गोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका : 11

पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा मिळवून सत्तेत येण्याच्या भाजपच्या स्वप्नांचा चुराडा करत तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. देशातील सध्याच्या एकमेव महिला मुख्यमंत्रिपदाचा मान ममता बॅनर्जी यांनी कायम राखला आहे. त्यांच्या या विजयात निश्चितच अनेक घटकांचा वाटा राहिला आहे मात्र स्वतःचा पक्ष रसातळाला नेत काँग्रेसच्या व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पारंपरिक मतदारांनीही आपल्या परीने ममतांच्या विजयासाठीचा वाटा उचलल्याचे दिसून येते. यातून भाजपला रोखण्यात यश आले असले तरीही पुढील राजकारणामध्ये डावे-काँग्रेस यांच्याबरोबरच तृणमूल काँग्रेसचाही गोंधळ वाढणार आहे. 

देशात अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी जाहीर झाला आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवत ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्या. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीने मोठ्या आवेशामध्ये लढवण्यात आलेल्या या निवडणुकीच्या निकालाचे अनेक अर्थ लावण्यात येत आहेत. कधी काळी पश्चिम बंगालमध्ये अधिराज्य गाजवलेले डावी आघाडी आणि काँग्रेस यांचे पतनही चर्चेचा विषय ठरला आहे. 

दोनच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस हा सर्वांत मोठा धोका आहे असा विचार डाव्यांमध्ये सुरू झाला होता. या वेळी ‘फॅसिस्ट’ भाजपला रोखणे गरजेचे वाटल्यामुळे डावी आघाडी आणि काँग्रेस यांचे मतदार ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी राहिल्याचे मानण्यात येते त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवूनही डाव्या पक्षांना आणि काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. 

एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये कोणाविरुद्ध आवाज उठवायचा, हा गोंधळ डाव्या पक्षांसमोर आहे तर पश्चिम बंगालमध्ये डाव्यांबरोबर आघाडी आणि केरळमध्ये त्याच डाव्यांविरोधात लढण्याची अपरिहार्यता यांमध्ये काँग्रेसला नेमकी निवड करता येत नाही. डाव्यांना नेस्तनाबूत करण्यामध्ये तृणमूल काँग्रेसला यश आले असले तरीही भाजपचा वेगाने उदय झाल्यामुळे डावे-काँग्रेस यांच्याकडून वळलेल्या या मतदारांना टिकवले नाही तर पुढील निवडणूक ममता बॅनर्जी यांच्यासाठीही खूप आव्हानात्मक ठरणार आहे... त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतील हे निकाल डावे-काँग्रेस यांच्याबरोबरच तृणमूल काँग्रेसलाही गोंधळात टाकणारे आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294पैकी दोन मतदारसंघांतील उमेदवारांचा मृत्यू झाल्याने 292 विधानसभा मतदारसंघांत आठ टप्प्यांत निवडणूक पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने तब्बल 213 जागा आणि 47.9 टक्के मते मिळवत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक बाजी मारली आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. 

मतांचा विचार करता तृणमूलला मिळालेली ही मते 1972मध्ये काँग्रेसला मिळालेल्या 49.1 टक्के मतांनंतरची अधिक मते आहेत... तर 2011मध्ये शून्य, 2016मध्ये केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत तब्बल 77 जागा आणि 38.1 टक्के मते मिळवून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.

2011पूर्वी तब्बल 34 वर्षे सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 4.73 टक्के तर काँग्रेसला 2.9 टक्के मते मिळाली... मात्र या दोन्ही पक्षांना एकाही जागेवर विजय मिळाला नाही. या निवडणुकीत डावे पक्ष-काँग्रेस आणि ममता यांचे एके काळचे सहकारी पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या ‘इंडिअन सेक्युलर फ्रंट’ची (आयएसएफची) आघाडी होती. ‘आयएसएफ’ला एका जागेवर विजय मिळाला म्हणजेच या आघाडीला केवळ एक जागा मिळाली. 

1996च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेस यांनी परस्परांविरोधात निवडणूक लढवून 294पैकी 280 जागा जिंकल्या होत्या आणि तब्बल 86.3 टक्के मते मिळवली होती... मात्र 25 वर्षांनंतर दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही त्यांना जेमतेम 8.4 टक्के (डावी आघाडी 5.5 आणि काँग्रेस 2.9 टक्के) मते मिळाली आहेत. 

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच तृणमूल विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होण्याचे स्पष्ट दिसत होते मात्र डावे पक्ष व काँग्रेस यांचा सुपडा साफ होईल अशी परिस्थिती निश्चितच नव्हती. त्याचे कारण म्हणजे 2016च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा (12.25 टक्के मते) आणि डाव्या पक्षांना 27 जागा (21.20 टक्के मते) मिळाल्या होत्या म्हणजेच दोन्ही पक्षांना मिळून 71 जागा मिळाल्या होत्या. या 71पैकी एकही जागा या दोन्ही पक्षांना टिकवता आली नाही किंवा नव्याने कुठे विजयही मिळवता आला नाही. 

