निवळीचे तळे (उत्तरार्ध)

परभणी जिल्ह्यातील कुडा या गावी असलेल्या तळ्याकाठी पक्षीनिरीक्षणार्थ केलेल्या भटकंतीतून आकाराला आलेला दीर्घ ललित लेख 

6

झाडांची पाने गळून पडावीत तसे बुरुजावरचे विचार गळून पडू लागले. पाण्यातील एका बाभळीवर सुगरणीची तीन घरटी झुलू लागली होती. त्यांच्या विणीचा हंगाम संपलेला होता. घरटी रिकामी झुलू लागली. बाळाचा रिकामा पाळणा हलवू नये असं म्हणतात. पण इथे वाऱ्याला कोण अडविणार? तीन नदीसुरय पक्षी पाण्यावर भिरभिरत राहिले. त्यांच्या आवाजांना टवटवीतपणा आला होता. मी डोळ्याला दुर्बीण लावून तळ्याकडं पाहू लागलो. अडईचे दोन थवे पाण्यात उतरलेले. ते एकमेकांत मिसळून पाण्याच्या आतील भागाकडं पोहत चाललेले. अचानक सगळ्यांनी पंख उघडले. हवेवर स्वार झाले. बुरुजाच्या दिशेनं निघूनही गेले. 

आमचे पाय आपोआप जिंतूरच्या दिशेनं वळाले. 

7

चित्रदर्शी तळे सतत मला खुणावित असे. तिथं माहेराला आलेली कितीतरी पाखरं भेटत. बाभळीचा गोतावळा पाण्यालगत एकवटलेला दिसे. त्या झाडांच्या आसऱ्यानं पाणपक्षी वास्तव्याला येत असत. काही दिवस तिथं आनंदानं राहत. पुन्हा आपल्या गावी निघून जात असत. 

अनेक पायवाटा तळ्यात विरून गेलेल्या दिसायच्या. पाणवनस्पतींची फुलं पाण्यावर डोकं काढून ऊन खात बसलेली दिसायची. टिटवीच्या आवाजानं पाण्यालगतचे पक्षी सावध व्हायचे. माजून गेलेल्या गवताच्या आसऱ्यानं पाणमोर वावरायचे. एखाद्या वाद्यावर आघात करावा तसा गवतातून टक् आवाज ऐकू यायचा. त्यानंतर वारकरी डोकावताना दिसे. अनेक झाडं काठालगत उभी राहून स्वतःचं प्रतिबिंब निरखून पाहण्यात हरवून गेलेली दिसायची. एखादी फांदी पाण्याला स्पर्श करीत असे. तेव्हा ते झाड जणू पाण्यावर बोटं फिरवीत असल्याचा भास होई. सकाळच्या वेळी लहान पाणकावळे बाभळीच्या फांदीवर बसून पंख सुकविताना दिसायचे. त्याच झाडाच्या गळफांदीवर सामान्य खंड्या शिकारीच्या तयारी दिसायचा. 

नदीसुरय पक्ष्यांचा आवाज तळ्याभोवती सतत यायचा. मी त्या आवाजाचा अर्थ समजून घेण्यात बराच वेळ खर्ची घालायचो. पण कोडं काही उलगडायचं नाही. पक्षीशास्त्रज्ञ 'अर्नेस्ट सेटन' याने कावळ्यांच्या आवाजाचा अर्थ समजून सांगितला. इथं मला तर नदीसुरयचा आवाजच कळत नव्हता. तेव्हा समजावून सांगणं दूरच. 

खंड्या

जांभळ्या पाणकोंबड्या पाणकणीस गवतात स्वतःला लपवून घ्यायच्या. पांढऱ्याशुभ्र बगळ्यांचा एक थवा तळ्यावरून कुडा गावाच्या दिशेनं निघून गेला. तेव्हा सूर्य पश्चिमेकडं सरकत होता.  कवड्या धीवर पंख फडफड करीत पाण्यावर स्थिर होऊ पाहत होता. तेवढ्यात त्यानं पाण्यात बुडी घेतली. वर येऊन बाभळीच्या फांदीवर बसला. तेव्हा त्याच्या चोचीत मासा दिसला होता. राखी कोहकाळ गुडघाभर पाण्यात उभा दिसायचा. आम्हाला पाहून पलीकडील बाजूस जायचा. आम्ही लपणात बसलो की पुन्हा पूर्वीच्या जागी दिसायचा. 

