वसंत बापट यांचे नऊ रंग

वसंत बापट यांची जन्मशताब्दी साजरी करणे याचा अर्थ आजच्या समाजजीवनाचा विविध अंगांनी वेध घेणे, त्यातील रंग शोधणे! 

25 जुलै 1922 ते 17 सप्टेंबर 2002 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष काल सुरू झाले. त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे ती मुख्यतः कवी म्हणून. 1942मध्ये म्हणजे वयाच्या विशीत असताना ते घरातून बाहेर पडले आणि भूमिगत होऊन ‘चले जाव’ चळवळीत कार्यरत राहिले. काही दिवसांनी त्यांना पकडण्यात आले आणि मग पुढील अडीच वर्षे तुरुंगात राहिले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मग उर्वरित शिक्षण पूर्ण करून ते प्राध्यापक झाले. दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळाले. साने गुरुजींचा प्रभाव आणि राष्ट्र सेवा दलातील घडण हा त्यांचा गाभाघटक राहिला. पुढे विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर यांच्याबरोबर त्यांनी कवितावाचनाचे प्रयोग राज्यात, राज्याच्या बाहेर आणि परदेशातही केले.

वसंत बापट यांच्या निधनानंतर पाडगांवकर म्हणाले, ‘वसंत बापट हे सळसळणारे यौवनाचे झाड होते, शाहिरी आणि आधुनिक कविता यांना जोडणारा तो प्रतिभावान दुवा होता.’ आणि विंदा करंदीकर म्हणाले, ‘वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाला नऊ अंगं होती - प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन.’

त्या दोन कविश्रेष्ठ मित्रवर्यांचे भाष्य लक्षात घेऊन वसंत बापट यांचा साधा परिचय करून घेतला तर काय दिसते?

1. प्राध्यापक - एक वर्ष धारवाड, नंतर 15 वर्षे नॅशनल कॉलेज, मुंबई आणि मग पुढील 15 वर्षे रुईया महाविद्यालय, मुंबई. अखेरची तीन वर्षे मुंबई विद्यापीठात रवींद्रनाथ टागोर अध्यासानाचे प्रमुख. या सर्व ठिकाणी त्यांचे विद्यार्थी राहिलेले लोक जीवनाच्या विविध क्षेत्रांत वावरले आणि त्यांच्यावर प्राध्यापक बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व शिकवणीचा ठसा कायम राहिला. रुईयामधील तर कितीतरी विद्यार्थी व विद्यार्थिनी पुढील काळात साहित्याच्या क्षेत्रात चमकले. कॉलेजमध्ये अभ्यासक्रम शिकवण्याच्या पलीकडे त्यांनी कितीतरी शिकवले म्हणून ते लक्षात राहिले हाच त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनोगताचा मध्यवर्ती आशय आहे.

2. कवी - वयाच्या विसाव्या वर्षी ते खऱ्या अर्थाने कविता लिहायला लागले आणि पुढील साठ वर्षे कविता लिहीत राहिले. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'बिजली' या नावाने आला. पुढील पन्नास वर्षांत त्यांचे लहानमोठे असे 25 कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यात निसर्गकविता, प्रेमकविता, देशभक्तिपर कविता, प्रार्थना, व्यक्तिचित्रण करणाऱ्या कविता, बालकविता इत्यादी प्रकार आहेत. त्यांतील दोनचार तरी कविता शालेय पाठ्यपुस्तकांत मागील 60 वर्षांतील प्रत्येक नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट होतच राहिल्या आहेत. त्यांचे काही कवितासंग्रह विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावले गेले आहेत. त्यांच्या एकूण कवितांची संख्या एक हजार तरी भरेल.

3. शाहीर - प्राचीन मराठी काव्याचे संत, पंत, तंत असे तीन प्रकार मानले जातात. केशवसुतांनंतर आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ मानला जातो. वसंत बापट यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते. त्यांनी संत व पंत कवींचे आवश्यक तेवढे घेतले आणि तंत काव्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करून घेतला. तंत काव्य म्हणजे शाहिरी. त्यात प्रामुख्याने पोवाडे व लावण्या हे प्रकार येतात. सर्वसामान्य माणसांचे, तळागाळातील समूहांचे एकाच वेळी मनोरंजन व प्रबोधन हे त्यात गृहीत असते. पोवाड्यांमध्ये स्फूर्ती असते, जोश असतो... लावण्यांमध्ये शृंगार असतो आणि भावभावनांचा कल्लोळ असतो. शाहिरी या प्रकारात, लिहिणारा हाच अनेक वेळा गाणाराही असतो किंवा गाणारा हा लिहिणाराही असतो. वसंत बापट हे लावणी व पोवाडे लिहिणारे होते आणि सादर करणारेही होते. अर्थातच हे दोन्ही प्रकार त्यांनी वापरले ते आधुनिक काळातील आशय, विषय पोहोचवण्यासाठी.