तृणमूल काँग्रेसकडून 2011मध्ये पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागताना डाव्या पक्षांना 30.1 टक्के मते मिळाली होती. यावरून दहाच वर्षांमध्ये त्यांची झालेली अवनती लक्षात येते. डावे पक्ष राज्यात पुन्हा उभारी घेताना दिसत नाहीत आणि भाजपचा पराभव हेच काँग्रेसचे यश या मानसिकतेत काँग्रेस मश्गुल आहे त्यामुळे या पक्षांना नेमका कोणत्या राज्यात विस्तार करायचा आहे हा प्रश्नच आहे. 

केरळमधील मतदान होईपर्यंत काँग्रेसनेते राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये फारसे फिरकलेच नाहीत तर त्यानंतरच्या दोन टप्प्यांनंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी प्रचार थांबवला. केरळमध्ये डाव्यांविरुद्ध लढताना,पश्चिम बंगालमध्ये त्याच डाव्यांबरोबर ते आघाडी करत आहेत याविषयी नेमका युक्तिवादही त्यांना करता आला नाही. हा गोंधळ शेवटपर्यंत कायम राहिला.

या निवडणुकीत एकीकडे जागा आणि मते दोन्ही पातळ्यांवर दोन्ही पक्ष रसातळाला गेलेले असतानाच दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसला या दोन्ही पक्षांची छुपी मदत होती का हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कारण आपल्याला पुढील आकडेवारीत दिसून येईल. 2016च्या विधानसभा निवडणुकीत 294पैकी 211 जागा मिळवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुसऱ्यांदा सत्ता कायम राखली होती. यंदा या जागांत वाढ होत 213 जागा मिळाल्या मात्र यंदा निवडणूक झालेल्या 292पैकी ज्या 209 मतदारसंघांत तृणमूलने विजय मिळवला होता त्यांपैकी 160 जागाच टिकवण्यात तृणमूलला यश आले. 

...म्हणजेच राज्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या ममतांना 49 जागा गमवाव्या लागल्या तर 2011मध्ये डाव्या पक्षांना 21 जागांवर आणि काँग्रेसला 29 जागांवर अशा 50 जागांवर तृणमूलला विजय मिळाला आहे. इतर पक्षांच्या दोन आणि भाजपच्या एका अशा 213 जागांवर तृणमूलने विजय मिळवला. भाजपने ज्या 77 जागांवर विजय मिळवला आहे त्यांत तृणमूलच्या ताब्यातील 48 मतदारसंघ आहेत तर माकपच्या ताब्यातील सहा, काँग्रेसच्या ताब्यातील 15 आणि इतर पक्षांच्या ताब्यातील सहा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपच्या ताब्यात जे तीन मतदारसंघ होते त्यांपैकी दोन मतदारसंघ कायम ठेवण्यात यश आले आहे. 

राज्यात डाव्यांची आणि काँग्रेसची घटलेली ताकद लक्षात घेऊन भाजप या पक्षांच्या ताब्यातील मतदारसंघांत जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता होती परंतु तसे घडल्याचे आकडेवारीवरून दिसत नाही. डाव्यांच्या व काँग्रेसच्या ताब्यातील केवळ 21 मतदारसंघांत भाजपला शिरकाव करता आला मात्र भाजपपेक्षा दुपटीहून अधिक म्हणजेच 50 मतदारसंघांत तृणमूलने शिरकाव केला आहे. भाजपच्या सत्तास्वप्नांना नेमका इथेच ब्रेक लागला आहे कारण राज्यात सत्तेची स्वप्ने पाहत असलेल्या भाजपची मदार ही काही प्रमाणात डाव्या पक्षांच्या मतांवर होती. 

2019च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या मतदारांनी भाजपचे पारडे जड केले होते. ते आकडेवारीवरूनही दिसून येते. 2016च्या विधानसभा निवडणुकीत 21.20 टक्के मते मिळालेल्या डाव्या पक्षांना तीन वर्षांनी झालेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 6.38 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजप मतांच्या टक्केवारीची चाळिशी ओलांडण्यात या मतांचा मोठा वाटा होता. त्याआधारे भाजपने 42पैकी 18 जागा आणि 40.64 टक्के मते मिळवली होती... तर कदाचित निवडणुकीत पुन्हा मोदीच सत्तेवर येणार असल्याचे वातावरण असल्याने आणि ममता काही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याने मतदारांनी भाजपचे पारडे जड केले होते. तृणमूल काँग्रेसला 22 जागा व 43.69 टक्के मते मिळवता आली म्हणजेच तृणमूल व भाजप यांच्यातील मतांचा फरक केवळ चार टक्के राहिला होता. 

