झिम्बाब्वेनेमुगाबेंचे मूल्यमापन कसे करावे?

झिम्बाब्वेवर ३७ वर्षे सत्ता गाजवलेल्या मुगाबे यांचे ६ सप्टेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाल्यावर त्यांच्याविषयी फारशी काही सहानुभूती दाटून आलेली दिसत नाही. उलट त्यांच्या देशातील बहुसंख्य जनतेने सुटकेचा निश्वासच सोडला असावा. 

AFP

एकेकाळी साऱ्या देशाच्या आशावादाचे प्रतीक झालेला नेता अनैतिक सत्ताकांक्षेपायी साऱ्या देशाला कसे वेठीस धरतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून झिम्बाब्वेच्या रॉबर्ट मुगाबे यांचे नाव घेता येईल. झिम्बाब्वेवर ३७ वर्षे सत्ता गाजवलेल्या मुगाबे यांचे ६ सप्टेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाल्यावर त्यांच्याविषयी फारशी काही सहानुभूती दाटून आलेली दिसत नाही. उलट त्यांच्या देशातील बहुसंख्य जनतेने सुटकेचा निश्वासच सोडला असावा. असे का झाले असेल?

ज्या जनतेने या नेत्यावर मनापासून प्रेम केले त्याच जनतेची आयुष्ये उध्वस्त करूनही सत्तेत राहण्याइतकी निर्दयी महत्वाकांक्षा या नेत्यात कुठून आली असेल? कपड्यापासून वागण्यापर्यंत ब्रिटिश परंपरेचे अनुकरण करणाऱ्या या नेत्याच्या अधोगतीचा हा प्रवास कधी सुरु झाला असावा? सत्ताधारी पक्ष, सरकारी यंत्रणा, देशातील न्यायालये व विरोधी पक्ष, शेजारी देश, आंतरराष्ट्रीय समुदाय मुगाबे यांना का थांबवू शकला नाही? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता या नेत्याच्या मृत्युनंतर त्याचे मूल्यमापन कसे करावे?            

मुगाबे हे एकेकाळी वसाहतवादविरोधी लढ्याचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच झिम्बाब्वेतील वसाहतवादी, गौरवर्णीय सत्तेचा अंत झाला आणि बहुसंख्य कृष्णवर्णीयांची सत्ता प्रस्थापित झाली. या वसाहतवादविरोधी लढ्यासाठी मुगाबे यांनी मोठी किंमत मोजली. कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे त्यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. देश सोडावा लागला. वसाहतवादाचा शेवट लवकर व्हावा यासाठी त्यांनी सशस्त्र लढाही उभारला. मात्र या लढ्याची सर्वात मोठी किंमत मुगाबे यांनी वैयक्तिक आयुष्यात मोजली. ते तुरुंगात असताना त्यांच्या तान्ह्या मुलाचा मृत्यू झाला. मुगाबे त्या मुलाला शेवटचे पाहूही शकले नाहीत.

स्वातंत्र्यासाठी दोन दशके संघर्ष केल्यानंतर १९८० साली झिम्बाब्वेतील वसाहतवादी सत्तेचा अंत झाला. पूर्ण सत्ता मुगाबेंच्या हातात आली. मुगाबे यांच्यामुळे झिम्बाब्वेतील मागासलेल्या कृष्णवर्णीय समूहाला आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा थोड्याफार प्रमाणात मिळायला सुरुवात झाली. देशातील कृष्णवर्णीयांना मताधिकार मिळाल्याने झिम्बाब्वेत लोकशाही सत्ता प्रस्थापित झाली. राजकीय सत्तेच्या आश्रयाने १९८० नंतरच्या काळात एक नवा कृष्णवर्णीय सत्ताधारी वर्ग उदयास आला. तसेच कृष्णवर्णीय समूहात मध्यमवर्गही तयार झाला.   

कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय समूहांना एकत्र आणून देशाला पुढे कसे नेता येते याचा मानदंड म्हणून झिम्बाब्वेचे उदाहरण सुरुवातीच्या काळात दिले जायचे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील गौरवर्णीय सत्तेला हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे प्रयत्न केले जात होते त्यात शेजारील झिम्बाब्वेचे स्थान महत्वाचे होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी शासनाच्या विरोधी लढा देणारे अनेक गट झिम्बाब्वेत आश्रयाला होते. झिम्बाब्वे तेव्हा ‘फ्रंटलाईन स्टेट’ झाले होते व त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचे लष्कर झिम्बाब्वेत घुसून आक्रमक लष्करी कारवाया करत असे. दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादविरोधी लढयासाठी झिम्बाब्वे ही किंमत मोजत असल्याने मुगाबे यांच्या देशांतर्गत हुकुमशाही वर्तनाबद्दल फारशी चर्चा होत नव्हती. परिणामी १९८० च्या दशकात ‘वसाहतवादविरोधी लढ्याचे हिरो’ ही प्रतिमा जपण्यात मुगाबे यशस्वी ठरले.       