पाण्यालगत पक्ष्यांच्या पायांच्या खाणाखुणा आढळून येत. त्यात कितीतरी विविधता दिसून येई. बदकांच्या पायांची नक्षी पाहून नवल वाटतं. मध्येच गवताचं बेट यायचं तेव्हा ती रांग खंडित व्हायची. या भिरभिरणाऱ्या पाखरांच्या पायांची रेखांकित नक्षी नोंदवहीत उमटायची. दुसऱ्या दिवशी मेहंदीसारखी रंगीत व्हायची. 

 8 

सकाळचे आठ वाजलेले. काल जिथं अडईच्या थव्यानं आम्हाला चकवा दिला होता त्या ठिकाणी पोहोचलो. तो थवा बुरजाच्या दिशेनं निघून गेल्याचं पाहिलं होतं. आम्ही दोघे कुडा गावाच्या दिशेनं हळूवार चालू लागलो. तळ्याचं पाणी पसरट दिसू लागलं. त्यापुढं तळ्यानं हात-पाय आखडून घेतलेले. जिथं पाणी कमी झालेलं तिथं गवतानं डोकं वर काढलेलं. त्याच्या पलीकडं हिरवळ दाटलेली. जणू बगीच्यामधील गालिचाच! त्या हिरवळीवर सहा चक्रवाक पक्ष्याने आसरा घेतलेला. अनिल बाभळीच्या झाडाखाली बसून 'ई-बर्ड'च्या वेबसाईटवर नोंदी करत होता. मी झाडाचा आधार घेत दुर्बिणीतून चक्रवाक पक्ष्यांचे निरिक्षण करू लागलो. तीन चक्रवाक समोरासमोर जणू बोलताहेत असंच वाटायचं. शेजारील दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवलेली. जणू दोन भांडखोर शेजारीच! एक चक्रवाक त्यांच्यापासून काहीसा दूर उभा होता. 20 मिनिटे झाली तरीसुद्धा ही पाखरं कोवळ्या उन्हात उभी होती. 

तेवढ्यात आमच्यासमोर दोन पठाणी होले पाणी पिण्यासाठी खाली उतरले. दोघांनीही सभोवतालचा कानोसा घेतला. पाण्यात चोच बुडविली. पोटभर पाणी प्यायले. त्यांच्या शेजारी एक 'लालपंखी चंडोल' उतरला. पण तो पाणी प्यायला नाही. पुन्हा तो काठालगत येऊन बसला. तिथं त्याचा जोडीदार वाट पाहत बसलेला होता. काही वेळानं दोघेही भुर्रकन उडून गेले. 

उजव्या बाजूनं चार माळटिटव्या अवतरल्या. (अचानक त्या कुठून आल्या कळलंच नाही म्हणून त्या अवतरल्या असं म्हणालो.) त्यांच्या आवाजानं पाखरं सावध झाली. दोन माळटिटव्या दगडाजवळ रेंगाळल्या. पण दोन माळटिटव्या चक्रवाकाजवळ पोहोचल्या तरीसुद्धा त्यांच्यात ठराविक अंतर होतंच! पण चक्रवाक पक्ष्यांनी हालचाल करायला सुरुवात केली. एकानं पंखाची उघडझाप केली. लहान आकाराची पिसं गळून पडल्याचं पाहिलं. हे सगळं दुर्बिणीतून दिसत होतं. दुर्बिणीचा पुरेपूर उपयोग आम्ही करत होतो. 

आम्ही आणखी पुढं सरकलो. चक्रवाक पक्ष्यातील काहीसं अंतर कमी केल्याचं समाधान वाटत होतं. पण तो आनंद फारच कमी वेळ टिकला. आम्ही बसण्याची जागा निवडली तेवढ्यात चक्रवाक पाण्यात उतरले. हिरवाळीवर जाऊन चक्रवाक पक्ष्यांची गळून पडलेली पिसं नोंदीसाठी जमा केली. नारंगी रंगाची ती पिसे बाभळी खालीच ठेवली. तिथंच विसरली. खरं तर ती पिसं काही काळ जपून ठेवायची होती. 