4. गीतकार - कवितेचाच एक प्रकार म्हणून गीतांकडे सामान्यतः पाहिले जाते. मात्र वर्गीकरण व समीक्षा करायची ठरली तर ते वेगवेगळे मानले जातात. कविता ही अंतःस्फूर्तीने येते तर गीत हे बाह्यस्फूर्तीने लिहिले जाते, असा फरक ढोबळमानाने सांगितला जातो. वसंत बापट यांनी सुरुवात सैनिकी गीतांपासून केली. पुढे स्फूतिगीते, देशभक्तिपर गीते, भावगीते, प्रार्थना असे काही प्रकार त्यांनी हाताळले. आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ सिनेमातील ‘छडी लागे छम छम’ आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उंबरठा’ सिनेमातील ‘गगन सदन तेजोमय’ ही गीते ऐकली, ती इतका दीर्घ काळ जनमानसात टिकून राहिली हे लक्षात घेतले तर त्यांतील सर्जनशीलता काय ताकदीची आहे हे कळते.

5. समीक्षक - रूढ अर्थाने साहित्याची समीक्षा या प्रकारातील लेख वसंत बापट यांनी कमी प्रमाणात लिहिले. पण त्यांच्यातील समीक्षक काय ताकदीचा होता हे पाहायचे असेल तर ‘शतकाच्या सुवर्णमुद्रा’ हे पुस्तक पाहायला हवे. 1900 ते 2000 हे आधुनिक मराठी कवितेचे शतक होते. ते संपले तेव्हा लिहिलेले 24 लेख या पुस्तकात आहेत... किंवा ‘तौलानिक सहित्याभ्यास - मूलतत्त्वे आणि दिशा’ हे पुस्तक... मात्र राजकीय व सामाजिक जीवनाची समीक्षा असा अर्थ घेतला तर त्यांचे बरेच लेखन दाखवता येईल. ‘विसाजीपंताची बखर’ हे पुस्तक प्राचीन बखर वाङ्‌मयाच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. पण ती राजकीय समीक्षा आहे. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णनाची तीन पुस्तके (बारा गावचं पाणी, आहा देश कसा छान!, गोष्टी देशांतरीच्या) ही एका अर्थाने सामाजिक जीवनाची समीक्षा आहे.

6. संपादक - साने गुरुजींनी मृत्यूच्या आदल्या दिवशी जे पत्र लिहून ठेवले होते त्यात लिहिले होते, ‘माझ्या मृत्यूनंतर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन यांनी साधनाचे संपादक व्हावे आणि वसंत बापट व यदुनाथ थत्ते यांनी त्या दोघांना सहकार्य करीत राहावे.’ त्या वेळी आचार्य व रावसाहेब हे दोघे साठीच्या उंबरठ्यावर होते आणि यदुनाथ व वसंत बापट केवळ 28 वर्षांचे होते. म्हणजे गुरुजींना वसंत बापट यांच्यावर काय प्रकारचा विश्वास व त्यांच्या क्षमतेविषयी काय दर्जाची खातरी वाटत असेल! साधना साप्ताहिकाच्या पहिल्या अंकापासून साधनाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत बापट साधनाशी निगडित होते आणि 1984 ते 1998 ही चौदा वर्षे तर ते ग.प्र. प्रधान यांच्यासह संपादक होते. त्यांचे साधनातील बरेच लेखन असंग्रहित आहे, त्यांतून दोन पुस्तके तरी आगामी वर्षभरात प्रसिद्ध होतील.