लोकशाही मार्गावर विश्वास आहे असे दाखवणारा हा नेता काळ लोटत जाईल तसतसा अधिकाधिक निर्दयी बनत गेला. असेही म्हणता येईल की, लोकशाहीप्रेमाचा पांघरलेला बुरखा बाजूला ठेवून त्यांनी स्वतःचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. आपल्या विरोधातले आवाज कोणत्याही मार्गाने बंद पाडून सत्तेत राहण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे मुगाबे यांनी देशातील लोकशाहीचे स्वरूपच बदलले. निवडणुका घेऊन सत्तेत राहणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला. त्यामुळेच पुढे तीस वर्षे मुगाबे लोकशाही मार्गानेच निवडून येत असले तरीही त्यांनी त्या लोकशाहीचे ‘स्पिरीट’ कधीच संपवले होते.

मुगाबे यांनी पद्धतशीरपणे आपल्या विरोधकांना नष्ट केले. आधी त्यांनी सशस्त्र लढ्यातील साथीदारांना बाजूला केले व स्वतःशी एकनिष्ठ असे लष्कर-पोलीसदल तयार केले. त्यानंतर पक्षांतर्गत विरोध संपवला. मग विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले. यामध्ये हजारो लोक मारले गेले. लाखो लोकांची आयुष्ये उध्वस्त झाली. मुगाबे यांच्या सत्तेला आव्हान निर्माण होऊ शकत होते म्हणून त्यांनी झिम्बाब्वेचा आर्थिक कणा असलेल्या गौरवर्णीय शेतकऱ्यांवर हल्ले करवले. यातून शेती तर उध्वस्त झालीच पण त्याहूनही वाईट म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः कोसळली.   

पोलीस आणि लष्करी बळाचा वापर करून विरोधकांना नेस्तनाबूत करणे, विरोधी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या प्रदेशांवर सत्ताधारी पक्षाच्या गुंडांच्या माध्यमातून हल्ले करणे, त्या प्रदेशाचा अन्नपुरवठा तोडणे, पूर्ण अर्थव्यवस्था उध्वस्त करणे असे सर्व प्रकार करून मुगाबेंनी आपली सत्ता टिकवली. एकेकाळी ‘आफ्रिका खंडाचा हिरा’ आणि ‘धान्याचे कोठार’ मानला जाणारा हा देश मुगाबे यांच्या काळात अक्षरशः भिकेला लागला. देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः रसातळाला गेली. महागाईचा राक्षस मुगाबेंना आवरता आला नाही. उलट निश्चलनीकरणाचे अतिशय टोकाचे पाऊल त्या देशाला उचलावे लागले. मुगाबे सत्तेत आल्यानंतर शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा जो विस्तार झाला त्याचे फारसे फायदे देशाला मिळालेच नाहीत. उलट मोठ्या प्रमाणावर शिक्षित समूह, उद्योजक, प्रगत शेतकरी, खेळाडू देश सोडून गेले. एकेकाळी चांगले क्रिकेट खेळणाऱ्या या देशातील क्रिकेट पूर्णतः उध्वस्त झाले. झिम्बाब्वेमध्ये मुगाबे यांनी केलेल्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरेशी दखल घेतली जाऊनही कोणालाही मुगाबे यांना सत्तेवरून हटवता आले नाही.

याची दोन कारणे होती: सर्वात पहिले आणि महत्वाचे कारण होते, आफ्रिका खंडातील इतर देश मुगाबे यांच्याविरोधी भूमिका घ्यायला तयार नव्हते. कारण इतर आफ्रिकी देशांतसुद्धा असेच हुकुमशाही प्रवृत्तीचे, लोकशाहीच्या नावाने गैरप्रकार करून राजवट टिकवणारे नेते सत्तेत होते. तीच वेळ आपल्यावरही येऊ शकते याची कल्पना असल्याने त्यापैकी कोणीही मुगाबेंच्या विरोधी विशेष काही कृती केली नाही.

तसेच आफ्रिका खंडातील लोकशाही देशसुद्धा झिम्बाब्वेसारख्या आफ्रिकी देशात सत्ताबदल करण्यास उत्सुक नव्हते. मुगाबे यांचे वय, त्यांची वसाहतवादविरोधी लढ्यातील प्रतिमा आणि त्यांच्यावर पाश्चात्य जगतातून होणारी जहरी टीका यामुळे उलट मुगाबे यांचे स्थान आफ्रिका खंडातल्या नेत्यांमध्ये अधिकाधिक भक्कम होत गेले. अमेरिकेने २००३ मध्ये इराकमध्ये सद्दाम हुसेनना हटवून सत्ताबदल केला, त्यातून निर्माण झालेला गोंधळ पाहता झिम्बाब्वेत तसा हस्तक्षेप करण्यासाठी कोणीही उत्सुक नव्हते.          