चक्रवाक पाणपक्ष्याला 'ब्राह्मणी बदक' असं म्हटलं जातं. एका ठिकाणी चक्रवाकासाठी 'चकवा' हे नाव वाचण्यात आलं. हे नाव वाचल्यावर माझं मलाच हसू आलं. सुरुवातीला मी अडईच्या थव्यानं चकवा दिला असं म्हणालो. आता इथं चक्रवाक या नावाचा कुणी चकवा पक्षी आहे हे सांगतोय. एकाच पक्ष्याच्या नावातील गंमती-जंमती अभ्यासल्यावर त्यातील बारीकशा नोंदी कळू लागतात. 

चक्रवाक एकटे - एकटे फिरताना दिसून येत नाहीत. जोडीनं किंवा थव्यानं वावरतात. त्यांना थोडी जरी कुणकुण लागली की, लगेच जागा बदलतात. सुरक्षित ठिकाणी पोहोचतात. आम्ही थोडसं अंतर काय कमी केलं, त्यांनी लगेच पाण्यात उतरायची घाई केली. हवं तर आपण यांना भित्रे पक्षी म्हणूया. माणसांची सावलीसुद्धा पडू देत नाहीत. तसा माणसाचा काय भरवसा? पाणपक्ष्यांचा तळ्यावर जसा विश्वास असतो तसा माणसावर नसतो हेच सत्य! 

शेकाट्या

चक्रवाक पोहत-पोहत खोल पाण्याकडं जाऊ लागले. दूरवर जाऊन स्थिरावले. हे पक्षी हिवाळ्यातच निवळीच्या तलावात दिसून येतात. राजहंस पक्ष्यांसारखंच या पक्ष्यांनाही स्थलांतरित पक्षी म्हणून आम्ही नोंदवहीत टिपलं होतं. दोन माणसं पाण्यात उतरली. होडीनं तळ्याच्या आतील भागाकडं जाताना दिसले. ते मासे पकडणारे भोई होते. त्यांच्यामुळे सहा चक्रवाक पक्ष्यांनी तेथून पळ काढला. ते मापा गावाच्या दिशेनं निघून गेले. 

ज्या दिशेनं माळटिटव्या अवतरल्या त्या दिशेनं आम्ही वळालो. तिकडं फार जुनी एक विहीर दिसली. शेजारी पिपरणी वाढत चाललेली. बुरुजावरची माणसं आणि ही विहीर यांचं नातं तसं जुनंच असावं… करपरा नदी पावसाळ्यात दूषित होत असावी तेव्हा या विहिरीनंच गढीला पाणी पुरविलं असणार. बुरुजावर खेळणारी लेकरं या विहिरीजवळ बसून अंघोळ करत असतील.. 
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी 
वाटेवरच्या पाऊलखुणा गेल्या सांगूनी 
असं म्हणतच आम्ही सोबत आणलेल्या भाकरी हातावर घेतल्या. भाकरी खाल्ल्या. हातावर पाणी घेतलं. पिपरणीखाली थोडा वेळ आराम केला. त्यावेळी 'नागझिरा' पुस्तकातील कांचनमृगाची शिकार आठवली. पुस्तकातील झाड पिपरणी नव्हतं. पण तसे विचार डोक्यात सुरू झाले. माझे डोळे पिपरणीच्या खोडावर भिरभिरू लागले. अजून काही विचार येण्याअगोदर आम्ही पाण्यालगतच्या पाणकणीस गवताच्या आडोशानं पाण्यावर आलेल्या काळविटांच्या पाडसाला पाहू लागलो. 

9

दुपारची वेळ. आम्ही डोक्यावर हॅट घातलेल्या. तळ्याच्या पलीकडील काठ फार दूर नव्हता. कुडा गावाच्या बाजूनं तळं निमुळतं होत आलेलं. त्यापुढं गावाकडून येणारा ओढा दिसतो. सध्या तो वाळूनं भरलेला दिसू लागला. या ओढ्यालगत हमखास शेळ्या चरताना दिसत. एका दिवशी त्या शेळ्यांची मोजदाद केली. तेव्हा त्या 17 होत्या.