7. कार्यकर्ता - वयाच्या विशीत वसंत बापट यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली ती कार्यकर्ता म्हणूनच आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते राष्ट्र सेवा दल या मातृसंघटनेचे कार्यकर्ते होते. सेवा दल ही मुख्यतः राष्ट्रकार्यासाठी नागरिक घडवणारी संघटना म्हणून कार्यरत असताना, कलापथकांचे योगदान खूप मोठे राहिले आणि त्यातील सिंहाचा वाटा वसंत बापट यांचा होता. शिवदर्शन, महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन अशा कार्यक्रमांचे प्रयोग गावोगाव झाले. तमाशा, लोकनाट्य, पथनाट्य, संगीत, नृत्य, लावण्या आणि लोककलेचे अन्य प्रकार वापरून त्यांनी प्रबोधनाचे जे कार्य केले आणि कार्यकर्ते घडवण्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतला, हे लक्षात घेता ते सेवा दलासाठी कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते राहिले.

8. वक्ता - कुठेही गेले तरी वसंत बापट यांच्यातील वक्ता कायम प्रभावी राहिला... मग ते सूत्रसंचालन असो, कार्यक्रमाचे निवेदन असो, मुलाखत घेणे असो वा सभा-समारंभातील भाषण असो. तरुण असताना वसंत बापट यांनी आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी ही माध्यमेही ज्या सहजतेने व कलात्मकतेने हाताळली ते पाहता या माणसाला कल्पकतेचे वरदान होते असेच वाटत राहते. त्यांनी पुणे आकाशवाणीसाठी 23 नोव्हेंबर 1995 रोजी ‘नवी पिढी व जुनी पिढी’ या विषयावर केलेले भाषण (ते इथे क्लिक करून ऐकू शकता) केवळ 10 मिनिटांचे आहे, पण लालित्य व आशय पाहता कोणत्याही पिढीतील भाषण श्रोत्यांच्या मनाचा निश्चितच ठाव घेईल. त्यांनी 1999मध्ये मुंबई इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने केलेले (शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व हुकूमशाही प्रवृत्ती यावर) समारोपाचे भाषण तडाखेबंद होते. त्याची तुलना अणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी केलेल्या भाषणाशीच होते.

9. शोमन - वसंत बापट कुठेही गेले तरी वक्ता जसे होते तसेच शोमनही होते. अभिनय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला होता. बापट-पाडगांवकर-करंदीकर या काव्यत्रिकुटाच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात शोमनशिपची जबाबदारी प्रामुख्याने बापट यांनीच पार पाडली. ते कलापथकाच्या अनेक कार्यक्रमांत अनेक प्रकारच्या भूमिका निभावत होते. त्यांतून त्यांच्या अभिनयाची झलक दिसते. ते शोमन होते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा कार्यक्रम त्यांच्या शोमनशिपचा मोठा आविष्कार मानला जातो. त्यांची संयत शोमानशिप बघायची असेल तर, त्यांनी मुंबई दूरदर्शनसाठी घेतलेल्या एस. एम. जोशी व कुमार गंधर्व यांच्या मुलाखती पाहायला हव्यात (त्या मुलाखती पाहायच्या असतील तर इथे आणि इथे क्लिक करा). एक दिग्गज राजकीय नेता आणि एक शास्त्रीय संगीताचा दिग्गज गायक यांच्या एकेक तासाच्या त्या मुलाखती आहेत.

वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे ठळक रंग आहेत. मात्र आणखी कितीतरी विलोभनीय अशा रंगच्छटा दाखवता येतील. महाराष्ट्रात अशा प्रकारचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून मागील शतकातील दोन मोठी उदाहरणे पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांची आहेत. त्यांच्याहून मोठी उदाहरणे अखिल भारतीय पातळीवर रवींद्रनाथ टागोर व शिवराम कारंथ यांची सांगता येतील. इथे वसंत बापट यांची तुलना पु.ल. व अत्रे, टागोर व कारंथ यांच्याशी करण्याचा हेतू नाही. पण वसंत बापट हे कोणत्या बिरादरीतील होते किंवा कोणत्या घराण्यातील होते, हे सूचित करणे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून वसंत बापट यांची जन्मशताब्दी साजरी करणे याचा अर्थ आजच्या समाजजीवनाचा विविध अंगांनी वेध घेणे, त्यातील रंग शोधणे! आगामी वर्षभरात हे काम साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना यांच्यामार्फत शक्य तेवढे केले जाणार आहे!