दुसरे महत्वाचे कारण होते, मुगाबे यांनी चीनशी केलेली मैत्री. अमेरिका आणि पाश्चात्य जगाच्या विरोधात उभ्या असलेल्या देशांना (उदा: व्हेनेझुएला, इराण, सुदान) मदत करणे हा चीनचा जुनाच खेळ आहे. झिम्बाब्वेत मुगाबेंना पाठिंबा देण्यामागे ते एक महत्वाचे कारण होते. चीन झिम्बाब्वेच्या शासनाला लष्करी सहाय्य करत असे. पाश्चात्य जगातील मानवी हक्क, लोकशाही, कायद्याचे राज्य या संकल्पना चीनला मान्य नाहीत. त्यामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी जगभरातून झिम्बाब्वेवर टीका होत असतानाच चीनने मात्र मुगाबेंच्या राजवटीला शस्त्रपुरवठा चालूच ठेवला. तसेच गेल्या काही काळात झिम्बाब्वेसाठी चीन अतिशय महत्वाचा राजकीय आणि आर्थिक साथीदार बनला. ही मैत्री इतकी प्रगाढ आहे की, झिम्बाब्वेच्या सरकारी विमानकंपनीत चिनी भाषिकांना प्राधान्य दिले जाते. झिम्बाब्वेच्या माध्यमातून चीनला आफ्रिका खंडात आपला प्रभाव वाढवणे सोपे झाले. चीनसारखा मित्र पाठीशी असल्याने मुगाबे सत्तेत टिकू शकले.

नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत मुगाबे सत्तेत राहतील अशीच चिन्हे होती. मात्र गेल्या काही काळात त्यांच्या सध्याच्या पत्नीला, ग्रेस मुगाबे; जी त्यांच्याहून ४१ वर्षांनी लहान आहे, हिला ते सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची लक्षणे दिसत होती. त्यामुळे ३७ वर्षे अतिशय खंबीरपणे पाठिंबा दिलेल्या लष्कराने व पक्षातील जुन्या, वरिष्ठ नेत्यांनी मुगाबे यांची साथ सोडली. त्यानंतर नेमके काय होणार आहे याची चीनला आधीच कल्पना दिली गेली व नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना नाईलाजाने सत्तात्याग करावा लागला. मुगाबे गेल्यानेही त्या देशाची परिस्थिती काही सुधारली नाही. झिम्बाब्वेचे शासन मुगाबे यांनी घालून दिलेल्या हिंसेच्या आणि हुकुमशाहीच्या मार्गानेच जात राहिले.

आता वयाच्या ९५ व्या वर्षी मुगाबे यांचा सिंगापूर येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आफ्रिकेतील प्रगत देशांपैकी एक मानला जाणाऱ्या झिम्बाब्वेची मुगाबे यांच्या काळात सर्वक्षेत्रीय घसरण झाली. देश अक्षरश: रसातळाला गेला. हे सारे पाहूनच असा प्रश्न पडतो की, परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना झिम्बाब्वेला स्वातंत्र्य मिळवून दिले यासाठी त्या देशाने मुगाबे यांचे आभार मानावेत, की त्या देशाच्या सध्याच्या दारुण अवस्थेबद्दल त्यांना दोषी ठरवावे?

ताजा कलम: ऑक्टोबर २०१५ मध्ये भारत सरकारने आयोजित केलेल्या आफ्रिका परिषदेसाठी मुगाबे भारतात आले होते. त्या परिषदेत भारत सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा साधा उल्लेखही करायचा नाही असा चंग बांधलेला होता. मात्र मुगाबे यांनी त्यांच्या भाषणात नेहरू आणि काँग्रेस पक्षाचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता. भारताने आफ्रिकेतील वर्णभेद आणि वसाहतवाद यांच्या विरोधातील लढ्यासाठी जो खंबीर राजकीय, आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला त्याची आठवण मुगाबेंनी आवर्जून काढली होती.

Tags: झिम्बाब्वे संकल्प गुर्जर श्रद्धांजली Zimbabwe Robert Mugabe Sankalp Gurjar लोकशाही दक्षिण आशिया आफ्रिका व्यक्तिवेध आंतरराष्ट्रीय राजकारण democracy south asia africa international politics Load More Tags

Comments:

Shrirang Joshi

मुगाबे यांनी त्यांच्या भाषणात नेहरू आणि काँग्रेस पक्षाचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता.... सत्ता टिकवण्यासाठी देश खड्ड्यात गेला तरी चालेल ही शिकवणूक देणाऱ्या नेत्याला आणि पक्षाला मुगांबे कसे विसरतील.

चित्रा मांजरेकर.

अभ्यासपूर्ण, मार्मिक लेख.

Sachin Karande

आपल्या देशाची पण झिम्बाब्वे प्रमाणे खाली जायची सुरवात झालेली लक्षणे दिसत आहेत की काय? जनतेने लवकरच सावध झालेला बरं!

Vishwas Sonawale

अतिशय अभ्यासपुर्ण लेख. झिम्बाब्वेच्या जनतेला लोकशाही मार्गाने राष्ट्र चालवणारा नेता लाभो. मुगाबेंच्या एकछत्री व वसाहतवादी सत्तेमुळे शोषीत व मरण पावलेल्या सामान्य जनांना तरच न्याय मिळेल.

Add Comment