विधानसभा मतदारसंघनिहाय हा लोकसभेचा निकाल पाहिल्यास 121 विधानसभा मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली होती त्यामुळे या मतदारसंघांसह पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर व प्रबळ केंद्रीय सत्तेच्या जोरावर आपण सहज दोनशेचा आकडा पार करू असा विश्वास भाजपला होता. मात्र हा विश्वास केवळ 38 टक्के प्रत्यक्षात उतरला आणि भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले. यंदाच्या निवडणुकीत ममता यांनी डाव्या पक्षांच्या मतदारांना तृणमूलला मतदान करण्याचे उघड आवाहन केले होते. त्यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या या आवाहनाला डाव्या मतदारांनी भरभरून पाठिंबा दिल्याचे दिसते. 

राज्यात धडपडत असलेल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसने जाणीवपूर्वक पश्चिम बंगालकडे केलेले दुर्लक्ष (नाही म्हटले तरी केरळवर लक्ष केंद्रित केलेले काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यात सभा घेतली असली तरी ती केवळ नावापुरतीच होती.) यावरून कदाचित या पक्षांची तृणमूल काँग्रेसला छुपी मदत होती का असा प्रश्न पडतो. अन्यथा राज्यात तृणमूलविरोधात प्रस्थापितविरोधी लाट आणि भाजप यांपैकी निश्चितच काही मतदारसंघांतील मतदारांनी डावे किंवा काँग्रेस यांचे पारडे जड केले असते. 

डाव्या पक्षांचे आणि काँग्रेसचे पारडे जितके जड होईल तितके तृणमूल काँग्रेसच्या मतांना खिंडार पडेल आणि भाजपला फायदा होईल असे गणित भाजपने मांडलेले होते. विशेषतः राज्यात 27 टक्के असलेला आणि ममतांचा पाठीराखा मुस्लीम समाज हा कसा विभागला जाईल याकडे भाजपचे लक्ष होते. असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम व डावी आघाडी यांच्या कामगिरीवर भाजपची वाट सुकर होणार होती... मात्र  नेमकी ही कामगिरीच अडखळल्याने ममतांचा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. 

माल्दा, मुर्शिदाबाद या मुस्लीमबहुल जिल्ह्यांतील अल्पसंख्याक मतदार पारंपरिकपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतात. या जिल्ह्यांमध्येही तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. डाव्या पक्षांकडून ‘नो वोट फॉर भाजप’ अशी मोहीम राबवली जात होती. त्यातूनही तृणमूल काँग्रेसला मतदान करण्याचा संदेश मिळत होता. 

अर्थात  ममता यांच्या विजयामागे अनेक कारणे असून त्यात या कारणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. असे असले तरी भाजपच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही भाजपची राज्यातील सर्वोच्च कामगिरी असून ती केवळ पाच वर्षांमध्ये पूर्ण केली आहे. ही कामगिरी आकडेवारीच्या बाबतीत समाधानकारक असली तरी भाजपच्या बाबतीत निश्चितच समाधानकारक नाही त्यामुळे ती अधिक जिव्हारी लागणार आहे... त्यामुळेच ममता यांनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून इतिहास रचल्याने केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर देशाचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

तमीळनाडूमध्ये आणि पुदुचेरीत प्रादेशिक पक्षांनी मिळवलेला विजय, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय यांमुळे देशभरातील प्रादेशिक व विरोधी पक्षांना ऑक्सिजन मिळणार आहे परंतु राज्यात भाजपची वाढलेली ही ताकद ममता यांच्यासाठी राज्यकारभार करणे तितके सोपे नसल्याचे दाखवून देणारी आहे. निवडणूक निकालानंतर उफाळून आलेली हिंसा हे त्याचे द्योतक मानता येऊ शकेल... त्यामुळे मोदी-शहांविरोधात ममता यांनी आणखी एक लढाई जिंकली असली तरी त्यांचा पुढील मार्गही तितकाच खडतर असणार आहे.

- सुरेश इंगळे
sureshingale@gmail.com

(लेखक स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स संस्थेचे संचालक आहेत.)


'पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका- 2021' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा


कर्तव्यवर रोज प्रसिद्ध होणारे लेखन मोफत मिळवण्यासाठी कर्तव्य साधनाचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. त्यासाठी इथे क्लिक करा. किंवा टेलिग्रामवर Kartavyasadhana सर्च करा. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी मोबाईलवर टेलिग्राम अ‍ॅप (Telegram App) असणे गरजेचे आहे.

Tags: लेख लेखमाला निवडणुका पाच राज्यांतील निवडणुका - 2021 पश्चिम बंगाल डावे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कॉंग्रेस भाजप तृणमूल कॉंग्रेस सुरेश इंगळे ममता बनर्जी Series Election West Bengal Communist Party of India (Marxist) Suresh Ingale Congress BJP Left Trianmool Congress Mamta Banarjee Load More Tags

Add Comment