- संपादक, कर्तव्य साधना
kartavyasadhana@gmail.com


महाराष्ट्राला मुख्यतः कवी म्हणून परिचित असलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 जुलै 2021 पासून सुरू झाले आहे. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक रंग होते. साधना साप्ताहिकाचे ते 14 वर्षे संपादक ही होते. त्यामुळे त्यांची जन्मशताब्दी अनेक प्रकारे साजरी करायला हवी. यासंदर्भात साधनाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी केलेले निवेदन, या 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आहे...

 

Tags: संपादकीय संपादक वसंत बापट व्यक्तिवेध Editorial Profile Vasant Bapat Load More Tags

Comments: Show All Comments

गजानन गुर्जरपाध्ये

लाखदा माझ्या मनाला सांगतो समजावुनी ही वसंत बापट यांची कविता आपण साधनेत पुनर्मुद्रित करावी.

वर्षा गुप्ते

आ वसंत बापट याची सर्वच गीत रचना म्हणताना एक वेगळाच आनंद मिळतो स्वर, लय, ताल याचा मिलाफ मनाला भावतो ही गीते सहज गुणगुणली जातात त्या त्या कवी मनाच्या भूमिकेत समरस होतो

Hira

'तुलानामूल साहित्यविचार 'ह्या विषयाच्या पहिल्या बॅचच्या पाच विद्यार्थिनींमध्ये मीही होते समरसून शिकवणाऱ्या सरांना आम्ही खूप जवळून पाहिले.

लतिका जाधव

संपादकांनी वसंत बापट यांच्या कर्तुत्वाचा उत्तम लेखाजोखा घेतला, धन्यवाद!

Adv.Devidas Pandurang Wadgaonkar

लेख खूप छान आहे बापटांची शब्दसंपदा हादेखील एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकतो कवितेत आणि त्यांच्या एकूण लिखाणात जे शब्द आलेले आहेत त्याची ओळख महाराष्ट्राला एकत्रितपणे करून देण्याचा प्रयत्न जन्मशताब्दीनिमित्त व्हावा ही अपेक्षा.

संजीव अंबिके

परिचयातील क्र.4.मधे उंबरठा चित्रपटातील गीत 'देह मंदिर, चित्त मंदिर' असे लिहिले आहे, ते चूक असून ते गीत 'गगन सदन तेजोमय' हे आहे आणि ते हृदयनाथांनी स्वरबद्ध केले असून लता मंगेशकरांनी गायले आहे.

शाहीर प्रा.तुळशीराम जाधव

कविवर्य वसंत बापट, एक प्रतिभावान असे बहुआयामी व्यक्तीत्व होते. माझ्या काव्यरचनेवर पहिला प्रभाव त्यांच्याच प्रतिभेचा आहे. त्यांच्या गीत रचनेतील समाजवाद आणि विज्ञाननिष्ठा ही दोन तत्वे मला खूप भावलेली आहेत. त्यांच्या गीतांमधून त्यांच्या विद्वत्तेची, पांडित्याची आणि विवेकाची झलक सदैव दिसुन येते. त्यांच्या सर्वच काव्यरचना मला आवडतात. एकाचढ एक अशा त्यांच्या गीतरचना आहेत.तरी पण मला अधिकच भावललेली काही गीते मी सहज सांगु शकतो अन गाऊही शकतो. १. सदैव सैनिका पुढेच जायचे २. मानव तितुका एकच आहे ३. देह मंदीर चित्त मंदीर ४. आभाळाची आम्हाला लेकरे ५. छोटेसे बहिणभाऊ ६. गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी ७. जगी घुमवारे दुमदुमवारे भारत गौरवगान ८. ध्वज उंच तिरंगा डोलेरे ९. जय सुभाष जय सुभाष मंत्र हाच आजला १०. बिजली नाचेल गगनात ११. एसेम तुम्ही आमच्या अंतरंगी असंख्यात ज्योतीर्दळे लावली अशी एकाहून एक सरस अशी गाणी कायमंच स्मरणात राहणारी आहेत. आम्हाला त्यांची गाणी सादर करायला आवडतात. शाहीर प्रा. तुळशीराम जाधव

Vinod Wagh

उत्कृष्ट लेख.

विष्णू दाते

...ऋषितुल्य माणसाची अतिशय दर्जेदार मुलाखत! अत्यंत दुर्मिळ अशी ही फित दाखवून आमचं ज्ञान समृद्ध केल्याबद्दल कर्तव्य साधनाचे मनःपूर्वक आभार!

Add Comment