्याण संकुल, कोल्हापूरच्या ‘सुसंस्कार विद्यालय’चा. शिक्षणाधिकारी, शिक्षण सचिव, शिक्षणमंत्री पेचात आलेले. प्राथमिक शिक्षणाच्या स्वायत्ततेचा लीलाताईंचा हा पहिला उभा दावा. नंतर त्यांनी तो विविध उपक्रम, प्रकल्पांतून सिद्ध करून दाखवला.

म्हणजे असे की समाज, पालक, शासनाच्या समजुतीसाठी औपचारिक मान्यता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके स्वीकारायची. पण अध्यापन मात्र कृतिशील, आनंददायी, उपक्रमी ठेवायचं. मुलांना बोलतं करणं, प्रश्न विचारायला वाव, स्वातंत्र्य द्यायचं. मुलांच्या कल्पना, आविष्काराला प्रोत्साहन ही त्यांच्या शिक्षणाची पद्धत. त्यावर भर.

‘ऐलमा पैलमा शिक्षण देवा’, ‘शिक्षणातील ओॲसिस’, ‘ओलांडताना...’, ‘लिहिणं मुलांचं, शिकवणं शिक्षकांचं’, ‘शिक्षण घेता- देता’, ‘बिनभिंतीची शाळा’ (प्रयोगशील शिक्षण) ‘अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी’, ‘प्रवास ध्यासाचा... आनंद शिक्षणाचा’, ‘बालक हक्क : मुलंच जेव्हा बोलू लागतात’, ‘प्रजासत्ताकाची मशागत’, ‘गाज बालिका वर्षाची’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी शिक्षण विषयक आपली संकल्पना साधार विशद केली आहे. ही पुस्तके म्हणजे त्यांच्या शैक्षणिक प्रयोगांच्या नोंदवह्याच होत.

रवींद्रनाथ टागोर, मादाम माँटेसरी, गिजुभाई बधेका, साने गुरुजी या साऱ्यांनी मुलांसाठी जे करून ठेवलं आहे, ते वाढवायला हवं असा ध्यास घेतलेल्या लीलाताई. शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. उपजत स्वागतशील असल्यामुळे त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याबद्दल कधी तक्रार केली नाही. केलं असेल, तर कौतुकच. ‘मुलं मुलंच असतात’ या एका ब्रीदावर त्यांचा कोण विश्वास. प्रदर्शनातील दिखाव्यापेक्षा मुलांच्या सहज सृजनाचं सौंदर्य त्यांना मोहक वाटत आलेलं.

विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचा स्वाध्याय अधिक हवा यावर त्यांचा भरत असायचा. त्यांची गुणग्राहकता सदैव अनुकरणीय असायची. सगळ्यांकडून शिकायची त्यांची तयारी होती. मुलांच्या गृहपाठाच्या वह्यांत त्या बाल्य शोधत राहायच्या. मुलांना भरपूर देता यावं म्हणून भरपूर वाचायच्या. वाचन त्यांचं चतुरस्र होतं. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजीची चांगली जाण होती. शिक्षकांनी कान, डोळे, मन, हृदय, बुद्धी सर्व उघडं ठेवलं पाहिजे, असं त्यांना वाटत राहायचं. शिक्षक घडवण्यावर त्यांचा भर होता. सुचिता पडळकर, निमाताई पोतनीस, रोहिणी संत, नीतू बावडेकर, विदुला स्वामी, शिक्षकांची शृंखला अशी आज आठवत राहते. लीलाताईंच्या ध्यासातून ‘फुलोरा’, ‘सुसंस्कार’, ‘टुलिप’ सारख्या शाळा विकसित झाल्या. 

त्यांना प्रयोगशील चित्रपट, गाणी, कला, संगीत, आवडायचं. निर्जिव रांगोळीपेक्षा पानाफुलांचं सुशोभन हा त्यांचा आणखी एक आस्वादक पैलू. कार्यक्रम, उपक्रम, न थकता करणाऱ्या लीलाताई. गाण्याचं वेड इतकं की दहाएक डायऱ्या करून कवितांचा संग्रह. प्रत्येक प्रसंगाला योग्य कविता, गीत सादर करणं, ही त्यांची खासियत. नवं ते स्वीकारायला त्या सदैव तत्पर. म्हणून मग निवृत्तीनंतर त्यांनी बॉबकट केला. मग त्या चुडीदार घालू लागल्या. क्रांतीचा सोस इतका की, प्रत्येक नव्यामागे खंबीर उभ्या राहायच्या. त्यांचं पाठबळ म्हणजे लढाईस मिळालेलं विजयाचं वरदान असायचं. त्यांना तस्लिमा नसरीन, अमृता प्रीतम, शबाना आझमी प्रिया तेंडुलकर यांचं कोण कौतुक. तेच विद्याताई, रेणूताईंचं पण.