आम्ही पाणकणीस गवतात लपून बसलेलो. पुढ्यात हळदी-कुंकू बदकाच्या आठ जोड्या दिसल्या. त्यातील नर - मादी ओळखता आले नाहीत. एकूण 16 बदकांच्या हालचाली दिसू लागल्या. हळदी कुंकू आमच्या समीप आले होते. उघड्या डोळ्यांनी त्यांना सहज पाहता येत होतं. या बदकाला हळदी-कुंकू नाव कसं मिळालं असेल या दृष्टीने त्यांचं निरीक्षण केलं. पिवळे टोक असलेली चोच आणि कपाळावर तांबड्या रंगाचा ठिपका पाहून याची कल्पना येते. डोळे काळेभोर. भुवई काळसर रंगाची. अंगावर खवलेधारी पिसे. पंखाच्या मागील बाजूस हिरवी पिसे. हवेत उडताना तो हिरवा रंग अधिक उठून दिसायचा. त्यातील एक बदक गवतावर आलं. तेव्हा त्याचे तांबड्या रंगाचे पाय जवळून पाहता आले. 

अजून आमचा त्यांना सुगावा लागला नव्हता. म्हणून ते धीटपणे पाणवनस्पतीवर ताव मारत होते. पक्षीनिरिक्षण करताना संयमाची फार गरज असते ते इथं अनुभवायला मिळालं. 

बाहेर आलेल्या बदकाने पुन्हा पाण्यात उडी घेतली. या तळ्यात त्यांना राहण्यासाठीची जागा उत्तम होती. खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. धोक्याची शक्यता फारच कमी म्हणून बदकाच्या विविध जाती इथं गुण्यागोविंदानं मुक्तपणे वावरताना दिसू लागल्या. 

हळदी कुंकू बदकं पाण्याच्या दिशेनं सरकली. थोड्या अंतरावर चक्रांग बदकाची एक जोडी पोहताना दिसली. त्याच दिशेनं या बदकांनी मोर्चा वळविला. 

पलीकडच्या काठावर काळवीटांचा कळप एकवटलेला दिसला. हरभऱ्याचं रान तुडवित त्यांनी पाण्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. काळवीट नर उंचावट्यावर उभा होता. माद्यांनी पाण्याला तोंड लावले. त्या कळपातील पाडसावर दुर्बीण स्थिरावली. पाणपक्ष्यांची निरीक्षणे करताना पाण्यावर आलेल्या प्राण्यांच्या नोंदी सुद्धा घेऊ लागलो. पक्ष्यांचं आणि या प्राण्यांचं सहजीवन समजून घेऊ लागलो. 

पाडसानंसुद्धा पाण्याला तोंड लावलं. त्याच्या आईसारखं कावरं-बावरं होऊन पाहत नव्हतं. त्याला अजून धोक्याची जाणीव नव्हती. ते अजून तरी बिकट प्रसंगाला सामोरं गेलं नव्हतं. त्याच्या कळपानं त्याला सुरक्षित ठेवलेलं. जसजसं पाडस मोठं होईल तसतशी संकटाची मालिका त्याला कळू लागेल. तेव्हा ते कानोसा घेऊनच पुढचं पाऊल उचलेल. त्याचे कान रात्रीच्या वेळी डोळे म्हणून काम करतील. तूर्तास ते पाडस पोटभरून पाणी प्यायलं. त्यानंतर पाणकणीस गवताच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर हुंदडलं. 

काळविटांचा कळप पाण्यावर आला तेव्हा त्यांनी बराच वेळ घेतला. सगळ्यांनी मनसोक्त पाणी पिऊन घेतलं. बाजूला ते हुंदडत राहिले. तेव्हा बाभळीवर बसलेल्या ढोकरी पाण्याकडं सरकल्या. काळविटांनी स्वतःच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा तिथंच सोडल्या. त्यांनी बाभळीच्या खोडाला अंग घासलं. 

काही वेळानं कळप आलेल्या वाटेनं परत गेला. जिथं काळवीट पाणी प्यायले तिथं आता पाच-सहा जांभळ्या पाणकोंबड्या वावरू लागल्या.

- माणिक पुरी, परभणी 
manikpuri01021984@gmail.com

Tags: पक्षी निरीक्षण ललित लेख निवळी परभणी पक्षीजीवन Load More Tags

Comments:

Manik Puri

Thanks

Add Comment