समाजाच्या विविध उपेक्षित वर्ग समूहांबद्दल लीलाताईंच्या मनात अकृत्रिम आस्था असायची. आपल्या 'सृजन'ला त्यांनी 'चेतना', 'हेल्पर्स', 'बालकल्याण संकुल', 'अक्षरानंद', 'मिळून साऱ्याजणी', 'नारी मंच' अशा साऱ्यांशी जोडलं होतं. 'मी नि माझं' असं एकलकोंड्या बेटाचं सामाजिक काम करण्याला त्यांचा एकप्रकारे विरोधच असायचा. 'स्वयंसिद्धा', 'बालमंदिर' (माईसाहेब बावडेकर यांचं) सर्वांशी त्या जुळून रहायच्या.

पण लीलाताई व्यक्ती म्हणून व्यक्तीशी एक न जुळणारं रसायन, प्रकरण होतं खरं! 'Let us come together, to be differ' असं काहीसं अलिखित ब्रीद घेऊन जगणाऱ्या लीलाताई मोठ्या स्वागतशील होत्या. वैयक्तिक आयुष्यात अत्यंत काटकसरीनं राहून त्यांनी समाज, संस्था, व्यक्ती, उपक्रम यांना केलेलं लाखो रुपयांचं  सहाय्य मला माहीत आहे. पण हे सारं त्या अतिरिक्त दक्षता घेत भूमिगत, अप्रसिद्धपणे करत रहायच्या. हक्काच्या एका पैशासाठी भांडणाऱ्या लीलाताईंना पैशाचा लोभ नव्हता, पण समाजाला भर-भरून द्यायला त्या आतुरलेल्या होत्या. मृत्युपश्चात आपलं सर्वस्व समाजाला दान करण्याचं कवचकुंडल त्याच पेलू शकतात. हा त्यांचा पैलू खासच अनुकरणीय ठरावा.

त्यांच्याकडून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की ते एक प्रकारचं अव्याहत चालणारं निरंतर शिक्षण, प्रशिक्षणच. म्हणजे असं की, पटेल ते करायचं, बोलायचं, वागायचं. भीडभाड बाळगत समाज कसा बिघडत जातो, ते आपण पाहतोच. 'मुलं ही देवाघरची फुलं' हे सुभाषित त्यांनी शिकवलही नाही आणि गळीदेखील उतरवलं नाही. उलटपक्षी 'मृत्यूत भय नसतं' हे त्यांनी मुलांना स्मशानात सहल नेऊन शिकवलं.

पाणी हा किती काटकसरीनं वापरायचा भाग. त्यांनी तो 'जलसाक्षरता' म्हणून कधीच शिकवला नाही. 'पाणी अडवा, जिरवा, मुरवा' हेच रुजवलं. मुलांना प्रश्नोपनिषद बनवणाऱ्या लीलाताई. 'Shut up culture' च्या जागी त्यांनी 'Shout out culture' निर्माण केलं. 'मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं पाहिजे, तो विद्यार्थ्यांचा हक्कच आहे. तरच शिक्षक नि शिक्षण जागे, जिवंत रहाणार' असे म्हणणाऱ्या लीलाताई हे सर्व स्वतःच्या आचरणातून सांगायच्या, समजवायच्या. त्यांचे पती बापूसाहेब. ते असेच करुणामूर्ती दलित मित्र!

लीलाताईंचं जीवन संपलं तरी त्यांचं खरं चरित्र लिहिणं बाकी आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही सर्वांनी श्रद्धांजली ऐवजी त्यांच्या आठवणींचा सहवास जागवला, तेव्हा ऐकताना लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे, त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या त्या आत्मीयच होत्या. प्रत्येकाला त्या आपल्या वाटायच्या. दुसऱ्याला आपण त्याचे वाटावे असं प्रत्येकाला जगता येणं हीच लीलाताईंच्या आयुष्याची न संपणारी शिदोरी, शिकवण होय.

- डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com

(लेखक, ज्येष्ठ साहित्यिक व कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)

Tags: सुनीलकुमार लवटे लीला पाटील लीलाताई पाटील शिक्षण शिक्षक ना. सी. फडके कर्मवीर भाऊराव पाटील सृजन आनंद शिक्षण केंद्र Sunilkumar Lawate Leela Patil Leelatai Patil Education Teacher Teaching N C Phadake Karmveer Bhaurao Patil Srujan Anand Shikshan Kendra Load More Tags

Comments: Show All Comments

Pratibha Ashok Kasar

खूप छान विचार आणि त्यांच्याच लिखाणातून आणि विचारातून मीही मुलांना सृजनशील शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. सतत मुलांना बोलते करून प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरे काढून घेते. अतिशय आदर्श अशा प्राचार्य लीलाताई पाटलांना अभिवादन व श्रद्धांजली

अंजली पाटील

लिलाताई, यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही नाशिक मध्ये 28 वर्षापासून शाळा चालवित आहोत. अर्थपूर्ण आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Supriya Sunil Sadare

खूप सुंदर, मला अभिमान आहे. माझ्या मुलीला लीलाताई याचे मार्गदर्शन लाभले.

संजय देवगोंडा पाटील सर , चिंचवाड हायस्कूल,चिंचवाड

लिलाताईंच रचनात्मक शिक्षण कार्य हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल कार्य आहे. सृजनानंदच्या माध्यमातून त्यांनी आमच्या सारख्या शिक्षकांना घडविले. डाॅ. सुनील कुमार लवटे सरांनी अत्यंत सुंदर व उपयुक्त माहिती दिलेली आहे. कर्तव्य साधना च्या माध्यमातून लाॅकडाऊन च्या कालखंडात एका थोर शिक्षणतज्ज्ञ असणारे डॉ. लिलाताई पाटील यांचा व्यक्तीवेध घेतलेला आहे. धन्यवाद सर........!!!

Bijali Shripal Dadape

विविधांगाने लीला ताईंच्या कार्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य.

भरत

शिक्षण क्षेत्रातील किमयागार ताईंचा आदर्श घेऊन आम्ही अध्यापक कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सृजनानंदा विद्यालय ही अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रातील आदर्श शाळा. सध्या ही शाळा आमच्या आंतरभारती शिक्षण मंडळ द्वारे संचलित आहे याचा विशेष अभिमान.

Dayanand Narayan Karale

लीलाताईंच्या आयुष्याची संपूर्ण ओळख. कौटुंबिक, सामाजिक आणि वैचारिक. एक महान शिक्षणतज्ञ. एका शिक्षक प्रशिक्षकाचे त्याच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे संपूर्ण स्वप्न साकार असणारा सृजन- आनंद आविष्कार. एका ध्येयनिष्ठ शिक्षकाची प्रेरणादायी कर्मगुंफण. व्यक्तिमत्वाला अचुक शब्दबद्ध करणार लेखन सर.....

Mr. Sagar Machindra Davari

लीला ताईंचे कार्य अवर्णनीय आहे, त्यांच्या कर्यामधली भक्ती पार अपार होती. सर्वांना हे शक्य नसतं त्यापेक्षा ती करण्याची ऊर्मी नसते.अशा या व्यक्तिमत्वांमुळे काम करण्याची ऊर्जा मिळते.मग धडपडावसं वाटतं. आपणही यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याही शिक्षणाचा उपयोग इतरांनाही व्हावा आता पेक्षा जास्त.या माणसांचे आशीर्वाद त्यांच्या कार्यातून घ्यावेत असे वाटत. बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख वाचनात आला.छान लिहिलत सर.

श्वेतल अनिल परब

शिक्षणक्षेत्रात ज्या मोजक्याच स्त्रियांनी आपल्या कृतीशीलतेतून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली त्या आदरणीय लीलाताई पाटील आमच्यासाठी नक्कीच आदर्श राहतील .

Vishwas Sutar

सर्वस्पर्शी लेख !

Shirish Shitole

खूपच अर्थगर्भ आणि अनुकरणीय

Add Comment